शहीद जवान जिजाभाऊ मोहिते यांना निरोप देताना लोकांना अश्रू अनावर

परभणी: येथे कर्तव्यावर असलेले भारतीय हवाई दलातील जवान जिजाभाऊ किशनराव मोहिते यांच्यावर शनिवारी रात्री सव्वा दहा वाजता तालुक्यातील महागाव येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. जिजाभाऊ यांच्या कुटुंबीयांनी धार्मिक रीतीनुसार अंत्यविधी पूर्ण केला. पोलीस दलाच्या तुकडीने बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून मानवंदना दिली. तसंच, हवाई दलाच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात आली. तत्पूर्वी, शहीद जिजाभाऊचे पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. पठाणकोट येथे तैनात असलेल्या जिजाभाऊंची तब्येत अचानक बिघडली होती. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, त्यांची प्रकृती अधिकच खालावत गेली. त्यामुळं त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यातच गुरुवारी सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. काल रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांचं पार्थिव महागाव इथं आणण्यात आलं. त्यानंतर गावातील व परिसरातील नागरिकांनी अत्यंदर्शन घेतलं. उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, खासदार संजय जाधव, नांदेडचे आमदार मोहनराव हंबर्डे, तहसीलदार श्रीमती पल्लवी टेमकर, सैनिक कल्याण कार्यालयाचे पाटील तसेच विविध पदाधिकारी, अधिकारी आणि नागरिकांनी पुष्पचक्र वाहून मोहित यांना श्रद्धांजली अर्पण केली व शहीद अमर रहे... अशा घोषात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला वाचा: जिजाभाऊ यांचं वय अवघं २६ वर्षे होतं. त्यांचं प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत झालं होतं. इयत्ता आठवी ते दहावीचं शिक्षण खासगी शाळेत झालं होतं. त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पालम, येथे घेत असतानाच स्पर्धा परीक्षेची तयारी केली. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून त्यांची हवाई दलात निवड झाली होती. मागील वर्षीच नांदेड जिल्ह्यातील मार्कंड या गावातील भाग्यश्री यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला होता. त्यांच्या निधनानं संपूर्ण पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: