Nagar News : पिंपळगाव माळवी तलाव पाणीप्रश्न पेटणार!

October 19, 2023 0 Comments

नगर तालुका : पुढारी वृत्तसेवा :  पिंपळगाव माळवी तलावातील अनधिकृत पाणी उपशाचा प्रश्न चांगलाच पेटणार असल्याचे दिसून आहे. येथील पाणी उपसा तात्काळ बंद करावा, अन्यथा पंचक्रोशीतील ग्रामस्थांसह आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाजीराव गवारे यांनी दिला आहे. अनधिकृत पाणी उपशाबाबत परिसरातील ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले आहेत.

जेऊर येथील सीना नदी, तसेच उपनदी खारोळीवर पिंपळगाव तलाव आहे. चालू वर्षी पावसाने हुलकावणी दिल्याने परिसरात पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या उद्भवणार आहे.


संबंधित बातम्या :



* पुणे जिल्ह्यात 1 हजार 451 हेक्टरवर कापसाची लागवड

* कापसाला अवघा 6 हजारांचा दर

* Nagar News : टँकर-ट्रकच्या धडकेत दोन ठार ; दोन जण गंभीर जखमी






चालू वर्षी पिंपळगाव तलावातील पाण्याची आवक वाढलीच नाही. सध्याच पाण्याची टंचाई निर्माण झाली असून, उन्हाळ्यात तर पाण्यासाठी परिसरातील गावांचे अतोनात हाल होणार असल्याचे दिसत आहे. पिंपळगाव तलावातील पाणीसाठाही 30 टक्क्यांपेक्षा कमी राहिलेला आहे. त्यातच तलावातून अनधिकृतपणे मोठ्या प्रमाणात पाणी उपसा सुरू आहे. काही नागरिक टँकरद्वारे तलावातील पाण्याची विक्री करत असल्याची धक्कादायक माहिती मिळत आहे.


पिंपळगाव तलावातून जेऊर, धनगरवाडी, डोंगरगण, पिंपळगाव, मांजरसुंबा गड या गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. या गावातील पाण्याच्या पाईपलाईन तलावातून आहेत. पाऊस नसल्याने या गावांसमोर पाणी टंचाईचे भीषण संकट उभे राहणार आहे. अशा परिस्थितीत तलावातील अनधिकृत पाणी उपसा थांबवणे गरजेचे आहे. शेकडो विद्युत पंपाच्या साहाय्याने 24 तास अविरतपणे पाणी उपसा सुरू आहे. बेसुमार पाणी उपसा प्रकरणी शिवप्रहार संघटनेच्या वतीने देखील निवेदन देऊन पाणी उपसा थांबविण्याची मागणी करण्यात आली होती.


उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ येणार आहे. पशुधन जगविणे अवघड होईल. त्यामुळे तलावातील अनधिकृत पाणी उपसा तात्काळ बंद करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. अन्यथा जेऊर पंचक्रोशीतील ग्रामस्थांसह तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बाजीराव गवारे यांनी दिला आहे.


जेऊरला पिंपळगाव माळवी तलावातून पाणीपुरवठा होतो. दुष्काळी परिस्थितीमुळे भविष्यात तीव्र पाणीटंचाई जाणवणार आहे. त्यामुळे तलावातील अनधिकृत पाणी उपसा तात्काळ थांबविण्याची गरज आहे.

                                                                         – ज्योती तोडमल, सरपंच, जेऊर


पिंपळगाव तलावातून पाच गावांची तहान भागविली जाते. चालू वर्षी पाऊस झाला नाही. त्यामुळे पाण्याचे भीषण संकट उभे राहणार आहे. त्यामुळे तलावातील पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवण्याची गरज आहे.

                                                            – श्रीतेश पवार, उपसरपंच, जेऊर


आदिवासी समाजाच्या वतीने तलावात मत्स्यबीज सोडून मासेमारी करण्यात येते. त्यावर समाजातील बहुतेक कुटुंबाची उपजीविका अवलंबून आहे. पाणी संपल्यास मासेमारी व्यवसायही अडचणीत येणार आहे.

                         – बाळासाहेब पवार, अध्यक्ष एकलव्य आदिवासी विकास संस्था


The post Nagar News : पिंपळगाव माळवी तलाव पाणीप्रश्न पेटणार! appeared first on पुढारी.


http://dlvr.it/SxdHwH

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: