१६ वर्षांच्या प्रवासात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काय कमावलं काय गमावलं ?

March 09, 2022 , 0 Comments

Maharashtra Navnirman Sena president Raj Thackeray

“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब हेच आपले दैवत आहेत. मात्र आपल्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं आहे. माझा लढा हा विठ्ठलाशी नाही तर त्याच्या भोवतालच्या बडव्यांशी आहे”,  हे शब्द होते राज ठाकरेंचे. जेंव्हा त्यांनी शिवसेना सोडली.

बाळासाहेबांच्या डोळ्यादेखत शिवसेनेत फूट पडली आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जन्म झाला.. त्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे असं पर्व सुरु झालं. आज मनसे १६ वर्षांची झाली आहे. आजही निवडणुकांचा निकाल काहीही येवो पण राज ठाकरेंच्या भाषणांची क्रेझ कमी होत नाही …..फक्त एकच आमदार असुनही “मनसे” विरोधक म्हणून उभी आहे.. १३ आमदार ते १ आमदार , मनसेने १६ वर्षांत काय कमावलं काय गमावलं याचा हा धावता आढावा.

महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या हक्कासाठी लढण्याचं जाहीर करत राज ठाकरेंनी ९ मार्च २००६ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. मनसेत गेल्या १६ वर्षात अनेक बदल झाले. आज शिवसेना महाराष्ट्रात सत्तेत आहे, महापालिकेतही त्यांचं वर्चस्व आहे. पण जेंव्हा जेंव्हा मुद्दा मराठी अस्मितेचा मुद्दा निघतो तेंव्हा महाराष्ट्राला राज ठाकरेच आठवतात.

यामागचं कारण म्हणजे मनसेने मराठी अस्मितेसाठी केलेली आंदोलनं…

खासकरून २००८ आणि २००९ या दोन वर्षांमध्ये राज ठाकरे यांचा वरचष्मा राहिला.  २००८ ला रेल्वेमध्ये मराठी पोरांना संधी मिळत नाही म्हणून बिहारी परीक्षार्थीना मारहाण करणं असू दे की परप्रांतीयांच्या विरोधातलं आंदोलन असू दे, हिंदी भाषेच्या सक्तीला केलेला विरोध, उत्तर भारतातील राज्यांमधून येणाऱ्या नागरिकांच्या लोढ्यांना केलेला विरोध, या प्रत्येक आंदोलनात लाखो मनसेसैनिक राज ठाकरेंच्या मागे उभे राहत होते.त्यातही सगळ्यात महत्वाचं मराठी पाट्यांचं आंदोलन. महाराष्ट्रातल्या दुकानांवर मराठी पाट्या असल्याच पाहिजेत, असा कायदा असताना कायद्याची अमंलबजावणी का होत नाही असं म्हणत राज ठाकरेंनी एका नव्या मुद्याला हात घातला होता….

खळ्ळ-खटयाकच्या भाषेतच मनसेचे कार्यकर्ते दुकानदारांना कायदा ‘समजावून’ सांगत होते. हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते जेलमध्ये जात होते मात्र महाराष्ट्रभर खळ्ळखट्याक मात्र काय थांबत नव्हतं.

नुकतंच कॉलेज झालेली किंवा कॉलेजात गेलेली पोरं या आंदोलनात पुढं होती. ना पदाची अपेक्षा ना पैशाची हाव, फक्त मराठी अस्मितेच्या नावाखाली ही पोरं मैदानात उतरली होती. राज ठाकरे तरुणांची डोकी भडकवत आहेत असा आरोपही होत होता मात्र मराठी अस्मितेचा मुद्दा तरुणांमध्ये घेऊन जाण्यास राज ठाकरे यशस्वी झाले होते. 

तेंव्हा शिवसेनेचे कट्टर समर्थकसुद्धा ‘मनसे’कडे झुकू लागले होते….

हे आंदोलन नंतर शांत झालं मात्र याचा मनसेला राजकीय फायदा झाला असं राजकीय जाणकार सांगतात.

महत्वाचं म्हणजे शिवसेनेकडून मराठीचा मुद्दा खेचून आणण्यात राज ठाकरे यशस्वी झाले. मुंबईत दादर असू दे की पुण्याचा लक्ष्मी रोड असू देत…मनसेच्या कार्यकर्त्यांनी दुकानावरच्या पाट्या दाखवत मतं मागितली होती आणि लोकांनीही त्यांना त्यांच्या या कामाला भरभरून प्रतिसाद दिला होता.

२००९ ला लोकसभेत मनसेला यश मिळाल नाही पण २००९ सालच्या विधानसभा निवडणुकीत मनसे स्वबळावर उतरली. राज ठाकरेंनी केलेल्या करिश्म्यामुळे मनसेचे तब्बल १३ आमदार निवडून आले. त्यावेळचा निकाल बघून बऱ्याच राजकीय तज्ज्ञांनी मत मांडली की, मनसे शिवसेनेला ओव्हरकम करणार.

आजपर्यंतचा एकंदर महापालिकेचा मनसेचा ग्राफ बघता, २००७ मध्ये मुंबई महापालिकेच्या  निवडणूकीत मनसेचे ७ नगरसेवक निवडून आले होते. २००७ मध्ये पुणे महानगरपालिकेत ८, नाशिक महानगरपालिकेत १२ आणि ठाणे महापालिकेत ३ नगरसेवक निवडून आले होते. 

पण खरा इतिहास घडला २०१२ साली. 

नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत मनसेचे तब्बल ४० नगरसेवक निवडून आले आणि राष्ट्रवादीच्या मदतीनं त्यांनी सत्तेची पाच वर्ष पूर्ण केली. पुणे महापालिकेत २९ नगरसेवक निवडून आले होते. त्याचवेळी पिंपरीत मनसेचे ४ नगरसेवक होते.

मनसेचा बोलबाला चालू असूताना पक्षाला उतरती कळा लागली….

२०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेची कुठेही चुणूक दिसली नाही. मोदी लाटेला समर्थन देऊनही राज यांना काहीच फायदा झाला नाही.त्यापाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेचा केवळ एक आमदार निवडून आला होता ते म्हणजे जुन्नरमधून शरद सोनवणे. २०१७ साली झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत ७ नगरसेवक निवडून आले खरे. पण पुढे सहा नगरसेवक शिवसेनेत गेले आणि उरला फक्त एकच. २०१९ च्या विधानसभेत मनसेला फक्त एकच जागा मिळाली.

या सगळ्यात राज ठाकरेंना अनेक महत्वाचे शिलेदार सोडून गेले आणि संघटनात्मक पातळीवर मनसे दुर्बल झाली.

२००९ मध्ये जे १३ आमदार निवडून आले होते त्यातले अनेकजण राज ठाकरेंना सोडून गेले.

मनसेमध्ये दाबादाबीचं राजकारण सुरू होतं असं म्हणत राम कदम यांनी मनसे सोडली ते आत्ता भाजपचे आमदार आहेत. वसंत गीते हे मनसे सोडून भाजपमध्ये गेले. कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनीही मनसे सोडली. शिवसेना खासदार हेमंत गोडसे हे देखील कधीकाळी मनसेत होते. 

आणखी एक महत्त्वाचं नाव म्हणजे, प्रवीण दरेकर. राज ठाकरेंनी मनसे स्थापन केली तेंव्हा दरेकरांनी त्यांना साथ दिली. मनसेच्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत दरेकर मुंबईतल्या मागाठाणे मतदार संघातून निवडून आले होते. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत दरेकर पडले आणि त्यांनी मनसे सोडत भाजपमध्ये प्रवेश केला. 

मनसेचे माजी आमदार मंगेश सांगळे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. २००९ मध्ये मनसेचे आमदार म्हणून निवडून आलेले आणि राज ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे शिशिर शिंदे यांनीही मनसे सोडली आणि शिवसेनेत दाखल झाले. तसेच मनसेचे माजी आमदार नितीन भोसले भाजपमध्ये गेले. रमेश पाटील हे २००९ मध्ये कल्याण ग्रामीणचे आमदार म्हणून निवडून आले होते, मनसे सोडून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

त्या १३ आमदारांमध्ये ज्या आमदारांनी मनसेची साथ सोडली नाही त्यातले एक म्हणजे, बाळा नांदगावकर. प्रत्येक प्रसंगात राज ठाकरे यांच्या सोबत ते सावली बनून राहतात. नितीन सरदेसाई, प्रकाश भोईर हे अजूनही मनसेत आहेत.

मनसेची बदलेल्या भूमिकेबाबत बोलायचं झालं तर, 

मनसेच्या भूमिकेमध्ये सातत्य नाही असा आरोप होतो. प्रत्येक निवडणुकीमध्ये बदलणारी भूमिका, निवडणूक लढणार की नाही याबद्दल साशंकता यामुळे अनेकदा पक्षाच्या भूमिकेबाबत अनिश्चितता निर्माण होते. महाराष्ट्रात राहणाऱ्या बिगर मराठी लोकांना कट्टर विरोध करणाऱ्या मनसेची भूमिका सॉफ्ट होत गेली… मराठी माणूस, मराठी भाषा आणि मराठी संस्कृतीचा आदर केला तर आम्ही त्यांना विरोध करणार नाही या मतावर आता मनसे आहे. हिंदूत्वाचा मुद्दा मोठा करत राज ठाकरेंनी मनसेचा झेंडा बदलला. त्यांची हि भूमिका भाजपसाठी पूरक भूमिका असल्याच्या बातम्या मध्यंतरी आल्या.

मनसे छुप्या पद्धतीने भाजपला पाठिंबा देतय हेही बोललं जातं.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं तसं मनसेने बरीच आंदोलने केलीत…मनसेने CAA आणि NRC या कायद्यांना जाहीर पाठिंबा देत महाराष्ट्र सरकार विरोधी भूमिका घेतली होती.  तसेच ज्येष्ठ लेखिका शोभा देशपांडे यांच्यासोबत मुंबईत मराठी भाषेत बोलण्यास नकार देणाऱ्या सराफाला मनसेने मारहाण केली होती. या घटनेच्या निमित्ताने मराठीच्या मुद्द्यावरून मनसे पुन्हा एकदा आक्रमक झाल्याची दिसून आलं होतं.

तसेच लॉकडाऊन दरम्यान देखील मनसे बरीच ऍक्टिव्ह होती. यादरम्यान अनेक संघटनांनी मनसेची सत्ता नसतानादेखील राज ठाकरेंची भेट घेतली होती, त्यात मुंबईचे डब्बेवाले, बेस्ट कर्मचारी, डॉक्टर्स, रिक्षाचालक संघटना, विधार्थी संघटना होत्या. आणखी एक म्हणजे रेल्वे सेवा लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी करत मनसेने सविनय कायदेभंग आंदोलन केलं होतं.. राज्यातील वाढीव वीज बील आणि दूध दरासाठी  राज ठाकरेंनी राज्यपालांच्या भेटी घेतली होती. अलीकडेच झालेल्या एसटी आंदोलनाला देखील त्यांचे समर्थन होते…

मनसेच्या एकंदरीत प्रवासाबद्दल ज्येष्ठ पत्रकार सुधीर सूर्यवंशी म्हणतात,

 “मनसेने सुरुवात खूप चांगली केली होती. इंग्रजीत म्हणलं जातं की, well begun is half done पण मनसेच्या बाबतीत नेमकं उलटं झालं.  प्रॉमिसिंग आणि पोटेन्शियल पार्टी असून मनसे वाढू शकली नाही. महाराष्ट्रामध्ये स्ट्रॉंग रिजनल पक्ष आहेत, नॅशनल पक्ष आहेत. त्यात स्पेस निर्माण करणे कठीण काम होतं ते राज ठाकरेंनी सुरुवातीला करून दाखवलं. पण कार्यकर्त्यांचं नेटवर्क, पक्ष वाढवण्याची मेहनत, या गोष्टींच्या अभावामुळे मनसेला १५ वर्षे झाली तरी जितकी स्ट्रॉंग व्हायला हवी होती तितकी झाली नाही. बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर शिवसेनेला मनसे कॅप्चर करेल कि काय, आणि शिवसेना नेस्तनाबुत होईल असं वाटत होतं, पण तसं झालं नाही. शिवसेनेने त्यांचा बुरुज राखला. आणि मनसे फक्त मनसेच राहिली. आता मनसेने हिंदुत्वाचा जो अजेंडा घेतलाय पण ऑलरेडी भाजप आणि शिवसेना सॉफ्ट हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन चालतेय.  त्यात मनसे मागे आहे. आता इथून पुढे मनसे किती पास होईल याबद्दल साशंकता आहे’ असं मत त्यांनी व्यक्त केलं. 

थोडक्यात मनसेची सुरूवात दणक्यात झाली. पण सातत्य राहिलं नाही, याऊपर बाळासाहेबांच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंचा निभाव लागणार नाही असं वाटत असतांना त्यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद मिळवलं.

मनसे आज १६ वर्षांची झाली असतांना राज ठाकरेंनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हावं असं अनेक मनसैनिकांना वाटतं पण त्यासाठी मनसे पुन्हा ऊभारी घेईल का ? हे पाहणं महत्वाचं आहे. बाकी मनसेला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !

हे हि वाच भिडू :

 

 

 

 

The post १६ वर्षांच्या प्रवासात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काय कमावलं काय गमावलं ? appeared first on BolBhidu.com.



Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: