मुंबई लोकल प्रवासासाठी वेळा पाळा; अन्यथा भरावा लागणार दंड

म. टा. प्रतिनिधी, मुंबई सर्वसामान्य प्रवाशांनी प्रवासी वेळ चुकवल्यास २०० रुपयांचा दंड आणि एक महिन्याचा तुरुंगवास या शिक्षेचा सामना करावा लागणार आहे. यामुळे सामान्यांना विशिष्ट वेळेतच प्रवास करावा लागणार आहे. रेल्वे स्थानकातील तिकीट खिडक्यांवरील गर्दी टाळण्यासाठी वेळेपूर्वी सामान्यांना तिकीट देण्यात येईल, अशी भूमिका रेल्वे प्रशासनाने घेतली आहे. यामुळे एकाच वेळी स्थानकातील तिकीट खिडक्यांवरील गर्दी रोखणे शक्य होईल. सकाळी ७ ते दुपारी १२ आणि दुपारी ४ ते रात्री ९ ही वेळ वगळता उर्वरित वेळेत सर्व प्रवाशांना लोकलमुभा देण्यात आलेली आहे. सध्या कार्यालयीन वेळेत बदल झालेला नाही. यामुळे सर्वसामान्य प्रवाशांनी कामावर जाण्यासाठी लोकलमध्ये प्रवेश केल्यास त्यांना रेल्वे पोलिसांच्या कारवाईचा सामना करावा लागणार आहे. साथीच्या रोगाचा कायद्याचा भंग केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कामात अडथळा आणणे आणि सरकारी सूचनांचे पालन न केल्यास कारवाई होणार आहे. आणि कलम १८८नुसार ही कारवाई होईल. विविध कलमानुसार २०० रुपये दंडाची तरतूद आहे याच बरोबर एक महिन्यापासून तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास अशा शिक्षेचादेखील समावेश आहे, असे रेल्वे पोलिसांनी सांगितले. तिकिट खिडक्यांवरील गर्दी टाळण्यासाठी सामान्यांना प्रवास वेळेपूर्वी तिकिट देण्यात येईल. प्रवासी वेळेत गर्दी विभागण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सूतार यांनी सांगितले. कार्यालयीन वेळेत बदल झालेला नसताना नेमक्या प्रवास वेळेत प्रवाशांना मुभा देण्यात आलेली नाही. सकाळी ९-१० वाजता सुरु होणाऱ्या कार्यालयात वेळेवर पोहचण्यासाठी सकाळी ७ च्या आधी घरातून बाहेर पडावे लागणार आहे. पश्चिम रेल्वेवरील ३०१ तिकिट खिडक्या ६४२ शिफ्टमध्ये सुरु राहतील. पश्चिम रेल्वेवरील सर्व एटीव्हीएम सुरु करण्यात येतील. सर्व स्थानकांतील सरकते जिने, लिफ्ट सुरु करण्यात येणार आहे. स्थानकांतील १९८ प्रवेशद्वार खुले करण्यात येतील. यामुळे स्थानकात प्रवेश करण्यासाठी एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही. सध्या ८६ प्रवेशद्वार खुले आहेत. -सुमीत ठाकूर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: