पीकविम्याकडे शेतकर्यांनी फिरवली पाठ! नगर जिल्ह्यात 12 लाख खातेदार
https://ift.tt/7bH6u4s
नगर; पुढारी वृत्तसेवा: विमा कंपन्यांच्या काही जाचक अटींंमुळे नुकसान होऊनही शेतकर्यांना भरपाईसाठी मोठी प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे पंतप्रधान पीकविमा योजना ही शेतकर्यांसाठी जणू मृगजळ ठरत आहे. यावर्षीही शेतकर्यांनी पीकविम्याकडे पाठ फिरवल्याचे चित्र असून, काल सोमवारपर्यंत जिल्ह्यात एकूण 12 लाख खातेदार असतानाही, केवळ 58 हजार शेतकर्यांनीच आपल्या पिकांचा विमा काढल्याचे उदासीन चित्र समोर आले आहे. जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2022 मध्ये राबविण्यास कृषी विभागाने 1 जुलै रोजी मान्यता दिली. त्यानुसार जिल्ह्यात पीकविमा नोंदणीला सुरुवात झाली.
पीकविमा काढण्यासाठी एचडीएफसी इर्गो इन्शुरन्स कंपनीवर ही जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. गेल्या वर्षी ती ‘आयसीआयसी’कडे होती. आता कंपनीत बदल करण्यात आला आहे. मात्र, पीकविमा ही चांगली योजना असली, तरी विमा काढल्यानंतरही नुकसानीची भरपाई जाचक अटींमुळे काही भागात मिळत नसल्याचे पुढे आले आहे. पीकविमा कंपन्यांनी अतिवृष्टीची दिलेली व्याख्या, सलग पाच दिवस किंवा तत्सम कालावधीत मंडलात ‘तितका’ पाऊस पडला, तरच विम्यासाठी पात्र ठरविण्याची अट, त्यात पीक कापणी प्रयोग, आणेवारी काढण्याची प्रक्रियाही काही भागांसाठी अडचणीची ठरत आहे.
त्यामुळेच पदरमोड करूनही पीकविम्याचे हप्ते भरले, तरीही पीकविमा कंपन्या आणि त्यांच्या जाचक अटींमुळे शेतकर्यांना भरपाई मिळण्याची शाश्वती राहिलेली नाही. त्यामुळेच शेतकर्यांचा पीकविम्यावरील विश्वास संपू लागल्याची चर्चा आहे. दरम्यान, जिल्ह्यात 12 लाख 86 हजार खातेदार असताना सोमवारपर्यंत केवळ 58 हजार 326 शेतकर्यांनीच विम्यातून नोंदणी केली आहे. गतवर्षी काढलेल्या विम्याच्या भरपाईपासून बहुतांश शेतकरी अद्याप वंचित असल्याने हा परिणाम दिसत असल्याचे शेतकर्यांमधून चर्चा आहे.
पीकविमा योजनेत सहभाग नोंदवा : जगताप
खरीप हंगामात नैसर्गिक आपत्ती, काढणी पश्चात नुकसान यासह पीक कापणी प्रयोगाच्या आधारे उत्पादन कमी आल्यास शेतकर्यांना नुकसान भरपाई दिली जाते. 31 जुलै ही पीकविमा उतरविण्यासाठी शेवटची तारीख आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकर्यांनी पीकविमा योजनेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी शिवाजी जगताप आणि एचडीएफसीचे रामदास फुंडे यांनी केले आहे.
शेवटचे पाच दिवस; शेतकरी निरुत्साहीच !
पीक विमा नोंदणीसाठी 31 जुलैची मुदत देण्यात आली आहे. नोंदणीला 20 दिवसांवर कालावधी उलटून गेला असून, अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. आता, तर पीकविमा नोंदणीत सहभागी होण्यासाठी अवघे पाच दिवस शिल्लक असताना बहुतांश शेतकर्यांनी याकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे.
The post पीकविम्याकडे शेतकर्यांनी फिरवली पाठ! नगर जिल्ह्यात 12 लाख खातेदार appeared first on पुढारी.
from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/ZzB5bpV
via IFTTT
0 Comments: