डोंबिवली: भाजप नगरसेवकाच्या आईची निर्घृण हत्या; मृतदेह जाळण्याचा प्रयत्न

डोंबिवली: डोंबिवलीतील शेलारनाका परिसरात क्षुल्लक वादातून पतीने पत्नीची गळा चिरून केल्याच्या घटनेला ४८ तास उलटत नाही तोच पुन्हा ८४ वर्षीय वृद्धाने घरगुती किरकोळ वादातून आपल्या ८० वर्षीय पत्नीची धारदार शस्त्राने सपासप वार करून हत्या केल्याची खळबळजनक घटना डोंबिवलीत घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या निर्दयी पतीने तिचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. पार्वती पाटील असे या दुर्दैवी घटनेतील महिलेचे नाव असून, कल्याण-डोंबिवली महापालिकेचे भाजप नगरसेवक रमाकांत पाटील यांची ती आई आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी पती बळीराम पाटील यांना अटक केली आहे. इतकी वर्षे सुखाचा संसार केल्यावर आयुष्याच्या संध्याकाळी एकमेकांची काळजी घेत गत आठवणींना उजाळा देण्याच्या काळात जोडीदाराला कायमचा संपवण्याच्या या वृद्धाच्याकृत्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली. पूर्वेकडील गोळवली गावात भाजप नगरसेवक रमाकांत पाटील यांचे वडील बळीराम पाटील (८४) हे आपल्या पत्नी, पत्नी, मुले, सुना, नातवंडासह दोन मजली बंगल्या राहतात. काल रात्री ९ वाजून १५ मिनिटांनी नेहमीप्रमाणे पार्वती आणि बळीराम जेवण झाल्यावर आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेले होते. यानंतर पती-पत्नीत नेहमीप्रमाणे काही करणावरून वाद झाले. संतापाच्या भरात बळीराम यांनी आपल्या पत्नीची कोयत्याचे मानेवर, पाठीवर, गळ्यावर, कानावर वार करत हत्या केली. हत्येनंतर त्याने पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह त्याच खोलीत जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यत सकाळ झाल्याने सुना उठल्याचे कळताच अर्धवट जळलेल्या अवस्थेत मृतदेह सोडून त्याने घर सोडून पळ काढला. सासू-सासऱ्याच्या खोलीतून धूर येत असल्याने सुनेने या खोलीत धाव घेत पाहणी केली असता, सासूचा अर्धवट जळलेल्या आणि चेहऱ्यावर धारदार हत्याराच्या खुणा असलेला मृतदेह खाटेवर पडलेला दिसला. या प्रकरणी सुनेच्या तक्रारीवरून पोलिसांनी घटनास्थळावरून हत्येसाठी वापरलेले धारदार हत्यार जप्त केले. निर्दयी पती बळीराम याला अटक करत पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: