नगरमध्ये ठरलं... विखे-लंकेंचं टशन!

March 18, 2024 0 Comments

संदीप शेंडे







अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके ‘पॉवर’फुल्ल उमेदवारासाठी चाचपडणार्‍या महाविकास आघाडीच्या गळाला आयतेच लागले. त्यापूर्वीच भाजपने विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांची उमेदवारी घोषित केली होती. महाविकास आघाडीच्या जागावाटपात नगरची जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे आहे. आ. लंके गुरुवारी शरद पवारांच्या मांडीला मांडी लावून माध्यमांना सामोरे गेल्याने ‘लोकसभेचा उमेदवार ठरला,’ असाच संदेश त्यातून दिला गेला. आता भाजपचे सुजय विखे-पाटील व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आ. लंके यांच्यातील अटीतटीचा सामना नगरच काय, तर अवघ्या राज्याला पाहावयास मिळणार आहे. (loksabha election 2024)


नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात पारनेर, श्रीगोंदा, कर्जत-जामखेड, शेवगाव, पाथर्डी, नगर शहर आणि राहुरी हे विधानसभेचे सहा मतदारसंघ येतात. लंके हे पारनेरचे आमदार. राष्ट्रवादी दुभंगण्यापूर्वीच ते लोकसभेच्या तयारीला लागले होते. शरद पवारही त्यांना प्रोजेक्ट करत होते. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आ. लंके हे अजित पवारांसोबत गेले. त्यामुळे विखेंविरोधात कोण, याची चर्चा नगरकरांमध्ये रंगली होती. एकतर्फी लढत होऊन विखे खासदार होतील, असेही बोलले जात होते; मात्र महायुतीत असूनही ‘शिवस्वराज्य यात्रे’पाठोपाठ ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्याआडून लंके लोकसभेची पायाभरणी करतच होते. अखेर लोकसभेच्या तोंडावर घरवापसी करत आ. लंके हे शरद पवारांच्या संगतीला गेले अन् त्यापाठोपाठ नगरचे चित्र स्पष्ट झाले. आता त्यांचा सामना भाजपच्या विखेंशी होणार, हे निश्चित झाले आहे. त्यामुळेच नगरची विखे-लंके लढत राज्यातील लक्षवेधी लढतीत गणली जाणार, हे नक्की!


साखळाई पाणी योजना, कर्जत, श्रीगोंदा एमआयडीसी, ताजनापूर पाणी योजना, नगर एमआयडीसी विस्तारीकरणासोबतच मराठा, धनगर आरक्षणाच्या मुद्द्याभोवती नगर लोकसभेची निवडणूक फिरणार असल्याचे चित्र दिसते आहे. भाजपांतर्गत कुरबुरी, जनसंपर्क या सुजय विखे यांच्यापुढील; तर पारनेरपुरतेच मर्यादित, ठाकरे सेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत राष्ट्रवादीत गेल्यानंतर आता उबाठा सेना स्वीकारेल काय? या आ. लंके यांच्यापुढील समस्या असतील. प्रचाराचे रान पेटेल तेव्हा दोघेही एकमेकांची उणीदुणी काढताना हे मुद्दे चर्चेला आणतील, हे सांगणे न लगे. नगर दक्षिणेत यशवंतराव गडाख विरुद्ध स्व. बाळासाहेब विखे यांच्यातील 1991 ची निवडणूक जशी गाजली, तशीच यंदाची विखे-लंके लढत रंगतदार होईल, अशी चर्चा मतदारांमध्ये आताच सुरू झाली आहे.


loksabha election 2024 : तेव्हाही शरद पवार अन् आताही तेच!




1991 मध्ये गडाख-विखे लढतीत शरद पवार हे गडाखांच्या बाजूने भक्कम उभे होते. त्यावेळी विखेंचा पराभव झाला; पण कोर्टापर्यंत पोहोचलेली ही निवडणूक देशाला आदर्श आचारसंहिता देऊन गेली. 2019 च्या लोकसभेसाठी सुजय विखे हे काँग्रेसकडून इच्छुक होते; पण राष्ट्रवादीकडे असलेली नगरची जागा सोडण्यास शरद पवार शेवटच्या क्षणापर्यंत राजी झाले नाहीत. अखेर विखेंनी पक्षांतर करत भाजपची उमेदवारी केली अन् बाजी जिंकली. आताही आ. लंके यांचा निव्वळ चेहरा असून, त्या चेहर्‍यामागे शरद पवार हेच आहेत, हे जगजाहीर आहे.


शिर्डीत ‘श्रद्धा अन् सबुरी’




सदाशिव लोखंडे हे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार आहेत. ठाकरे गटाची साथ सोडून ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सेनेसोबत आहेत. महाविकास आघाडीच्या जागावाटपात ठाकरे सेनेच्या वाट्याला असलेल्या या जागेवर काँग्रेसनेही दावा ठोकला आहे. त्यांच्यात अजून ठरलेले नाही, त्यामुळे उमेदवार कोण? हेही गुलदस्त्यात आहे. खा. लोखंडे यांना तिसर्‍यांदा महायुतीची उमेदवारी मिळणार का? मिळालीच तर ती सेनेकडून की भाजपकडून, याचीही उत्सुकता आहे. अर्थातच, ही उत्सुकता असलेले सारे आणि उमेदवारीसाठी दावेदार असणारेही सध्या तरी ‘श्रद्धा अन् सबुरी’चे धोरण स्वीकारून ‘वेट अँड वॉच’ भूमिकेत आहेत.


विधानसभानिहाय आमदारांचे बलाबल




राष्ट्रवादी शरदचंद्र पवार (3) : प्राजक्त तनपुरे, रोहित पवार, स्वत: नीलेश लंके.

राष्ट्रवादी अजित पवार (1) : संग्राम जगताप. भाजप (2) : बबनराव पाचपुते, मोनिका राजळे.


2019 चे मतदान (टक्केवारी)

सुजय विखे-पाटील..7,04,660 (58.54)

संग्राम जगताप…4,23,186 (35.15)


हेही वाचा 



* Lok Sabha Election 2024 | उत्तर महाराष्ट्राचे चित्र अस्पष्टच‌! उमेदवारीत भाजपची आघाडी, मविआचे भिजत घोंगडे

* Lok Sabha Election 2024 | कोल्हापूर काँग्रेसकडे, सांगली ठाकरेंकडे, हातकणंगलेत राजू शेट्टींशी चर्चा, संजय राऊतांची माहिती






 


The post नगरमध्ये ठरलं... विखे-लंकेंचं टशन! appeared first on पुढारी.


http://dlvr.it/T4DstZ
Amol Kote

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: