नगरमध्ये महिलांमध्ये प्रचंड दहशत; 'असं' काय घडलं शहरात?

February 09, 2021 0 Comments

म. टा. प्रतिनिधी, नगर: नगर शहरात काल एकाच दिवशी पाच महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून चोरट्यांनी पळ काढल्याच्या घटना घडल्या. यामुळे नगर शहरात महिलांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. पोलिसांनी चौकाचौकात फलक लावून प्रबोधनाची मोहीम सुरू केली आहे, तर शिवसेनेने पोलीस अधिकाऱ्यांना भेटून या घटनांना आळा घालण्याची मागणी केली आहे. नगर शहातील उपनगर आणि मध्यवर्ती भागात सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या आहेत. दुचाकीवरून आलेल्या चोरांनी पायी जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील दागिने ओढून नेले. यातील बहुतांश घटना वर्दळीच्या रस्त्यावर घडल्या. सायंकाळी पावणेसहा वाजता गुलमोहर रस्त्यावर पहिली घटना घडली. त्यानंतर तासाभरात विविध ठिकाणी अशा घटना घडल्या. प्रतिभा प्रशांत त्रिंबके यांच्या गळ्यातील सुमारे दीड लाख रुपयांचे गंठण चोरीला गेले. त्या गुलमोहर रोडवरून जात असताना ही घटना घडली. त्यानंतर श्रद्धा सुशिल भंडारी (बुरूडगाव रोड), राजश्री रामसुख मंत्री (मार्केट यार्ड), शुभांगी कृष्णा गोसावी (बालिकाश्रम रोड) आणि सविता विकास दरवडे (टिळक रोड) यांच्या गळ्यातील दागिने अशाच पद्धतीने चोरीला गेले. शहरातील पोलीस ठाण्यांत यासंबंधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शिवसेनेने यासंबंधी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली. विक्रम राठोड, विनय वाखुरे , सागर ठाकुर , रोहित राठोड, साई शिंदे, पंकज राठोड यांनी पोलिसांना निवेदन देऊन तातडीने तपास करण्याची आणि अशा घटनांना आळा घालण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी केली. पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला. मात्र, ते हाती लागले नाहीत. अशा घटना टाळण्यासाठी पोलिसांनी आता महिलांमध्ये जागृती करण्यास सुरुवात केली आहे. शहरात ठिकठिकाणी फलक लावून दागिने रोखण्यासाठी काय दक्षता घ्यावी, यासंबंधीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मधल्या काळात कमी झालेले हे प्रकार पुन्हा वाढल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. लॉकडाउनचे नियम शिथिल झाल्याने चोरटे सक्रिय झाले आहेत, असे दिसून येते.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: