'राहुल गांधींना आजीच्या निर्णयाबद्दल माफी मागण्याचे कारण काय?'

March 07, 2021 0 Comments

मुंबईः 'आणीबाणी चुकीची होती अशी खंत आता यांनी व्यक्त केली. तशी गरज होती काय? आणीबाणीतील चुकीच्या घटनांबद्दल जनतेनं इंदिरा गांधी यांना धडाही शिकवला व नंतर माफ करुन सत्तेत आणले. हा विषय आता कालबाह्य झाला आहे. पुनः पुन्हा दळण का दळायचे?,' असा सवाल शिवसेनेचे खासदार यांनी उपस्थित केला आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीचा निर्णय चुकीचा होता, असं विधान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलं होतं. राहुल गांधी यांच्या या विधानावर संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. सामनाच्या रोखठोक सदरातून राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरुन रंगलेल्या राजकारणावरुन राऊत यांनी फटकारलं आहे. राहुल गांधी यांना आजीच्या निर्णयाबद्दल माफी मागायचे कारण काय?, आणीबाणी हा विषय कालबाह्य झाला असून तो कायमचाच जमिनीखाली गाडला पाहिजे, असं राऊतांनी म्हटलं आहे. संजय राऊतांनी काय म्हटलंय? 'आज देशाची परिस्थिती 'आणीबाणी बरी होती' असे म्हणावे अशीच आहे. तापसी पन्नू, अनुराग कश्यपसह चारजणांवर आयकर विभागाने छापे मारल्याचे वृत्त हा मजकूर लिहीत असताना आले. हे चौघे सतत देशातील सद्यस्थितीवर खुलेपणाने बोलत असतात. कदाचित टीकाही करीत असतात. आता या चारजणांवर इन्कम टॅक्सच्या धाडी पडल्या. म्हणजे हिंदी सिनेसृष्टीतले हे चारजण सोडून बाकी सगळे 'साव आहेत,' असं म्हणत केंद्रावर निशाणा साधला आहे. 'आणीबाणीचा विषय आता कालबाहय़ झालेला आहे. इंदिरा गांधींनी आणीबाणीत निरपराध लोकांना जो त्रास झाला, कुटुंब नियोजनाच्या मोहिमेत लोकांना जो जुलूम सहन करावा लागला त्याबद्दल खेद प्रदर्शित केला. वृत्तपत्रांवर सेन्सॉरशिप बसविण्यात चूक झाली असे जाहीरपणे कबूल केले आणि पुन्हा आणीबाणी आणणार नाही असे वचनही दिले होते, पण तरीसुद्धा त्यांनी अंतर्गत आणीबाणी जाहीर करण्यात आपण चूक केली असा पश्चात्ताप मुळीच केला नाही,' असंही राऊतांनी म्हटलं आहे. 'आणीबाणी म्हणजे लोकशाही रुळावरून घसरली असे तिचे वर्णन खुद्द इंदिरा गांधींनीच केले होते. प्रक्षोभाचा डोंब उठून जेव्हा अराजक निर्माण झाले आणि तसा भयानक धोका निर्माण झाला, त्यावेळीच आणीबाणी जाहीर करण्यात आली. संप, बंद, घेराव यांनी त्या काळात उच्छाद मांडला होता. सर्वसामान्य जीवनाची अवस्था या 'बंद'वाल्यांनी बिकट करून सोडली होती. राजकीय खून व स्फोट घडविले जात होते. हे राष्ट्रावरचे संकटच होते,' असं राऊत म्हणाले. 'इंदिरा गांधी यांच्या पाठीशी प्रचंड बहुमत असूनही देशात राजकीय अस्थिरता वाढू लागली. त्यातून आणीबाणीचा भस्मासुर उदयास आला, पण पुन्हा आणीबाणी आणणार नाही या इंदिराजींच्या आश्वासनावर जनतेने विश्वास ठेवला व फक्त तीन वर्षांत पुन्हा त्यांना सत्तेवर आणले. म्हणजे जनतेने त्यांना माफच केले. मग राहुल गांधी यांना आजीच्या निर्णयाबद्दल माफी मागायचे कारण काय? आणीबाणी हा विषय कालबाहय़ झाला आहे. तो कायमचाच जमिनीखाली गाडला पाहिजे,' असा सल्लाही राऊतांनी गांधींना दिला आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: