नगर : स्वाईन फ्लूचा शिरकाव, आतापर्यंत तिघांचा बळी
https://ift.tt/FGv53ce
नगर/पारनेर/संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात स्वाईन फ्लूचा शिरकाव झाला असून त्याने तिघांचा बळी घेतला आहे. आरोग्य यंत्रणेने ही बाब गांभीर्याने घेत तातडीने आरोग्य तपासणी सुरू केली आहे. पारनेर तालुक्यातील एकाचा, तर संगमनेरातील दोघांचा अशा तिघांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील संगमनेर, पारनेर, कोपरगाव, श्रीरामपूर तालुक्यात स्वाईन फ्लूचे रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
पारनेर तालुक्यातील पिंप्री जलसेन येथील शिवाजी पाराजी शिंदे (वय 60) यांचा स्वाईन फ्लूची बाधा झाल्याने नगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचारा दरम्यान मंगळवारी (दि. 23) मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांनाही बाधा झाली असून, मुलगा व सुनेला उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सर्दी, खोकला जास्त जाणवू लागल्याने शिवाजी शिंदे यांना रविवारी पारनेरच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर पुढील उपचारासाठी नगर येथे नेण्यास सांगितले. त्यांनतर रविवारी रात्री त्यांना नगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
परंतु, प्रकृती जास्त खालावल्याने मंगळवारी (दि.23) दुपारी दीड वाजता त्यांचा नगर येथे मृत्यू झाला. पिंप्री जलसेन येथील व्यक्तीचा स्वाईन फ्लूमुळे झालेल्या मृत्यूमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली. थंडीताप, खोकला आजाराने तालुक्यातील नागरिक त्रस्त असताना एका व्यक्तीचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला. त्यामुळे तालुक्यातील नागरिक खबरदारी घेताना दिसत आहेत.
जिल्ह्यात स्वाईन फ्लू रुग्णांची संख्या वाढू नये, यासासाठी प्रतिबंध व नियंत्रणासाठी तत्काळ विशेष उपाययोजना करण्याचे निर्देश आरोग्य संचालकांनी आरोग्य यंत्रणेला दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील स्वाईन फ्लू रुग्ण व संशयित रुग्णांवर तत्काळ उपचार करण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकार्यांना दिले आहेत.
-डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी, नगर
श्रीरामपूर, कोपरगावतही रुग्ण
जिल्हा रुग्णालयात स्वाईन फ्लूचे दोन रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यातील एक रुग्ण श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव आणि दुसरा कोपरगाव येथील आहे. दोघेही कोरोना संसर्ग झाल्याच्या संशयातून जिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते; मात्र तपासणी दरम्यान त्यांना स्वाईन फ्ल्यूची लागन झाल्याचे समोर आले.
तपासणीसाठी पथके तयार
तालुक्यात स्वाईन फ्लूचा रुग्ण आढळून त्याचा मृत्यू झाल्याने तालुका प्रशासन खडबडून जागे झाले. आरोग्य विभागाने तालुक्यात सर्वत्र नागरिकांची आरोग्य तपासणीसाठी पथके तयार केले आहेत. त्या माध्यमातून गाव पातळीवर नागरिकांची तपासणी करण्यात येत असून, संशयित रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले जात आहे.
पिंप्री जलसेन येथील एका व्यक्तीचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला; त्यामुळे गावात नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. तसेच, तालुक्यातील सर्वच गावांमध्ये आरोग्य तपासणीसाठी पथके तैनात करण्यात आले. तालुक्यातील नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, कोरोना व स्वाईन फ्लू सदृश्य लक्षणे असल्यास त्वरित जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन उपचार घ्यावेत.
– डॉ प्रकाश लाळगे, तालुका आरोग्य अधिकारी, पारनेर
संगमनेरात 13 संशयितांवर उपचार
संगमनेर तालुक्यात स्वाईन फ्लू सदृश आजाराने दोघांचा मृत्यू झाला आहे. या वृत्ताला पंचायत समितीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप यांनी दुजोरा दिला आहे.तालुक्याच्या पठार भागातील येठेवाडी येथील 58 वर्षीय व्यक्तीचा 10 ऑगस्टला आणि गुंजाळवाडी येथील 55 वर्षीय व्यक्तीचा 15 ऑगस्टला मृत्यू झाला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सर्वेक्षणात तालुक्यातील निमोण (गाडेकर मळा), निमगाव भोजापूर, निमगाव जाळी, कासारा दुमाला, कोकणगाव, गुंजाळवाडीसह शहरातील देवाचा मळा भागात स्वाईन फ्लूचे 13 संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून ते बरेही झाले आहेत. येठेवाडी आणि गुजांळवाडी स्वाईन फ्लूने मृत्यू झाला असल्याचा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला आहे. सद्यस्थितीत आश्वी खुर्द येथील एका रुग्णावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
संगमनेर तालुक्यातील दोघांचा स्वाईन फ्लूसदृश आजाराने मृत्यू झाला आहे. तसा वैद्यकीय अहवालही प्राप्त झाला आहे. स्वाईन फ्लूच्या संसर्गावर प्रभावी ठरणार्या टॅमी फ्लूू गोळ्यांचा तालुक्यात मुबलक साठा उपलब्ध करण्यात असल्यामुळे नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
-डॉ. सुरेश घोलप, तालुका आरोग्य अधिकारी संगमनेर पंचायत समिती.
The post नगर : स्वाईन फ्लूचा शिरकाव, आतापर्यंत तिघांचा बळी appeared first on पुढारी.
from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/WayxkGq
via IFTTT
0 Comments: