अकोले : ‘अगस्ती’साठी 25ला मतदान!
https://ift.tt/n5VAet9
अकोले : पुढारी वृत्तसेवा : अगस्ती सहकारी साखर कारखान्याची स्थगित झालेली निवडणूक 25 सप्टेंबरला होणार असून, मतमोजणी 26 तारखेला करण्याचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. या निकालामुळे अकोले तालुक्यात राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापणार आहे. अगस्ती सहकारी साखर कारखान्याची 17 जुलै रोजी निवडणूक होणार होती. राज्यात सत्तांतर होऊन शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले. या सरकारने 15 जुलै रोजी अचानक राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुकांना 30 सप्टेंबरपर्यंत स्थगिती दिली. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे दोन दिवसांवर मतदान येऊन ठेपलेले असताना अगस्ती कारखान्याची निवडणूक स्थगित झाली. या निर्णयाने उमेदवार व ऊस उत्पादक सभासदांमधून नाराजी व्यक्त झाली.
माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास मंडळ विरुध्द आमदार डॉ. किरण लहामटे, जि.प. सदस्य अशोकराव भांगरे, कारखान्याचे उपाध्यक्ष सीताराम पाटील गायकर, कॉ.अजित नवले, कैलास वाकचौरे, मधुकर नवले यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे शेतकरी समृद्धी मंडळामध्ये चुरशीची सरळ लढत रंगात आली होती. निवडणूक स्थगित झाल्यामुळे शेतकरी समृद्धी मंडळाचे उमेदवार परबत नाईकवाडी व विकास शेटे यांनी औरंगाबाद खंडपीठात निर्णयाला आव्हान दिले होते. कारखान्याचे सभासद दिलीप मंडलिक यांनी याचिका दाखल केली.
दोन्हीही याचिकेवर मंगळवारी (दि.30) औरंगाबाद खंडपीठात सुनावणी झाली. न्यायालयाने निवडणुकीसाठी 25 सप्टेंबर रोजी मतदान घेण्याचा आदेश दिला. 26 सप्टेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. अगस्ति सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. याचिकाकर्ते विकास कचरू पाटील शेटे यांच्या वतीने अॅड. रमेश धोर्डे, अॅड. अजित काळे यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली.
मात्र, उमेदवार तेच
निवडणुकीसाठी पूर्वी जे अर्ज भरले तेच कायम असणार आहे. जेथून निवडणूक प्रक्रिया स्थगित झाली तेथून पुढे प्रक्रिया राबविली जाणार आहे. उमेदवार तेच असल्याने प्रचाराचा धुरळा पुन्हा गाठीभेटीनिमित्ताने उडणार आहे. उमेदवारांनी निकालाची वार्ता समजताच गाठीभेटीवर जोर दिला आहे.
The post अकोले : ‘अगस्ती’साठी 25ला मतदान! appeared first on पुढारी.
from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/pnQ89Ts
via IFTTT
0 Comments: