नेवासा : राजकारणात सत्तेपेक्षा निष्ठा महत्त्वाची : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे

July 24, 2022 0 Comments

https://ift.tt/OPKmijr

नेवासा : पुढारी वृत्तसेवा : ज्यांना शिवसेनेने मोठे केले, ते पक्षाला सोडून गेले. सत्ता असो वा नसो, परंतु निष्ठा महत्त्वाची असते. मात्र, संकटाच्या काळात आमदार शंकरराव गडाख यांनी मैत्री जपली. गडाख कुटुंबीयांनी शिवसेनेला दिलेली साथ व आमच्यावर दाखविलेला विश्वास कधीच विसरणार नाही, असे प्रतिपादन शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केले.

राज्यात नुकत्याच झालेला सत्ताबदल व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा महाराष्ट्रभर संवाद दौरा सुरू आहे. नेवासा फाटा येथे शनिवारी त्यांनी तालुक्यातील शिवसैनिकांशी संवाद साधला. नेवासा तालुका शिवसेनेच्या वतीने आदित्य ठाकरे यांचे युवानेते उदयन गडाख यांनी स्वागत केले. याप्रसंगी शिर्डी लोकसभा संपर्क प्रमुख आ. सुनील शिंदे, माजी खा. चंद्रकांत खैरे, आ. अंबादास दानवे, आ. उदयसिंह रजपूत, जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी, जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे आदी उपस्थित होते.

आदित्य ठाकरे म्हणाले, माजी मंत्री शंकरराव गडाख व गडाख कुटुंबियांनी संकट काळात साथ दिली. गडाख यांनी संवाद मेळावा घेऊन उद्धव ठाकरे यांना साथ देणार असल्याचे हजारो कार्यकर्त्यांसह सांगितले. त्यामुळे मला राज्यभर फिरण्यासाठी मोठे बळ व ऊर्जा मिळाली. सत्ता असो वा नसो, परंतु निष्ठा महत्त्वाची असते. ती निष्ठा शंकरराव गडाख यांनी जपली.

भर पावसातही युवा नेते गडाख शिवसैनिक व कार्यकर्त्यांसह संवाद यात्रेप्रसंगी हजारोंच्या संख्येने राहिले, याबद्दल त्यांनी नेवासकरांचे आभार मानले. याप्रसंगी नगर उत्तर शिवसेना जिल्हा अध्यक्ष रावसाहेब खेवरे, उदयन गडाख आदींनी मनोगत व्यक्त केले.

शिवसेना ही संपणारी नाही
ठाकरे कुटुंब हे राजकारण करणारे नसून, जनसेवा करणारे आहे. कोणी कितीही डाव प्रतिडाव करो, शिवसेना ही संपणारी नाही. आलेल्या संकटांना सामोरे कसे जायचे, हे शिवसेनेला नक्की माहिती आहे. शिवसैनिकांच्या साथीने गावागावांत जाऊन शिवसेना उभी करू. मुख्यमंत्री पद गेले व सत्ता गेली, याचे दुःख नाही. तर, आपल्या माणसांनी साथ सोडली, याचे दुःख आहे. सोडून गेलेल्यांना आजही मातोश्रीचे दरवाजे उघडे आहेत, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

उदयन गडाख यांच्याकडून स्वागत
नेवासा फाटा येथे सुरू असलेल्या पावसातही युवानेते उदयन गडाख यांनी हजारो कार्यकर्त्यांसह युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. याप्रसंगी भगवे ध्वज घेतलेले व भगवे उपरणे परिधान केलेले शिवसैनिक व शिवसेना जिंदाबादाच्या घोषणा यांनी नेवासा फाटा परिसरात वातावरण शिवसेनामय झाल्याचे पहायला मिळाले होते.

The post नेवासा : राजकारणात सत्तेपेक्षा निष्ठा महत्त्वाची : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/hlEeLIP
via IFTTT

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: