'विचार करावा'; रोहित पवारांची ठाकरे सरकारला विनंती
मुंबईः राज्यात करोनाचा संसर्ग पुन्हा वाढत आहे. संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने मिनी लॉकडाऊन जाहीर केला आहे. करोनाची साखळी तोडण्यासाठी शनिवारी आणि रविवारी पूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळं रविवारी ११ एप्रिल रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षेवर अनिश्चिततेचे सावट पसरले आहे. यावर बोट ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांनी राज्य सरकारकडे एक विनंती केली आहे. राज्य सरकारने रविवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत ३० एप्रिलपर्यंत कठोर निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला. त्यात शनिवारी व रविवारी असे दोन दिवस पूर्णपणे लॉकडाऊन असणार आहे, करोना रुग्णांची संख्या वाढत असून, आता स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. यावरुनच यांनी राज्य सरकारकडे एक विनंती केली आहे. त्यांनी तसं एक ट्वीट केलं आहे. 'लॉकडाऊन असताना रविवारी होणाऱ्या एमपीएससी परिक्षेसाठी वाहतूक व्यवस्थेबाबत स्पष्टता यायला हवी. परीक्षा होणार असेल तर करोनाचे नियम काटेकोरपणे पाळले जावेत. तसंच, बाधित मुलांची वयोमर्यादा संपत असेल तर त्यांना आणखी एक संधी देण्याबाबत सरकारने विचार करावा, ही विनंती,' असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: