ठाणे-कसारा मार्गावर सीसीटीव्हीची नजर
म. टा. प्रतिनिधी, अत्याधुनिक सिग्नल यंत्रणेसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच, सुरक्षिततेच्या दृष्टीने ठाणे ते कसारा या मार्गावर सीसीटीव्ही यंत्रणेसाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. रस्त्यावरील वाढते अपघात रोखण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तसेच सरकारकडून आवश्यक ते सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी दिली. ठाणे वाहतूक शाखेच्या वतीने आयोजित रस्ता सुरक्षा अभियानाचा सांगता सोहळा बुधवारी ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात पार पडला. यावेळी पालकमंत्री शिंदे बोलत होते. त्यावेळी पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, सह पोलिस आयुक्त सुरेश मेकला, अतिरिक्त आयुक्त दत्ता कारळे, संजय ऐनपुरे, अनिल कुंभारे, प्रवीण पवार, वाहतूक शाखेचे उपायुक्त बाळासाहेब पाटील, अभिनेते मंगेश देसाई उपस्थित होते. दरवर्षी रस्ते अपघातामध्ये बळी पडणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अपघातामुळे नुकसानही मोठ्या प्रमाणावर होते. ठाण्यासह संपूर्ण देशभरात हा चिंतेचा विषय आहे. रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत असल्याचेही शिंदे यांनी सांगितले. वाहतूक कोंडीची समस्या सुटेल मेट्रो प्रकल्प, फ्रीवेचा ठाण्यापर्यंत विस्तार, कोपरी-पटणी खाडी पूल, कोलशेत-गायमुख कोस्टल रोड, आनंदनगर ते साकेत एलिव्हेटेड रोड, कोपरी पूल रुंदीकरण अशा अनेक प्रकल्पांमुळे ठाणे व उपनगरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मदत होईल, असे शिंदे यांनी सांगितले. रस्त्यांवरील 'ब्लॅक स्पॉट' ही चिंतेची बाब असून नव्याने बांधण्यात येणाऱ्या रस्त्यांवर अशा अपघाताच्या जागा राहणार नाहीत, याची विशेष काळजी घेतली जात आहे. ७०१ किमीच्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे काम प्रगतिपथावर असून राज्यात याच धर्तीवर पाच हजार किमीच्या अॅक्सेस कंट्रोल रस्त्यांच्या, तसेच मुंबई-गोवा अॅक्सेस कंट्रोल रस्त्याच्या डीपीआरचे काम सुरू आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. करोनाकाळातील सेवेचा गौरव ही सुरक्षा मोहीम महिनाभरापुरती असली, तरी पोलिस आणि वाहतूक पोलिस वर्षाचे १२ महिने ३६५ दिवस रस्त्यांवर असतात. करोनाकाळातही पोलिसांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून उल्लेखनीय काम केले, या शब्दांत शिंदे यांनी त्यांचा गौरव केला. करोनाकाळात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: