मुंबईकरांनो, शिमग्याला गावी जाताय?; 'हे' आहेत नियम
म. टा. प्रतिनिधी, मुंबई मुंबईतील चाकरमान्यांना गावच्या शिमग्याच्या सणाचे वेध लागलेले आहेत. मात्र करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शिमग्यासाठी नियमावली आणि काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यात मुंबईतील ग्रामस्थांना शक्यतो गावी न येण्याचे आवाहन करावे. तसेच होळीचा कार्यक्रम ऑनलाइन, केबल नेटवर्क, वेबसाइट इत्यादी माध्यमांद्वारे पाहण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, सांगण्यात आले आहे. तसेच पालखीला ५०हून अधिक लोक नसतील याची खबरदारी घेण्यास सांगण्यात आले आहे. शिमगोत्सवासाठी मुंबई-पुण्याहून बरेच नागरिक रत्नागिरी जिल्ह्यात जाण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी नियमावली जारी केली आहे. त्यानुसार, सर्व मंदिर विश्वस्त व पालखीधारक यांना आरटीपीसीआर आणि रॅपिड अँटिजेन चाचणी करण्यास सांगण्यात आले आहे. अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीतच स्थानिक ग्रामदेवतेच्या पालखीला रूपे लावणे, सजवणे आदी बंधनकारक केले आहे. २५ ग्रामस्थ व मानकऱ्यांच्या उपस्थितीत पालखी परंपरेनुसार भेटीसाठी जाईल. पालखी शक्यतो वाहनातून न्यायची असून, शक्य नसल्यास पालखीधारकांनी स्वतः वाहून नेण्यास परवानगी राहील. कोणत्याही परिस्थितीत ५० लोकांपेक्षा जास्त लोक जमा होणार नाहीत, याची दक्षता घ्यायची आहे. पालखी घरोघरी नेण्यात येणार नसून, पालखी दर्शनाच्या वेळा निर्धारीत करून द्यायच्या आहेत. उपस्थित सर्वांच्या शरीराचे तापमान तपासणे, सॅनिटायजर, मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. होळी व पालखीची पूजा, नवस, पेढे, हार, नारळ इत्यादी स्वरुपात स्वीकारण्यास बंदी असून, प्रसाद वाटपही होणार नाही, असे नियमावलीत म्हटले आहे. नागरी व ग्रामकृती दल यांनी शाळा अथवा अन्य सार्वजनिक ठिकाणी स्क्रिनिंग सेंटर उभारायचे आहेत. स्क्रिनिंग सेंटरवर नागरिकांमध्ये सर्दी, खोकल्यासारखी लक्षणे आढळल्यास त्यांना जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये पाठवणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे सर्दी, खोकला व कोविडसदृश्य इतर लक्षणे असलेल्या कोणत्याही व्यक्तीस शिमगोत्सवात सामील होता येणार नाही. असा कुणीही नागरिक शिमगोत्सवात सहभागी होणार नाही याची दक्षता नागरी व ग्रामकृती दलांनी घ्यावी, असे सांगण्यात आले आहे. नियमावलीतील काही ठळक मुद्दे ० सहाणेवर पालखी व होळीच्या दर्शनासाठी लोकांना स्वतंत्र दिवस नेमून द्यावा. ० गर्दीमध्ये पालखी नाचविता येणार नाही. ० मोजक्या लोकांच्या उपस्थितीतच परंपरेनुसार होम. ० नमन, खेळे इत्यादी कार्यक्रम करू नयेत. प्रथेपुरते खेळ्याचे कार्यक्रम २५ ते ५० लोकांच्या उपस्थितीतच. ० धूलीवंदन, रंगपंचमीच्या दिवशी रंग उधळणे टाळावे. ० होळीच्या सणाकरीता येणाऱ्यांकडे ७२ तासांपूर्वी आरईसीआरटी चाचणी अहवाल नकारात्मक असणे आवश्यक.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: