बोधेगाव : अतिवृष्टीचे अनुदान कधी मिळणार?

December 05, 2022 0 Comments

https://ift.tt/62zUS34

बोधेगाव : पुढारी वृत्तसेवा :  शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील अतिवृष्टीग्रस्त बोधेगाव महसूल मंडळातील 22 गावे आणि चापडगाव महसूल मंडळातील 16 गावातील शेतकर्‍यांच्या नजरा आता मायबाप सरकारच्या मदतीकडे लागल्या आहेत. आज येईल, उद्या येईल, या आशेवर शेतकरी तग धरुन आहेत. नुकसान भरपाईचे अर्ज भरून दिले, पंचनामे होऊनही दीड महिना झाला. मग, मदतीचे अनुदान मिळणार तरी कधी, असा सवाल अतिवृष्टीग्रस्त शेतकरी विचारताना दिसत आहेत.

तालुक्याच्या पूर्व भागात 17 आणि 18 ऑक्टोबरला मध्यरात्रीनंतर सलग दोन तास मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर पहाटे थांबून थांबून कमी-अधिक प्रमाणात पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्या अगोदरच आठवडाभरापासून या भागात दररोज पावसाच्या सरी कोसळत होत्या. सततधार पावसाने खरीप पिके धोक्यात आली असतानाच अतिवृष्टी झाली. त्यामुळे संपूर्ण खरीप हंगाम पाण्यात गेला होता. वेचणीस आलेल्या कपाशी, फुलोर्‍यात आलेल्या तुरी, काढणीसाठी आलेले सोयाबीन, मूग , बाजरी, उडीद आदी पिकांना जलसमाधी मिळाली होती. हजारो हेक्टर पिकांत गुडघाभर पाणी साचले होते. फुटलेल्या कापसाच्या वाती झाल्या होत्या. कोणतेच पीक एक टक्कासुध्दा शेतकर्‍यांच्या हातात आले नाही. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने एका रात्रीत हिरावून घेतला होता. काही तासात होत्याचे नव्हते झाले होते.

चापडगाव, राक्षी, गदेवाडी, सोनविहीर, मुंगी, कांबी, हातगाव, बोधेगाव, शेकटे, बालमटाकळी, मुरमी, गायकवाड जळगाव, सुकळी, लाडजळगाव, दिवटे, अंतरवली, अधोडी या गावांतील पिके आधीच्या पावसाने 70 टक्के गेली होती. त्यात अतिवृष्टीने सगळेच पाण्यात गेले होते. जवळपास 38 गावात खरीप पिकांना जलसमाधी मिळाली होती. उंच बांधावरून कोणत्याही दिशेने पाहिले तर नजर पुरेपर्यंत पिकात पाणीच पाणी दिसत होते. समुद्रात जलपर्णी असल्या सारखे दृश्य सगळीकडे दिसत होते.

संपूर्ण खरीप हंगाम पाण्यात गेल्याने शेतकर्‍यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी विरोधक आणि सत्ताधार्‍यांनी केली. मोर्चे, आंदोलने झाली. त्यानंतर 25 ऑक्टेबरला राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी या भागात बोधेगाव, बालमटाकळी, लाडजळगाव शिवारात शेतात जाऊन अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून शेतकर्‍यांना आधार दिला. शेवगाव तालुक्यातील जवळपास 62 हजार हेक्टर क्षेत्र शंभर टक्के बाधित झाल्याचे त्यांनी कबूल केले आणि आठ दिवसात पंचनामे पूर्ण करण्याचे प्रशासनाला आदेश देऊन लवकरात लवकर शेतकर्‍यांना भरीव मदत देण्याची घोषणा बांधावरच केली होती.

त्याला आता दीड महिना होत आला आहे. मदतीची दमडीसुद्धा अजूनपर्यंत शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर आलेली नाही. मोठ्या आशेने शेतकरी पासबुक घेऊन बँकेत जातात आणि ’साहेब काही खात्यावर आलयं का बघा ’, अशी केविलवाणी विचारणा बँक कर्मचार्‍यांना करताना दिसत आहेत. पालकमंत्र्यांनी केलेली घोषणा हवेत विरली की काय? अशी कुजबुज बँकेच्या परिसरात शेतकरी करताना दिसत आहेत.

खरे तर खरिपासोबत रब्बीचा हंगाम सुद्धा शेतकर्‍यांच्या हातातून गेला आहे. कारण अजूनही या भागात जमिनीतून पाणी वाहत आहे. वापसा होत नसल्याने गहू, हरबरा, ज्वारी, भाजीपाला, इत्यादी पिकांसाठी रान तयार करता येत नाही. वापसा होणार कधी आणि रब्बी पिकांची लागवड करणार कधी, या विवंचनेत शेतकरी आहेत.

सरकार शेतकर्‍याच्या पाठिशी आहे, लवकरात लवकर भरीव मदत देण्याची घोषण पालकमंत्री विखे यांनी केली खरी. पण आता शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले आहे. सरकार शेतकर्‍यांच्या पाठीशी कधी उभे राहणार आणि मदत कधी देणार ? याकडेच आता शेतकर्‍यांच्या नजरा लागल्या आहेत.

The post बोधेगाव : अतिवृष्टीचे अनुदान कधी मिळणार? appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/S4Hi05j
via IFTTT

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: