साधू-संतांच्या लसीकरणाची मागणी; दोन दिवसांत निर्णय होणार
म. टा. प्रतिनिधी, नगर: सध्या नागरिकांसाठी करोना प्रतिबंधक लसीकरण सुरू असले तरी त्यातील नियम व अटींमुळे सर्व धर्मांचे साधु-संत वंचित राहिले आहेत. खास बाब म्हणून त्यांचे लसीकरण करण्यासंबंधी दोन दिवसांत निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांनी दिले. अखिल भारतीय जैन श्वेतांबर गुजराती समाज महासंघाच्या वतीने सर्व जैन धर्मीय साधु-साध्वी व सर्व धर्मीय साधुसंतांना तातडीने लसीकरण करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. त्यांच्या शिष्टमंडळाला राज्यंत्र्यांनी हे आश्वासन दिले. अखिल भारतीय जैन श्वेतांबर गुजराती समाज महासंघाच्या वतीने अल्पसंख्यांक समितीचे उपप्रमुख यश प्रमोद शहा यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, ही साधुसंताची भूमी म्हणून ओळ्खली जाते. राज्यात ठीकठीकाणी वास्तव्यास असणाऱ्या सर्व धर्मीय साधुसंतांना तातडीने कोविड लसीकरण करणे गरजेचे आहे. मात्र लसीकरणासाठी आधारकार्ड, नोंदणी वगैरे प्रक्रिया करावी लागते. याची पूर्तता होत नसल्याने साधू-संत लसीकरणापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देऊन हे लसीकरण तातडीने करावे, अशी मागणी शहा यांनी केली आहे. आऱोग्य मंत्री , अल्पसंख्यांक विभागाचे मंत्री नवाब मलिक, राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्याकडेही ही मागणी करण्यात आली. अखिल भारतीय जैन श्वेतांबर गुजराती समाज महासंघाच्या वतीने आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर यांची प्रत्यक्ष भेट घेण्यात आली. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र शाह, तेजपाल शाह, अरविंद मणियार, प्रकाश शाह, युवराज शाह, स्वप्निल शाह उपस्थित होते. त्यांनी मंत्र्यांशी चर्चा करून याचे गांभीर्य लक्षात आणून दिले. त्यानंतर बोलताना राज्यमंत्र्यांनी यासंबंधी येत्या दोन दिवसांत योग्य तो निर्णय घेण्यात येईल. कोणीही लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असे आश्वासन दिले.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: