सैन्यदलात अग्नीवीरांच्या भरतीचा कंत्राटदार कोण? जितेंद्र आव्हाडांचा केंद्र सरकारला बोचरा सवाल

June 20, 2022 0 Comments

सैन्य दलात अग्नीवीर या नावाखाली सैनिकांची भरती केली जाणार आहे. पण, त्यांना सैनिक म्हणू शकत नाही. आपण त्यांना कंत्राटी कामगार असेच म्हणू, त्या कंत्राटी कामगारांचा कंत्राटदार कोण असेल? असा सवाल गृहनिर्माण व अल्पसंख्यांक मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मोदी सरकारला विचारला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

मंत्री आव्हाड म्हणाले की, भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांनी भाजपची मानसिकता बोलून दाखविली. ते म्हणाले,”जर मला भाजपने सर्व कार्यालयांचा सिक्युरिटी इंचार्ज केला. तर चार वर्षांनंतर जे अग्नीवीर बाहेर पडतील. त्यांना भाजपाच्या कार्यालयावर सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी देऊ शकेन. ” म्हणजे काय तर वॉचमन! या तरुणांचे नेमके काय करायचे ठरवलेय, असा सवालही आव्हाड यांनी विचारला आहे.

दुसरीकडे, किशन रेड्डी नावाचे केंद्रीय मंत्री म्हणतात, “या चार वर्षात तरुणांना नाभिकाचे, धोब्याचे, चालकाचे, इलेक्ट्रिशियनचे प्रशिक्षण मिळेल”. म्हणजे सैन्यात या तरुणांना नाभिक, धोबी, चालक, इलेक्ट्रिशियन बनविण्यासाठी नेणार आहात काय? असा बोचरा सवाल आव्हाडांनी केंद्र सरकारला विचारला आहे. “भाजपच्या नेत्यांना आणि केंद्रीय मंत्र्यांना अग्निपथ आणि अग्निवीर याबद्दल काहीही माहिती नाही. हा प्रकार म्हणजे देशातील तरुणांच्या भविष्याशी खेळण्याचा प्रयत्न आहे”, असंही ते म्हणाले.

“भारतीय सेना कंत्राटावर चालू शकत नाही. या भूमीवर ज्याचे मनापासून प्रेम आहे. तो परीक्षेआधी तीन-तीन वर्षे मेहनत करतो, तो अभ्यास करताना भारतीय सैन्यात जायची, स्वप्न पाहतो. त्याच्या स्वप्नांचा चुराडा होताना दिसतोय. सर्वात आधी १३० कोटी जनतेच्या मनात एक प्रश्न राहिल की, ते सैन्य दलात कंत्राटी कामगार होणार आहेत. कारण आपण त्यांना सैनिक म्हणूच शकत नाही. त्या कंत्राटी कामगाराचा कंत्राटदार कोण असेल? नियमित होणाऱ्या सैन्यभरती थांबवून हे थोतांड सुरू करणं, देशासाठी घातक ठरेल,” असंही आव्हाड यावेळी म्हणाले.

पुढे बोलताना त्यांनी म्हटलं, “अग्नीवीर हा प्रकार बहुजनांच्या आयुष्याशी खेळ आहे. कारण सैन्यात बहुजनांचीच मुलं जात असतात ना! आपल्या गावातला सैनिक जेव्हा शहीद होतो, तेव्हा संपूर्ण गाव रडतं. कारण तो आपल्यासाठी गोळ्या झेलतो. अशी देशसेवा करणाऱ्या एका वर्गाचा हा सर्वात मोठा अपमान आहे.”

अमित शाह यांनी अग्नीवीरांना दहा टक्के आरक्षण दिले जाईल, असे म्हटले आहे. याबाबत विचारले असता डॉ. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “कंत्राटावर सैन्यभरती करणे हे देशाच्या सुरक्षेशी द्रोह करणे आहे. ज्या तरुणाला अत्याधुनिक शस्रे चालविता येतात. त्याला जर उद्या नोकरी नाही मिळाली तर तो काय करेल? देशसेवेसाठी सैन्यात भरती होण्यासाठी तरुण तीन-तीन वर्षे मेहनत करतात; पण,अग्नीवीरांच्या निमित्ताने तारुण्याची टिंगलटवाळी चालू आहे. नोकऱ्या देऊ शकत नसाल तर देऊ नका, पण, सैन्यदलाची आणि तरुणांची चेष्टा करू नका, असेही आव्हाड म्हणाले.



https://ift.tt/V4jdS8r

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: