गुढीपाडवा ह्या मराठमोळ्या सणाचे आहे ‘ हे ‘ महत्व; जाणून घ्या पौराणिककथा
गुढीपाडवा हा दिवस भारतीयांचा पारंपारिक सण म्हणून ओळखला जातो. हिंदू दिनदर्शिकेनुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो. याच दिवसापासून मराठी नवीन-वर्षाची सुरुवात होते, तसेच हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक दिवस मानला जातो. संपूर्ण महाराष्ट्रात गुढीपाडवा अत्यंत जल्लोषात आणि उत्साहात साजरा केला जातो. या वर्षी मंगळवार दिनांक १३ एप्रिल २०२१ ला गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे, मात्र गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी कोरोनाचा कहर लक्षात घेता घरच्या घरी गुढीपाडवा साजरा करू.
गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून पारंपारिक वस्त्र परिधान केले जातात. घराच्या दारासमोर रांगोळी काढली जाते. एका बांबूच्या टोकाला नवीन साडी किवा जरीचे वस्त्र, साखरेची माळ, फुलांची माळ,आणि कडुलिंबाची पाने लावून त्यावर ताब्याचा गडू किवा लोटा उपडा घातला जातो, आणि अश्याप्रकारची गुढी घरोघरी उभारली जाते. प्रसाद म्हणून पुरणपोळी आणि गुळासोबत कोवळी कडूलिंबाची पाने खाण्याची प्रथा आहे.
गुढीपाडव्याच्या दिवशी पंचांग वाचन आणि सरस्वती पूजन करून नवीन वर्षाची सुरुवात केली जाते. चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस कर्नाटक आणि आंध्रप्रदेश या राज्यांत स्वतंत्र दिन किवा विजय दिनम्हणून साजरा करतात. प्रामुख्याने महराष्ट्रात या दिवसाला गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो. तसेच सिंधी लोक चेटीचंड म्हणून हा सण साजरा करतात.
गुढीपाडव्याचे महत्त्व:-
गुढीपाडव्याचे पारंपारिक आणि सामाजिक महत्व आहे. कडुलिंबामध्ये विविध रोगांवर मात करण्याचा औषधी गुणधर्म आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंब आणि गुळ एकमेकांना प्रसाद म्हणून दिला जातो आणि एकमेकांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. लोकसंस्कृतीमध्ये यालाच तर महत्वाचे स्थान आहे. तसेच वेगवेगळ्या प्रकारचे दानधर्म करून आपल्या परंपरेचा आदर वाढवला जातो.
गुढीपाडव्याच्या दिवशी अनेक ठिकाणी स्त्रिया पहाटे लवकर उठून सांस्कृतिक कार्यक्रम करतात. हा दिवस नवी पहाट म्हणून नवीन कामाला जोमाने सुरुवात करतात. गुढीपाडवा हा दिवस ऐतिहासिक दृष्ट्या देखील महत्वाचा मानला जातो. बहिणाबाई चौधरी, संत एकनाथ, संत नामदेव, संत जनाबाई, विष्णुदास नामा यांसारख्या संतानी आपल्या अभंगातून गुढीपाडव्याचे वर्णन केलेले दिसून येते.
गुढीपाडव्याविषयीच्या पौराणिक गोष्टी:-
गुढीपाडव्याविषयी अनेक पौराणिक गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात. त्यातील एक म्हणजे महाभारताच्या आदिपर्वात उपरिचर राजाने इंद्राने त्याला दिलेली बांबूची काठी इंद्राच्याच जमिनीत रोवलीआणि तिची पूजा नववर्ष प्रारंभ म्हणून केली. या परंपरेचा आदर म्हणून इतर राजे त्या काठीला वस्त्र लावून, फुलांच्या माळा घालून पूजा करत होते.
गुढीपाव्याविषयी आजून एक कथा म्हणजे श्री राम चौदा वर्ष वनवास भोगून तसेच रावण आणि इतर राक्षसांचा वध करून आयोध्येत पुन्हा आगमन केले होते. म्हणून तो दिवस गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो.
तसेच आदिमाता पार्वती आणि महादेव यांचे लग्न पाडव्याच्या दिवशी ठरले होते. पाडव्यापासून विधींना सुरवात होऊन अक्षय तृतीयेला लग्न पार पडले. म्हणून ठिकठिकाणी पार्वतीच्या शक्ती रूपांची पूजा केली जाते. अश्याप्रकारे महत्व या दिवसाला आहे.
0 Comments: