सुजय विखे- नीलेश लंके लढतीत ईर्ष्या आणि चुरस

April 30, 2024 0 Comments

संदीप रोडे







नगर लोकसभा मतदार संघाच्या मैदानात नीलेश लंके नावाचा चेहरा पुढे करून शरद पवार यांनी भाजपचे हेवीवेट नेते मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना कोंडीत पकडले आहे. गेल्या पस्तीस वर्षांचे राजकीय उट्टे काढण्याकरिता शरद पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मात्र, विखे-पाटील हेही मातब्बर नेते असून त्यांची ‘मत एक्स्प्रेस’ सुसाट निघाली आहे. (Sujay Vikhe Patil vs Nilesh lanke)


प्रचाराच्या दुसर्‍या टप्प्यात लंके यांनी मतदार संघात हवा केली असली, तरी गर्दीचे रूपांतर मतपेटीत उतरविण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. दुसरीकडे, पन्नास वर्षांची राजकीय कारकीर्द पाहता अस्तित्वाची ही लढाई जिंकण्याकरिता विखे-पाटील यांनी लंकेंच्या मतपेटीला सुरूंग लावल्याचे चित्र दिसत आहे. आधी एकतर्फी वाटणारी डॉ. सुजय विखे-नीलेश लंकेंची फाईट टाईट असल्याचे दिसून येते. प्रचारातून ‘विकासा’चा मुद्दा हरवला, तर ‘जनसंपर्काचा’ मुद्दा तापल्याचे दिसत आहे. विखे-पाटील हे विकासाच्या मुद्द्यावरच मतदारांना साद घालत आहेत. लंके वैयक्तिक पातळीवर घसरले असून, त्यांनी ‘जनसंपर्काचा’ मुद्दा तापविला आहे.


लंके हेच प्रतिस्पर्धी उमेदवार असतील, याचा अंदाज विखे-पाटील यांना आधीच आला होता. त्याच दृष्टीने त्यांनी पावले टाकत मतदार संघांची बांधणी अगोदरच केली होती. विखे-पाटलांचा अंदाज खरा ठरला, अन् आमदारकीचा राजीनामा देत लंके यांनी शरद पवारांच्या पाठबळावर विखेंविरोधात लोकसभेच्या मैदानात दंड थोपटले. प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात लंके यांनी सुरुवातीला विकासाचा मुद्दा छेडला; पण नंतर मात्र विखे कुटुंबीयांवर आरोपांचे बाण सोडले. खासदार डॉ. सुजय विखे यांनी मात्र लंकेंच्या आरोपाला विकासाच्या माध्यमातून उत्तर देण्यास प्राधान्य दिले.


नगरच्या विकासाचे व्हिजन




महसूलमंत्री, राज्य, केंद्रातील सत्तेच्या माध्यमातून नगर मतदार संघात केलेल्या विकास कामांची जंत्री मांडतानाच विखे-पाटील यांनी नगर विकासाचे व्हिजनही मांडले, हेच लोकांना भावत असल्याचे दिसते. त्यास लंके यांनी ‘जनसंपर्काचा’ मुद्दा छेडत त्याला ‘धनशक्ती विरुद्ध जनशक्ती’ असा रंग दिला. उमेदवारी अर्ज भरताना त्यासोबतच्या प्रतिज्ञापत्रात संपत्तीचे विवरण देताना लंके हे लखपती, तर विखे-पाटील कोट्यधीश असल्याचे समोर आले. हाच धागा पकडत लंके यांनी धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा मुद्दा पुढे केला. लंकेंच्या आरोपाला उत्तर देण्याचे टाळत विखे-पाटील यांनी विकास आराखड्याच्या आधारे बेरजेचे गणित अचूकपणे मांडले आहे.


नगरची निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे. वंचित आणि एमआयएमच्या उमेदवारीमुळे लंके यांच्या मतांचे विभाजन होऊन त्याचा फायदा महायुतीचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे यांना होईल, असे दिसते. जिल्ह्यातील बडे नेते खा. विखेंसोबत असल्याचे चित्र असतानाच लंके यांनी नेत्यांऐवजी सामान्य मतदारांना जवळ केल्याचे दिसून आले. सोबत असलेल्या नेत्यांच्या माध्यमातून विखेंची मतपेटी भरणार की सामान्यांच्या संपर्कावर लंके बाजी मारणार हे 4 जूनलाच कळेल. तोपर्यंत कोण सरस, कोणाची हवा गरम याविषयीच्या गप्पांचा फड रंगताना दिसतोय.


विखेंच्या पराभवासाठी पवारांचा ‘डाव’




1991 पासून विखे-पवार कुटुंबात राजकीय कटुता आहे. विखेंच्या पराभवासाठी पवारांनी अनेक राजकीय डाव टाकले; पण ते सगळे परतावून लावत विखेंनी बाजी मारली, असा आजवरचा इतिहास सांगतो. यंदा पवारांनी लंके नावाचा मोहरा पुढे केला. यासाठी त्यांनी स्वत: नगर, राहुरी आणि शेवगावात तीन सभा घेतल्या. या सभांतून पवारांनी विखेंवर टीकेचे बाण सोडले. मात्र, मंत्री विखे-पाटील व खा. डॉ. सुजय यांनी पवारांच्या आरोपांकडे दुर्लक्ष करत मतबांधणी सुरूच ठेवली आहे. शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार), मनसे, रिपाइं आणि महायुतीच्या घटक पक्षांची ताकद विखेंमागे असल्याने त्यांचे पारडे ‘वजनदार’ झाले आहे. तथापि, लंके यांनी थोपटलेले दंड आणि शरद पवार, बाळासाहेब थोरातांकडून त्यांना मिळणारी ‘रसद’ पाहता विखे-लंके सामना चुरशीचा दिसत आहे. (Sujay Vikhe Patil vs Nilesh lanke)


6 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी नगरमध्ये




शेवटच्या टप्प्यात विखेंसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या बड्या नेत्यांच्या सभा होणार आहेत. 6 मे रोजी मोदी हे नगरमध्ये विखेंसाठी सभा घेणार आहेत. त्याला प्रत्युत्तर म्हणून लंकेंकडून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा घेण्याचे नियोजन सुरू आहे. शरद पवार तर लंकेंसाठी नगरमध्ये ‘वॉच’ ठेवून आहेतच. आजपर्यंत तीन सभा घेतल्या, पुढेही ते आणखी सभा घेतील. त्यामुळेच 13 मे रोजी होणार्‍या मतदानाकडे नगरच्या विखे-लंके लढतीकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागून आहे.


http://dlvr.it/T6Bymb

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: