धक्कादायक! कोविड लशीच्या चाचण्यांमध्ये दलालांची मध्यस्थी सुरूच

March 01, 2021 0 Comments

मुंबई: करोना लशींच्या चाचण्यांची प्रक्रिया ही वैद्यकीयदृष्ट्या अतिशय सुरक्षित व सहभागी व्यक्तींचे खासगीपण जपणारी असावी, असे अपेक्षित आहे. मात्र यातील दलालांची मध्यस्थी करण्याचे प्रकार मात्र अद्याप थांबलेले नाहीत. यापूर्वी 'मटा'ने उघडकीस आणलेल्या लसीकरणातील दलाल प्रकरणातील मनीष खंदारे याच्यासह नऊ जणांचा सहभाग असल्याचे दिसून आले आहे. जेजे रुग्णालयामध्ये होणाऱ्या चाचण्यांमध्ये जे स्वयंसेवक सहभागी होतील त्यांची नोंदणी वा संपर्क हा रुग्णालयाच्या संबधित विभागाच्या डॉक्टरांकडून केला जाईल, अशी हमी यापूर्वी देण्यात आली होती. प्रत्यक्षात मात्र या लस देण्यात येईल असे सांगणाऱ्या टॅक्सी ड्रायव्हर, रिक्षाचालक तसेच इलेक्ट्रिशिअन असे विविध उद्योग करणाऱ्या मध्यस्थांचा यात समावेश आहे. या व्यक्तींना यापूर्वी लसीकरणामध्ये भाग घेतला होता, ते स्वयंसेवक होते, असा त्यांचा दावा आहे. कोणती लस घेतली याची माहिती मात्र त्यांना देता आलेली नाही. वाचा: करोना संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी लसीकरणाची प्रक्रिया एकीकडे वेग घेत असताना नव्या लसींच्या चाचणया जेजे रुग्णालयासह अन्य काही खासगी संशोधन केंद्रांसह वैद्यकीय रुग्णालयांमध्ये सुरू आहे. सरकारने चाचण्यामध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्ती, त्यांची माहिती गोपनीय ठेवण्यासह या विषयात मध्यस्थांचा सहभाग असण्याबद्दल पूर्ण चौकशी करू, असे आश्वासन दिले होते. मात्र त्याची अद्याप पूर्तता का झाली नाही, नियम धाब्यावर बसवून हे प्रकार पुन्हा का सुरू झाले आहेत, एका रुग्णालयामध्ये लस घेतल्याचा दावा केलेल्या या व्यक्तींना , नवी मुंबई, नेरुळ, उल्हासनगर या ठिकाणी लसीकरणाची प्रक्रिया कुठे सुरू आहे याची नेमकी माहिती कशी, असे प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत. मनीष खंदारेप्रमाणे राजेश राजगोर हे मध्यस्थाचे काम करतात. ते ठाण्यात राहतात व रिक्षाचालक आहेत. त्यांच्याशी मटाने संपर्क साधला असता, त्यांनी जेजे रुग्णालयामध्ये लस घेतली आहे, ती कोणती होती याची कल्पना नाही, असे सांगितले. आम्ही एकूण नऊ जण आहोत, असेही त्यांनी सांगितले. लसीकरण हे सर्वसामान्यांसाठी सुरू झालेले नाही मग तुम्ही त्यासाठी लोकांना कसे पाठवता, असे विचारले असता त्यांनी करोनापासून काही जणांना संरक्षण मिळेल, या भावनेने हे काम करत असल्याचे सांगितले. लस घेण्यास इच्छुक असलेल्याचे वय २० ते ५० वर्षे अपेक्षित असून एकूण चार वेळा यावे लागणार आहे. पहिल्यावेळी स्क्रिनिंग, पुढील तीन वेळा लसीचा डोस देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. जेजे रुग्णालयातील गेट क्रमांक नऊ एफएमटी इमारत, तिसरा मजला, सेंट्रल कँटिनजवळ, नऊ ते तीन या वेळेमध्ये तर नेरुळ पूर्वेकडील मेडिकल कॉलेज इमारत, पाचवा मजला, फार्माकोलॉजी विभागामध्ये सकाळी नऊ ते अकरा या वेळेत इच्छुक व्यक्ती जाऊ शकतात. तिथे गेल्यानंतर पुढील प्रक्रिया कळेल, ही माहिती त्यांनी दिली. जेजे रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. रणजित माणकेश्वर यांनी, हे प्रकार योग्य नसून पुन्हापुन्हा असे प्रकार होत असतील तर एथिक्स कमिटीपुढे हा मुद्दा उपस्थित केला जाईल, असे सांगितले. येथे सुरु असलेल्या चाचण्यांचे अन्वेषक डॉ. आकाश खोब्रागडे यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: