संगमनेर : म्हाळुंगीचा पूल वाहतुकीसाठी बंद ; परिसरातील नागरिकांचे अतोनात हाल
https://ift.tt/0lzBxHe
संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : म्हाळुंगी नदी पात्रातून सतत होणारा वाळू उपसा आणि त्यातच नदीपात्राच्या कडेने सांडपाणी वाहून नेण्यासाठी खोदलेल्या चरामुळे हा पूल काहीसा खचला आहे. त्यामुळे या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. पूल बंद झाल्याने साईनगर, घोडेकर मळा आणि पम्पिंग स्टेशन या परिसरातील नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. संगमनेर शहरातील स्वामी समर्थ मंदिरापासून साईमंदिराकडे जाणारा म्हाळुंगी नदीवरील पूल अचानक उत्तरेकडील बाजूने खचला असल्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून संगमनेर नगर परिषद प्रशासनाने म्हाळुंगी नदीच्या खचलेल्या पुलाच्या दोन्ही बाजूंनी बॅरिकेट्स लावून रस्ता वाहतुकीसाठी आणि पायी जाणार्या येणार्यांसाठी बंद केला आहे.
म्हाळुंगे नदीला मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळे पूल दुरुस्त करण्याचे काम करणे सध्यातरी अवघड बनले आहे. त्यामुळे साईनगर, घोडेकर मळा आणि पंपिंग स्टेशन या परिसरात राहणार्या नागरिकांना संगमनेर शहरात येण्यासाठी जवळचा असणारा मार्ग बंद झाला आहे. वरील परिसरातील नागरिकांना मालपाणी हेल्थ क्लब मार्गे संगमनेर शहरात यावे लागत आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत.
संगमनेर शहरातील चव्हाणपुर्याकडून वेताळ मळ्याकडे जाण्यासाठी पालिकेने नदीपात्रात सिमेंटचे पाईप टाकून केलेला कच्चा पूलही पावसाळ्यात म्हाळुंगी नदीस जास्त प्रमाणात पाणी आल्यामुळे तोही वाहून गेला आहे. त्यामुळे साईनगर, पंपिंग स्टेशन, घोडेकर मळा, हिरे मळा, वेताळ मळा, गंगामाई परिसरात राहणार्या नागरिकांसह दिगंबर गणेश सराफ विद्यालय व डॉ. देवेंद्र ओहरा कनिष्ठ महाविद्यालयाकडे जाणार्या विद्यार्थ्यांना पूल बंद झाल्याच्या दिवसापासून मालपाणी हेल्थ क्लब या कासारवाडी रस्त्याचा वापर करावालागत आहे. नेमक या नदीचे पाणी कधी संपेल आणि या पुलाची दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग कधी करेल, याकडे या भागातील नागरिकांची लक्ष लागून आहे.
पाणी कमी होईपर्यंत काम करणे अशक्य
म्हाळुंगी नदीला सध्या मोठ्या प्रमाणात पाणी सुरू आहे. त्यामुळे नेमके त्या पुलाचे किती पिलर तुटले आहेत, हे काही कळणे अवघड झाले आहे. नदीत तात्पुरत्या स्वरूपाचा बंधारा घालण्याचे काम हाती घेण्यात येणार होते. परंतु भोजापूर धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे नदीत मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. त्यामुळे जोपर्यंत नदीचे पाणी कमी होत नाही, तोपर्यंत खचलेल्या पुलाचे दुरुस्तीचे कामकरणे शक्य नाही. असे मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी ‘पुढारी’ शी बोलताना सांगितले.
The post संगमनेर : म्हाळुंगीचा पूल वाहतुकीसाठी बंद ; परिसरातील नागरिकांचे अतोनात हाल appeared first on पुढारी.
from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/4lvBS9a
via IFTTT
0 Comments: