“पंढरपूर, तिरुपती ही मंदिरं नसून पूर्वीची बौद्ध विहारेच, आम्ही हजारोंच्या संख्येनं तिथे…”, भीम आर्मीनं दिला इशारा!

May 27, 2022 0 Comments

डॉ. आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य सचिव आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. प्रदीप आगलावे यांनी दोनच दिवसांपूर्वी जगन्नाथपुरी (ओरिसा), तिरुपती बालाजी( आंध्र प्रदेश), पंढरपूर, कांचीपुरम (तामिळनाडू), महाकाली( उज्जैन) इत्यादी असंख्य प्रसिद्ध मंदिरे ही पूर्वीची बौद्ध विहारे, बौद्ध स्तूप असल्याचा दावा केला आहे. या मुद्द्यावरून सध्या संमिश्र प्रतिक्रिया उमटत असतानाच भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी पंढरपूरला हजारोंच्या संख्येने बुद्धवंदना घ्यायला जाणार असल्याचा इशारा दिला आहे. काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंच्या औरंगाबाद सभेमध्ये नियमांचं उल्लंघन झाल्यास तिथेच घोषणाबाजी करण्याचा देखील इशारा अशोक कांबळे यांनी दिला होता. तेव्हा ते चर्चेत आले होते.

डॉ. आगलावे यांचा नेमका दावा काय?

डॉ. आगलावे यांनी भारतातील प्रसिद्ध मंदिरे ही पूर्वीची बौद्ध विहार आणि स्तूप असल्याचा दावा केला आहे. “संशोधकांनी भारतातील अनेक प्रसिद्ध मंदिरे ही पूर्वीची बौद्ध विहारे होती हे सिद्ध केले आहे. प्रबोधनकार केशव ठाकरे यांनी ‘देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे’ (१९२९) या पुस्तकात स्पष्टपणे नमूद केले आहे की, ‘ठिकठिकाणच्या बौद्ध विहारांतल्या पवित्र वास्तूंचा आणि बौद्धमूर्तींचा उच्छेद केला गेला आणि तेथे शंकराच्या पिंडी तयार करण्यात आल्या”, असे आगलावे म्हणाले आहेत.

तसेच, “कित्येक ठिकाणी तर अशा रीतीने बौद्ध विहारांचे रुपांतर शंकराच्या देवळात झाले. लोणावळ्याजवळची कार्ला लेणी पाहा. ही वास्तविक बौद्धांची. तेथे एक देवी प्रकट झाली. तिचे नाव एकविरा. ही म्हणे पांडवांची बहीण”, असे डॉ. आगलावे यांनी लोकसत्ताला पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे.

“पंढरपूरसह देशातील अनेक प्रसिद्ध मंदिरे पूर्वीची बुद्ध विहारे, स्तूप”; प्रबोधनकार, आंबेडकरांचा संदर्भ देत डॉ. आगलावेंचा दावा

“हजारोंच्या संख्येनं पंढरपूरला जाणार”

दरम्यान, यासंदर्भात बोलताना भीम आर्मीने मुख्यमंत्र्यांनी पंढरपूर हे बौद्ध विहार असल्याचं घोषित करावं, अशी मागणी केली आहे. “डॉ. आगलावे यांनी जी भूमिका मांडली तिला आमचं समर्थन आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या रिडल्स इन हिंदुइजम या पुस्तकात लिहिलं आहे की तिरुपती बालाजी इथली मूर्ती तथागत गौतम बुद्धांची आहे आणि ते विहार आहे. पंढरपूरच्या मंदिरात गौतम बुद्धाची मूर्ती असून तेही विहार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे, तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात. आपण पंढरपूरचं मंदिर विहार आहे असं घोषित करावं. तिथे हजारोंच्या संख्येनं आम्ही बुद्धवंदना घ्यायला जाणार आहोत”, असं अशोक कांबळे म्हणाले आहेत. “आम्ही कुणाच्या धर्माच्या विरोधात नाही. आम्ही द्वेषाचं राजकारण करत नाही”, असं देखील अशोक कांबळे म्हणाले आहेत.

https://ift.tt/dVQz2lX

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: