पाच दिवसांच्या रखडपट्टीनंतर मोसमी पावसाची पुन्हा आगेकूच ;  केरळमधून भारतातील प्रवेशाबाबत आता उत्सुकता

May 27, 2022 0 Comments

पुणे : दक्षिण अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये गेली पाच दिवस रखडलेल्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अखेर सहाव्या दिवशी भारताच्या दिशेने आगेकूच सुरू केली आहे. पुढील ४८ तासांत मोसमी वारे आणखी प्रगती करतील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे. मोसमी वाऱ्यांचा प्रवास पुन्हा सुरू झाला असल्याने आता ते केरळमधून भारतात कधी प्रवेश करणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

यंदा सर्वसाधारण वेळेपेक्षा तब्बल सहा दिवस आधी म्हणजे १६ मे रोजी मोसमी पाऊस अंदमानात दाखल झाला. मोसमी वारे मोठ्या प्रमाणावर बाष्य घेऊन आल्याने मोसमी पावसाची प्रगती वेळेआधीच झाली होती. मात्र, त्यानंतर मोसमी वाऱ्यांचा प्रवास दिवसाआड होऊ लागला. बंगालच्या उपसागरात १७ आणि १९ मे रोजी मोसमी वाऱ्यांनी प्रगती केली होती. मात्र, अरबी समुद्रात त्यांचा प्रवेश झाला नव्हता. अखेर २० मे रोजी दक्षिण अरबी समुद्रात मोसमी वारे पोहोचले. त्यामुळे ते केरळच्या दिशेने वेगाने येतील, अशी शक्यता निर्माण झाली असतानाच वातावरणात बदल झाला. पोषक स्थिती दूर झाली आणि मोसमी वाऱ्यांचा प्रवास रखडला. दक्षिण अरबी समुद्रात २० मे रोजी दाखल झालेल्या मोसमी वाऱ्यांचा प्रवास २५ मेपर्यंत थांबला. याच कालावधीत बंगालच्या उपसागराच्या दिशेनेही मोसमी वाऱ्यांनी कोणतीही प्रगती केली नाही. त्यामुळे त्यांच्या प्रवासाबाबत चिंता व्यक्त केली जात असतानाच हवामान विभागाने मोसमी वाऱ्यांच्या प्रवासाला पोषक वातावरणाचा अंदाज व्यक्त केला. त्यानुसार २६ मे रोजी दक्षिण अरबी समुद्रात मोसमी वाऱ्यांनी मोठी प्रगती केली. या भागात वारे मालदिव आणि कोमोरीनजवळ पोहोचले आहेत. बंगालच्या उपसागरातही त्यांनी प्रगती केली आहे. पुढेही मोसमी वाऱ्यांच्या प्रवासाला पोषक वातावरण असल्याने पुढील ४८ तासांमध्ये ते मालदिवसह, लक्षद्विप परिसराजवळ दाखल होऊ शकतात, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून सध्या केरळसह दक्षिणेकडील बहुतांश भाग आणि मध्य तसेच उत्तर-पूर्व भागात पाऊस होतो आहे.

https://ift.tt/dVQz2lX

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: