पालिका सहाय्यक आयुक्ताला धमकावले; काँग्रेसच्या माजी आमदाराविरोधात गुन्हा

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई कामाठीपुरा १४ वी गल्ली येथील अवैध बांधकामाला महापालिकेने नोटीस बजावली आहे. त्याला विरोध करत काँग्रेसचे माजी आमदार यांनी पालिकेच्या भायखळा ई वॉर्डचे सहाय्यक आयुक्त मकरंद दगडखैर यांना तसेच सहाय्यक अभियंता आलोक कुमार सिंग यांना धमकावल्याची तक्रार पोलिसात करण्यात आली आहे. दगडखैर यांनी दिलेल्या तक्रारीवरून अब्राहानी यांच्या विरोधात आग्रीपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दगडखैर यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेही पत्राद्वारे तक्रार केली आहे. पालिकेचे सहाय्यक आयुक्त मकरंद दगडखैर हे ई विभागातील आपल्या कार्यालयात सहाय्यक अभियंता आलोक कुमार सिंग व स्वीय सहाय्यक विशाल तांदळे यांच्यासोबत चर्चा करत असताना गुरूवारी दुपारी तीनच्या सुमारास काँग्रेसचे माजी आमदार युसूफ अब्राहानी तेथे आले. त्यांनी कामाठीपुरा १४ व्या गल्लीतील अवैध बांधकामाबाबत तुम्हाला कोणी नोटीस देण्यास सांगितले, अशी विचारणा करत नोटीस देऊ नका असे सांगितले. त्यावर दगडखैर यांनी पालिका कायदा १८८८ नुसार ही नोटीस योग्य असल्याचे अब्राहानी यांना सांगितले. त्यामुळे अब्राहानी संतापले व त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली, असे पोलिस तक्रारीत म्हटले आहे. अब्राहानी हे आलोक कुमार सिंग यांच्या अंगावर धावून गेले. त्यांनी सिंग यांच्या शर्टची कॉलर पकडून त्यांना खेचले. त्यावेळेस अब्राहानी यांना समजवण्याचा प्रयत्न करत असताना त्यांनी माझा हात झटकून मला ढकलून दिले. ई वॉर्डात तुम्ही फिरता कसे, काम कसे करता तेच बघतो. तुमच्यावर अँटि-करप्शनचा ट्रॅप लावतो असे धमकावल्याचे दगडखैर यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या नोटिसीशी अब्राहानी यांचा काहीच संबंध नसतानाही त्यांनी कार्यालयात येऊन गोंधळ घालत आम्हाला धमकावल्याचे दगडखैर यांचे म्हणणे आहे. अवैध बांधकामावरून नोटीस अब्राहानी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फैझल शेख या नागरिकाने दुकानांत अवैध माळा बांधला असून त्याला सहाय्यक अभियंता आलोक सिंग यांनी नोटीस बजावली होती. हे बांधकाम वाचवण्यासाठी सिंग यांनी पाच लाख रुपयांची मागणी केली होती. शेख यांनी त्यापैकी तीन लाख रुपये दिल्यानंतर नोटीस रद्द करण्यात आली. त्यानंतर सिंग यांनी आणखी दोन लाखांची मागणी केली. ती शेख यांनी पूर्ण न केल्याने पुन्हा नोटीस बजावण्यात आली. याबाबत विचारणा करण्यासाठी मी दगडखैर यांच्या कार्यालयात गेलो होतो. तेथे माझी सिंग यांच्याशी बाचाबाची झाली मात्र मी कुणालाही धमकावले किंवा धक्काबुक्की केली नाही. फक्त चार ते पाच मिनिटे मी तिथे होते. पोलिसांनी तेथील सीसीटीव्ही फुटेज काढून बघावे, असे अब्राहानी यांनी सांगितले. 'संबंध नसताना धमकावले' दगडखैर यांनी 'अवैध बांधकाम करणाऱ्या फैझल शेख यांनी आपले बांधकाम वाचवण्यासाठी एका राजकीय पक्षाच्या महिला कार्यकर्त्याला पैसे दिले होते. त्याचा आलोक सिंग यांच्याशी काहीही संबंध नसताना अब्राहानी यांनी माझ्या दालनात मला व सिंग यांना धमकावले. सिंग यांनी पैसे घेतले असल्यास अब्राहानी यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार का केली नाही', असा सवाल दगडखैर यांनी केला आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: