कल्याण-विशाखापट्टणम्; मंत्रालयात तोडगा!
https://ift.tt/YWmvt1q
पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : कल्याण-निर्मल (विशाखापट्टणम्) या राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत तत्काळ संबंधित अधिकार्यांची बैठक लावण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. पुढील आठवड्यात या संदर्भात विशेष बैठक होणार आहे.
या रस्त्याच्या कामाबाबत मराठवाड्यातील खासदार हेमंत पाटील व पाथर्डी येथील उद्योजक डॉ. बंडू भांडकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची मुंबईत भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. अहमदनगर जिल्ह्यासह पाथर्डी तालुक्यातून जाणार्या व अनेक वर्षांपासून रखडलेल्या या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिले आहेत.
या राष्ट्रीय महामार्गाचे मागील आठ ते दहा वर्षांपासून ढिसाळपणे व अतिशय निकृष्टपणे काम सुरू आहे. सध्या रस्त्याचे काम कुठेही होताना दिसत नसून, रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. नगर तालुक्यातील मेहकरी फाटा ते पाथर्डी तालुक्यातील फुंदे टाकळीपर्यंत पूर्ण खड्डेमय रस्ता झाल्याने याचा सर्वाधिक त्रास पाथर्डी तालुका व परिसरातील वाहनधारकांना होत आहे. मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली व बीड या जिल्ह्यातील सर्व वाहनधारक या सोयीच्या महामार्गामुळे मुंबई, पुणे, अहमदनगरला जात असतात. मराठवाड्यातील प्रवाशांनाही याचा मोठा त्रास होत आहे.
रस्त्याच्या कामाकडे संबंधितांचे लक्ष वेधण्यासाठी सर्वच पक्षांनी वेळोवेळी निवेदने देत, रास्ता रोको, सत्याग्रह अशी आंदोलने करूनही दुर्लक्ष होत आहे. कागदी घोडे नाचवत ठेकेदार बदलले. मात्र, कामात कुठलीही प्रगती झाली नाही. रखडलेल्या या कामामुळे सुरू असलेली अपघातांची मालिका थांबविण्यासाठी महामार्गाचे खड्डे बुजवून तत्काळ काम पूर्ण होण्यासाठी मंत्रालयात वरिष्ठ अधिकार्यांची बैठक घेण्याची मागणी खा. हेमंत पाटील व डॉ. भांडकर यांनी केली. यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी पुढील आठवड्यात तातडीने बैठक लावून संबंधित महामार्गाचा प्रश्न मार्गी लावू, असे सांगितले.
पाथर्डीची बाजारपेठ झाली उद्ध्वस्त
रस्त्याच्या दुरवस्थेमुळे या रस्त्यावरून जाणारे प्रवासी कमी होत आहेत. देशभरातून येणार्या वाहनांची संख्या रोडावली आहे. त्यामुळे तालुका व परिसराची बाजारपेठ उद्ध्वस्त झाली आहे. उद्योगधंद्यांवर परिणाम झाला आहे. पाथडी तालुका दुष्काळी असून, राष्ट्रीय महामार्गाची रहदारी संपुष्टात आल्यास उद्योग धंद्यांना फटका बसू शकतो, असेही त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.
अपघातांत 400 प्रवाशांचा बळी
अर्धवट अवस्थेतील खड्डेमय रस्त्यामुळे मागील काही वर्षांमध्ये शेकडो अपघात झाले असून, त्यात सुमारे चारशे वाहनधारक व प्रवाशांचा नाहक बळी गेला आहे. दीड हजाराच्या आसपास प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. तर, अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. तसेच, वाहनांचेही मोठे नुकसान होत आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
The post कल्याण-विशाखापट्टणम्; मंत्रालयात तोडगा! appeared first on पुढारी.
from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/26VMGRs
via IFTTT
0 Comments: