नगरची ‘मिशन आपुलकी’ दिशादर्शक! राज्यात पहिला प्रयोग

October 10, 2022 0 Comments

https://ift.tt/FVnKM4U

नगर : पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेच्या शाळेत गुणवत्ता असली, तरी भौतिक सुविधांची मात्र येथे वानवा आहे. त्यामुळे गावातही सुसज्ज शाळा खोल्या, मुलांसाठी बेंच व्यवस्था, संगणक कक्ष, प्रशस्त क्रीडांगण, ग्रंथालय अशा गरजेच्या सुविधा असाव्यात, यासाठी नगर जिल्हा परिषदेने ‘मिशन आपुलकी’ हे अभियान हाती घेतले आहे. यातून आपल्या शाळेविषयी आपुलकी असलेले अनेक दानशूर माजी विद्यार्थी गावोगावी पुढे येत आहेत. गेल्या पाच महिन्यांत अशा दानशूर व्यक्ती, संस्था, खासगी बँका, औद्योगिक कंपन्यांच्या पुढाकारातून तब्बल सात कोटींच्या भौतिक सुविधा उपलब्ध झाल्याने झेडपीच्या हजारो शाळा कात टाकताना दिसत आहे.

जिल्ह्यात झेडपीच्या 3569 शाळा असून, या ठिकाणी तीन लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवित आहेत. मात्र, भौतिक सुविधांमुळे इंग्रजी माध्यमांच्या शाळांशी स्पर्धा करण्यात जिल्हा परिषदेच्या शाळा काही प्रमाणात मागे पडत आहेत. अगदीच हेच ओळखून तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या संकल्पनेतून ‘मिशन आपुलकी’ हे अभियान हाती घेण्यात आले. संभाजी लांगोरे यांच्याकडे सीईओंचा पदभार असताना त्यांनीही या अभियानाला चांगलीच गती दिली. तर विद्यमान सीईओ आशिष येरेकर यांनीही या अभियानाला खर्‍या अर्थाने दिशा देण्याचे काम केले.

जिल्हा परिषदेतून गावोगावचे माजी विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ, दानशूूर व्यक्ती, अधिकारी, सेवानिवृत्त अधिकारी, सामाजिक संस्था, औद्योगिक कंपन्यांना मदतीसाठी आवाहन केले जात आहे. त्यांच्या लोकसहभागातून शाळांमध्ये भौतिक सुविधांची कामे केली होत आहेत. यामध्ये एखादी संस्था शाळा खोली बांधकाम करून देते, तर कोणी बेंच, कोणी संगणक, कोणी वॉटर फिल्टर, कोणी मैदान दुरुस्ती अशाप्रकारे योगदान देत आहे.

गेल्या पाच महिन्यांत ‘मिशन आपुलकी’ने तब्बल सात कोटींचा आकडा गाठला आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांच्या मार्गदर्शनात सर्व शिक्षा अभियानाचे लेखाधिकारी रमेश कासार यांनी सर्व मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थ यांच्यामध्ये समन्वयाची भूमिका घेऊन हे अभियान यशस्वी करून दाखविले आहे.

जिल्हाभरातून वाढता लोकसहभाग!
जिल्हा परिषदेच्या शाळांना सनफार्मा कंपनी, लॅव्हेन्डर लॅबोरेटरीज, लिडरशीप स्कील्ड एज्युकेशन, पुणे, मालपाणी उद्योग समूह, कमिन्स इंडिया फांऊडेशन, आयकर उपायुक्त विष्णू औटी, सीमाशुल्क उपायुक्त रोहित जोशी आदींनी संगणक प्रयोगशाळा, वर्ग खोल्या, बेंचेस सुविधांसाठी योगदान दिले आहे. प्रत्येक गावांतून आपल्या शाळेविषयी भावना जुळलेल्या असल्याने अनेक दानशूर व्यक्ती याकामी योगदान देत आहेत.

 

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये लोकसहभागातून भौतिक सुविधा वाढविण्यासाठी अनेक दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळेच अल्पावधीत सात कोटींच्या लोकसहभागातून सुविधा देण्यात यश आले आहे. सीईओ येरेकर यांच्या मार्गदर्शनात दिवसेंदिवस दानशूर व्यक्ती पुढे येत असल्याने ‘मिशन आपुलकी’ ही एक चळवळ म्हणून पुढे येताना दिसत आहे.
                                     – भास्कर पाटील, शिक्षणाधिकारी, प्राथमिक जि.प.

सीईओंकडून दानशूर व्यक्तींचे ऋणनिर्देश!
जिल्हा परिषदेच्या आवाहनाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देणार्‍या दानशूर व्यक्तींचे, कंपनी, सामाजिक संस्था प्रमुखांचे सीईओ आशिष येरेकर व शिक्षण विभाग ऋण व्यक्त करत आहेत. तसेच, संबंधितांचे शाळेत मुलांना मार्गदर्शनपर व्याख्यान ठेवले जाते. त्या ठिकाणीही त्यांचा छोटासा सन्मानही केला जात आहे. स्वतः सीईओ येरेकर,अतिरीक्त सीईओ संभाजी लांगोरे यांनीही ‘मिशन आपुलकी’त सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले.

The post नगरची ‘मिशन आपुलकी’ दिशादर्शक! राज्यात पहिला प्रयोग appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/nWFr7zG
via IFTTT

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: