मनरेगामध्ये जामखेड तालुका पुणे आणि नाशिक विभागात अव्वल; चार महिन्यात १० कोटींच्यावर खर्च
दिपक देवमाने जामखेड : पुढारी वृत्तसेवा : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची आकडेवारी नुकतीच समोर आली असून देशातील गरिबांना रोजगार हक्काची हमी देणाऱ्या या योजनेत जामखेड तालुका हा अहमदनगर जिल्ह्यात सर्वप्रथम तसेच पुणे व नाशिक विभागात देखील अव्वल असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रत्येक जामखेडकरांसाठी ही अभिमानाची बाब आहे. रोजगार हमी योजना ही ग्रामीण भागातील लोकांसाठी मोठा आधार ठरत असून यातून शासकीय अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन सार्वजनिक आणि वैयक्तिक स्वरुपाची कित्येक कामे पूर्ण करता येतात, हे आमदार रोहित पवार यांनी आपल्या मतदारसंघात दाखवून दिले आहे. प्रत्येक सरकारी योजनेचा कर्जत-जामखेड मतदारसंघातील अधिकाधिक लोकांसाठी पुरेपूर उपयोग व्हावा, यासाठी आमदार रोहित पवार नेहमीच प्रयत्नशील असतात. ‘रोहयो’च्या माध्यमातूनही जास्तीत जास्त कामे मार्गी लावण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी कर्जत-जामखेड या दोन्ही तालुक्यात अनेक कार्यशाळा घेतल्या. यामध्ये अधिकारी, पदाधिकारी, रोजगार सेवक, समन्वयक या सर्वांच्या समन्वयाने रोजगार हमी योजनेअंतर्गत करायच्या विविध कामांचे नियोजन करण्यात आले. आमदार रोहित पवार यांचे वैयक्तिक लक्ष आणि प्रांताधिकारी, दोन्ही तालुक्यांचे तहसीलदार, दोन्ही तालुक्यांचे बीडीओ, कृषी अधिकारी आणि त्या-त्या विभागांचे सर्व कर्मचारी यांच्या नियोजनामुळे कर्जत-जामखेड हे दोन्ही तालुके ‘रोहयो’ अंतर्गत केलेल्या कामांमध्ये सध्या जिल्ह्यात आघाडीवर आहेत. जामखेडचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांचे या यशामध्ये विशेष योगदान आहे तसेच पूर्वीचे कर्जतचे गटविकास अधिकारी अमोल जाधव यांनीही तालुक्यात रोजगार हमी योजना उत्तम प्रकारे राबवली. तसेच आता कार्यरत असलेले कर्जतचे गट विकास अधिकारी प्रदीप शेंडगे हे देखील सध्या चांगलं काम करत आहेत. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शाळेला संरक्षक भिंत बांधणे, गायगोठा, शेळी पालनाचे शेड, कुक्कुटपालनाचे शेड, फळबाग, शेततळे, रस्त्याच्या दुतर्फा वृक्षलागवड, विहीरी, शोषखड्डे, घरकूल इत्यादी कामे केली जातात व रोजगार उपलब्ध होतो. जामखेड तालुक्यातील वर्षभराच्या उद्दिष्टाच्या 327% उद्दिष्ट गेल्या 4 महिन्यात पूर्ण करून आजवरचा उच्चांक गाठला आहे. मागील चार महिन्यात दहा कोटींच्यावर खर्च झाला असून सर्वाधिक खर्च हा वैयक्तिक लाभाच्या योजनांवर करण्यात आला आहे. तसेच कर्जत तालुक्यात मागील चार महिन्यात 1.25 लाख मनुष्य दिनाची निर्मिती करण्यात आली असून गेल्या चार महिन्यात 6 कोटींच्या आसपास खर्च करण्यात आला आहे. ज्यामध्ये सर्वाधिक खर्च हा वैयक्तिक लाभाच्या योजनांवर केला आहे. यासोबतच वर्षभराच्या उद्दिष्टाच्या 111 टक्के उद्दिष्ट मागील चार महिन्यात कर्जत तालुक्यात पूर्ण करण्यात आले आहेत. अशा पद्धतीने जामखेड तालुका प्रथम क्रमांकावर तर कर्जत तालुका हा अहमदनगर जिल्ह्यात अनुक्रमे दुसऱ्या क्रमांकावर आहे. अंगणवाडी अभिसरण अहमदनगर जिल्ह्यात प्रथमच जामखेडमध्ये सुरू करण्यात आले आहे. त्यामध्ये कवडगाव, खर्डा व बांधखडक या गावांचा समावेश आहे. यासह यंदाच्या वर्षी किमान 50 शाळांना संरक्षण भिंतीचे काम करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मागील महिन्यात राज्यात 49 व्या क्रमांकावर असणारे जामखेड ‘रोहयो’मध्ये आता 28 व्या क्रमांकावर आले आहे. ‘रोहयो’ अंतर्गत करायच्या कामांमध्ये समन्वय राखण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी कर्जत आणि जामखेड या दोन्ही तालुक्यात प्रत्येकी एक अशा दोन समन्वयकांची नेमणूक करुन अधिकाऱ्यांच्या सहकार्याने अधिकाधिक लोकांना काम देण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. अशा प्रकारे समन्वयक नेमणे आणि कार्यशाळा घेणे या दोन्ही गोष्टी केवळ कर्जत-जामखेड या दोन तालुक्यातच होत असल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळेच कर्जत-जामखेड हे दोन्ही तालुके रोहयोअंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांमध्ये आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. मतदारसंघातील शेवटच्या घटकापर्यंत सर्वच शासकीय योजनांचा फायदा करण्याचा प्रयत्न : आ रोहित पवार मतदारसंघातील शेवटच्या घटकापर्यंत सर्वच शासकीय योजनांचा फायदा कसा पोहोचवता येईल, यासाठी मी नेहमीच प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो. हे यश पाहिल्यानंतर एक समाधान वाटतं की अधिकारी आणि नागरिकांमध्ये आपण समन्वय साधून काम केलं तर त्याचा सामान्य नागरिकांना नक्कीच फायदा होतो. पहिल्या दुसऱ्या क्रमांकावर पाहून लोकप्रतिनिधी म्हणून मनापासून आनंद वाटतो. हे यश मिळवण्यासाठी प्रयत्न करणारे दोन्ही तालुक्याचे अधिकारी, कर्मचारी व समन्वयकांचे मी मनापासून अभिनंदन करतो व शुभेच्छा देतो. हेही वाचा : नगर : गणेशभक्तांना यंदा महागाईचा चटका छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण विद्यार्थी जनआंदोलन समितीकडून भव्य मोर्चा The post मनरेगामध्ये जामखेड तालुका पुणे आणि नाशिक विभागात अव्वल; चार महिन्यात १० कोटींच्यावर खर्च appeared first on पुढारी.http://dlvr.it/StQzD8
0 Comments: