नगर : वाळूबाबत लवकरच सर्वंकष धोरण आणणार
https://ift.tt/73Dba9B
संगमनेर, पुढारी वृत्तसेवा : राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात वाळूमाफियांनी वाळूउपसा करीत नदीचे वाळवंट तयार केले आहे. मात्र, या बोकाळलेल्या वाळूमाफियांना लगाम घालून त्यांचा बंदोबस्त केला जाईल. एक महिन्याच्या आत संपूर्ण राज्यामध्ये वाळूबाबत सर्वंकष धोरण आणले जाईल, अशी घोषणा राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेरात केली.
मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये महसूल मंत्रिपदी निवड झाल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांचे सर्व प्रथमच माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या बालेकिल्ल्यात भाजपच्या वतीने जंगी स्वागत करीत शक्ती प्रदर्शन करण्यात आले, तसेच त्यांचा नागरी सत्कार व त्यांच्या वजनाइतकी पेढेतुला करण्यात आली. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना मंत्री विखे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते वसंतराव गुंजाळ होते.
यावेळी भाजप तालुकाध्यक्ष डॉ. अशोक इथापे, शहराध्यक्ष श्रीराम गणपुले, सामाजिक कार्यकर्ते अमोल खताळ, भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सदस्य रवींद्र थोरात, जिल्हाध्यक्ष सतीश कानवडे, महिला जिल्हाध्यक्ष सोनाली नाईकवाडी, बापूसाहेब गुळवे, डॉ. भानुदास डेरे, शिवाजी धुमाळ, युवामोर्चा जिल्हाध्यक्ष श्रीराज डेरे, जावेद जागीरदार, मनीष मालपाणी, संदीप देशमुख, श्रीकांत गोमासे, लहानू नवले, संजय मोरे, डॉ. सोमनाथ कानवडे, अशोक कानवडे, शिवाजी कोल्हे आदी मान्यवर उपस्थित होते.
मंत्री विखे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये सर्वत्र वाळूमाफिया व भूमाफिया मोठ्या प्रमाणात वाढलेली होती. संगमनेर तालुक्यातील एका वाळूमाफियाने, तर एका अंध व्यक्तीच्या डोक्याला पिस्तूल लावण्यापर्यंत मजल गेली आहे. इतकी या वाळूमाफियांची मजल गेली आहे. या वाळूमाफियांची दहशत सरकार उतरवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी वाळू माफियांना दिला.
संगमनेरची जनता आता स्वतंत्र
महाविकास आघाडी सरकारच्या काळात संगमनेर तालुक्यातील जनता पारतंत्र्यामध्ये होती. मात्र, आता राज्यात आलेल्या सरकारमुळे ती स्वतंत्र झाली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात जनतेची पिछेहाट झाली. मात्र, सध्याचे हे सरकार हे सर्वसामान्य जनतेचे सरकार आहे. त्यामुळे निश्चितच या सरकारकडून सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले जातील. निळवंडे कालव्यांसंदर्भात ना. विखे म्हणाले, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या उपस्थितीत बैठकीनुसार पहिल्या 20 कि. मी. मध्ये कामाची सुरुवात झाल्यानंतरच पुढील काम सुरू झाले. अनेक जण आपल्या सह्याचे फ्लेक्स बोर्ड लावून पाणी देणार, असे सांगत होते, परंतू निळवंडे कालव्यांच्या कामाचे संपूर्ण श्रेय ना. फडणवीस व माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचे असल्याचा उल्लेख करीत लवकरच कालव्यांना पाणी येणार असल्याचे ना. विखे म्हणाले.
मंत्री विखेंना 300 किलोंचा पुष्पहार..!
नाशिक रोडने मालपाणी लॉन्सच्या कार्यक्रमस्थळी येत असताना माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन या संपर्क कार्यालयाजवळ येताच ‘हमसे जो टकरायेगा मिट्टी में मिल जायेगा’ अशा कार्यकर्त्यांनी घोषणा देत परिसर दुमदुमवला. त्यानंतर 21 तोफांची सलामी देण्यात आली. 250 ते 300 किलो वजनाचा झेंडूच्या फुलांचा हार क्रेनच्या साह्याने महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गळ्यात घालण्यात आला.
The post नगर : वाळूबाबत लवकरच सर्वंकष धोरण आणणार appeared first on पुढारी.
from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/KUhmFGd
via IFTTT
0 Comments: