पुणे: ज्येष्ठ दाम्पत्य रात्री ८ वाजता रस्त्यावरून पायी जात होते, इतक्यात...

म. टा. प्रतिनिधी, : एका ज्येष्ठ दाम्पत्याने धाडस दाखवून सोनसाखळी चोरट्याला नागरिकांच्या मदतीने पकडले. परिसरातील मुरकुटे गार्डन रस्त्यावर शनिवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी चतुःश्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकीकडे पोलीस चोरट्यांना पाहून पळून जात असल्याची घटना अलीकडेच घडली असताना, या ज्येष्ठ दाम्पत्याने दाखविलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. दयानंत आश्रुबा गायकवाड (वय २६, रा. शिंदे वस्ती, मारूंजी) असे पकडलेल्या सोनसाखळी चोरट्याचे नाव आहे. तर, त्याचा साथीदार नागरिकांना पाहून पळून गेला आहे. त्याचा चतुःश्रुंगी पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. या प्रकरणी ६८ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला या पतीसोबत मुरकुटे गार्डन रस्त्यावरून शुक्रवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास पायी फिरत होत्या. त्यावेळी दुचाकीवरून दोघेजण त्यांच्याजवळ आले. पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील ५६ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले. मात्र, तक्रारदार यांनी तत्काळ प्रसंगावधान दाखवून सोनसाखळी हिसकावणाऱ्या चोरट्याची कॉलर पकडली. पण, ते हिसका देऊन पळून जाऊ लागले. त्यावेळी आजीबाई व त्यांच्या पतीने दुचाकीला धक्का देत त्यांना ढकलून दिले. त्यानंतर दुचाकी पकडून ठेवली. त्यावेळी मंगळसूत्र हिसकावणारा चोरटा त्यांना धक्का देऊन पळून गेला. तक्रारदार व त्यांच्या पतीने आरडाओरडा केला. त्यावेळी नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली. त्यांनी दुचाकी चालविणाऱ्या गायकवाड या सोनसाखळी चोरट्याला पकडले. यावेळी चतुःश्रुंगी पोलिसांचे मार्शल त्या ठिकाणाहून जात होते. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन, आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून साथीदाराची माहिती घेतली जात आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: