'टाइम्स नाऊ'ची 'बार्क'ला कायदेशीर नोटीस, केल्या 'या' मागण्या
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई 'वाहिन्यांची प्रेक्षकसंख्या मोजण्यासाठी देशभरात तुम्ही एकमेव संस्था असताना, अत्यंत विश्वासाने सर्व संबंधित घटकांनी तुमच्याकडे कोट्यवधी रुपयांचा परवानाशुल्क भरून परवाना घेतला असताना, जाहिरातदार व अन्य संबंधित घटक तुमच्याकडून दिल्या जाणाऱ्या टीआरपीवर दृढ विश्वास ठेवून असताना तुम्ही एका नव्या वृत्तवाहिनीला फायदा पोचवण्यासाठी मोठे षडयंत्र रचले. त्याद्वारे तुम्ही सर्वसामान्य नागरिकांचा विश्वासघात तर केलाच; मात्र आमच्या प्रतिष्ठेला आणि प्रतिमेलाही प्रचंड धक्का पोचवण्यासह आमचे खूप मोठे आर्थिक नुकसानही केले,' असे नमूद करत ''तर्फे बेनट कोलमन अँड कंपनी लिमिटेडने '' अर्थात ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलला कायदेशीर नोटीस बजावली आहे. सात दिवसांच्या आत ४३१ कोटी रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, अशी मुख्य मागणीही या नोटीसद्वारे 'बार्क'कडे करण्यात आली आहे. 'बार्कमधील काही उच्चपदस्थांनी २०१७ मध्ये एक इंग्रजी वृत्तवाहिनी नव्याने सुरू होण्यापूर्वीच मोठे कारस्थान रचल्याचे आतापर्यंतच टीआरपी घोटाळ्यातील तपासातून स्पष्ट होत आहे. तुमच्याच संस्थेत जागल्याची भूमिका बजावलेल्या काहींनी अनियमितता निदर्शनास आणल्यानंतर, तसेच अॅक्विसरी रिस्क कन्स्टल्टिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने फॉरेन्सिक अहवाल देऊन संस्थेतील काहींकडून गैरप्रकार झाले असल्याचे २४ जुलै २०२०च्या अहवालाने निदर्शनास आणल्यानंतरही तुम्ही त्याकडे काणाडोळा केला. खरं तर तुम्ही कारवाई करायला हवी होती. मात्र, त्याऐवजी दोषी अधिकाऱ्यांना गुप्तपणे राजीनामा देऊन बाहेर पडण्यास प्रवृत्त करून, तुम्ही संपूर्ण घोटाळ्यावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला. मुंबई पोलिसांनी तपास करून याचा पर्दाफाश केला नसता, तर आमच्यासह अन्य सर्व सदस्यांनाही हा भ्रष्टाचार व अनैतिक कारभार कळलाच नसता. टाइम्स नाऊ वृत्तवाहिनी २००६मध्ये सुरू झाल्यापासून सातत्याने क्रमांक एकवर होती. मात्र, तुमच्या काही अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक कटकारस्थान रचून २०१७पासून नव्याने आलेल्या विशिष्ट वाहिनीला क्रमांक एकवर आणण्यासाठी टीआरपीमध्ये सातत्याने कृत्रिमरीत्या फेरफार केले. एआरसीच्या अहवालातून हे निर्विवादपणे स्पष्ट होते. तो अहवाल आम्हाला देण्यास तुम्ही टाळले. अखेर पोलिसांच्या तपासातून तो अहवाल समोर आला. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई टाळतानाच या घोटाळ्याच्या माध्यमातून फायदा लाटणाऱ्या वृत्तवाहिनीलाही तुम्ही ऑक्टोबर व नोव्हेंबर-२०२०मध्ये क्लीन चीट देणारे पत्र दिले. यावरून तुमची पूर्ण संस्थाच या घोटाळ्याच्या कटात सहभागी असल्याचे स्पष्ट होते. तुम्ही पारदर्शक, त्रयस्थ व नि:पक्षपातीपणे काम करणे बंधनकारक असताना, तुमच्या या नैतिक अधःपतनाने आमचे आर्थिक नुकसान होण्याबरोबरच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील आमच्या प्रतिष्ठेचेही प्रचंड नुकसान झाले आहे,' असे 'बीसीसीएल'ने या ११ फेब्रुवारीच्या नोटिशीत नमूद केले आहे. 'टाइम्स नाऊ'च्या 'बार्क'कडे अन्य मागण्या - परवाना शुल्काची २१ कोटी ८३ लाख रुपयांची रक्कम वार्षिक १८ टक्के व्याजासह परत द्यावी. - 'टाइम्स नाऊ' ही इंग्रजी वृत्तवाहिनीच २०१७ ते १९ या कालावधीत क्रमांक एकवर होती, असे जाहीर करणारे प्रसिद्धीपत्रक तत्काळ आपल्या वेबसाइटवर प्रसिद्ध करावे. - हे प्रसिद्धीपत्रक तुमच्या खर्चानेच आघाडीच्या पाच इंग्रजी व हिंदी वृत्तवाहिन्यांवर आणि आघाडीच्या राष्ट्रीय इंग्रजी दैनिकात देशभरात प्रसिद्ध करावे. तसेच, प्रत्येक राज्यातील आघाडीच्या प्रादेशिक वर्तमानपत्रातही प्रसिद्ध करावे. - टीआरपी घोटाळ्याविषयी 'एआरसी'ने २४ जुलै २०२० रोजीच तुम्हाला दिलेला अहवाल आपल्या वेबसाइटवर प्रसिद्ध करावा. - एआरसीचा अहवाल आणि पोलिसांनी दाखल केलेले आरोपपत्र याआधारे बार्कमधील संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच संबंधित वाहिन्यांवर त्यांचे परवाने रद्द करण्यासह दंडात्मक कारवाई करावी.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: