देवाशप्पथ... ती न्यायालयात खोटं बोलली!
मुंबई : भगवद्गीतेवर हात ठेवून 'देवा शपथ खरे सांगेन, खोटे सांगणार नाही' अशी शपथ घेतली जाते. कुणी खोटी साक्ष देऊ नये यासाठी वर्षानुवर्षे न्यायालयात चालणारी ही प्रथा. मात्र शपथ घेऊनही खोटी साक्ष देणे आणि ते देखील आपल्याच मुलीवर करणाऱ्या आरोपीच्या बाजूने साक्ष देणे एका महिलेला चांगलेच महागात पडले. दिंडोशी सत्र न्यायालयाच्या आदेशानुसार नुकताच या महिलेविरोधात सहायक प्रबंधकांच्या तक्रारीवरून कुरार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवईमध्ये रमा (बदललेले नाव) ही आपल्या दोन मुलींसह राहत होती. पतीने सोडल्याने एकट्या रमावरच दोन्ही मुलींची जबाबदारी पडली. आर्थिक ओढाताण त्यातच मोठ्या मुलीचे मानसिक संतुलन काहीसे बिघडले असल्याने तिला प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत होते. याचदरम्यान नागेश भंडारी हा रमा हिच्या शेजारच्या घरात राहण्यास आला. दैवीशक्ती असल्याचे सांगत असल्याने नागेश याच्याकडे अनेक लोक आपल्या समस्या घेऊन येत असत. रमा आपल्या १७ वर्षांच्या मुलीला घेऊन नागेश याच्याकडे गेली. नागेश याने तिच्या समस्या दूर करण्यासाठी पूजाअर्चा सुरू केली. शेजारीच राहत असल्याने रमा मुलीला घेऊन वारंवार त्याच्याकडे जाऊ लागली. नागेश याचीही रमाच्या कुटुंबीयांशी जवळीक वाढली. याचा नागेश याने पुरेपूर गैरफायदा घेतला. पूजा करायच्या बहाण्याने रमा हिच्या मुलीला घरी नेऊन तो तिच्यावर लैंगिक अत्याचार करू लागला. काही दिवस हा प्रकार सुरू होता मात्र एके दिवशी नागेश घरी आला असताना मुलगी त्याच्याकडे रागाने बघू लागली. नागेशप्रती वागणुकीत झालेल्या बदलाबाबत रमा हिने विश्वासात घेऊन विचारल्यावर तिने नागेश याने वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचे सांगितले. मुलीवर अत्याचाराबाबत हटकल्यावर नागेश कर्नाटकामध्ये गावी पळून गेला. डिसेंबर २०१७मध्ये मुंबईत परतल्यावर तो रमा आणि तिच्या मुलीला धमकावू लागला. नागेश याच्याविरोधात पोलिसांत जाण्याचा निर्णय घेता रमा हिने मला न्याय द्या, असे पत्र पोलिस आयुक्त, मुख्यमंत्री तसेच इतर ठिकाणी लेखी अर्ज केले. याची दखल घेत डिसेंबर २०१७मध्ये पवई पोलिसांनी पोक्सो, बलात्कार तसेच इतर कलमांन्वये गुन्हा दाखल करून नागेश आला अटक केली. आरोपीच्या बाजूने साक्ष दिंडोशी सत्र न्यायालयात याप्रकरणाचा खटला सुरू होता. पोलिसांनी वैद्यकीय पुरावे, साक्षीदारांचे जबाब तसेच इतरपुरावे न्यायालयात सादर केले. मात्र ऐनवेळी रमा हिने साक्ष फिरवली आणि नागेशच्या बाजूने साक्ष दिली. आयुक्त, मुख्यमंत्र्यापर्यंत न्यायासाठी धडपड करणाऱ्या रमाच्या अशा वागण्याने न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले. वस्तुनिष्ठ पुरावेनागेशने लैंगिक अत्याचार केल्याचे दर्शवित असल्याने न्यायालयाने त्याला १२ वर्षांची शिक्षा सुनावली. तर खोटी साक्ष देणाऱ्या रमा विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. कुरार पोलिसांनी नुकताच रमा विरोधात भादंवि कलम१८१ (शपथ घेऊन खोटी साक्ष देणे), १९३ (खोट्या पुराव्यांबाबत शिक्षा), १९९ (ग्राह्य धरलेल्या पुराव्यांमध्ये खोटे कथन) अंतर्गत गुन्हा दाखल केला.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: