जलजीवन ‘प्रशासकीय’ व्हेंटिलेटरवर ! वर्क ऑर्डर फक्त 421; प्रत्यक्षात कामे सुरू किती?

October 03, 2022 0 Comments

https://ift.tt/7EVMG9p

नगर : पुढारी वृत्तसेवा : केंद्र आणि राज्य शासनाच्या पुढाकारातून राबविल्या जाणार्‍या जलजीवन मिशनचे काम जिल्ह्यात कासवगतीने सुरू आहे. प्रत्येक योजना ही कोट्यवधीची असल्याने मर्जीतील ठेकेदाराला काम मिळावे, यासाठीचे राजकीय दबावतंत्र, यातून निविदा प्रक्रियेत होणारा विलंब, त्यात टक्केवारीची ‘खदखद’, अशा विविध कारणांमुळे ‘जलजीवन’ आज चर्चेचा आणि तितकाच चिंतेचा विषय ठरत आहे. दरम्यान, जलजीवनच्या या संथ गतीच्या कामांमुळे खरोखरच नगर जिल्हा राज्यात 12 व्या स्थानी आहे का? याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील 1005 गावांसाठी 901 पाणी योजना राबविल्या जाणार आहेत. यासाठी तब्बल एक हजार कोटींचे बजेट आहे. यातील 872 योजना झेडपीतून राबविल्या जाणार आहेत.

पाच कोटींच्या आतील 25 योजना या जीवन प्राधिकरण करणार आहेत, चार योजना ग्रामपंचायत पातळीवर होणार आहेत. जलजीवन योजनेचे अध्यक्ष जिल्हाधिकारी, सहसचिव सीईओ आणि सचिव कार्यकारी अभियंता यांच्या पातळीवरून मान्यता मिळते. जिल्ह्यातील शाळा, अंगणवाड्यांसाठीही पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.

‘बांधकाम’वर ओझं!
जिल्ह्यात पाणीपुरवठा शाखा अभियंत्यांची 50 टक्के अर्थात मंजूर 46 पैकी तब्बल 29 पदे रिक्त आहेत. मुख्यालयात चारपैकी दोन पदे रिक्त आहेत. यासह भूवैज्ञानिकाचे एकमेव पद आहे, ते देखील रिक्त आहे. कंत्राटी कर्मचारी आहेत, मात्र, त्यांच्याकडे अनुभवाची कमतरता आहे. अशावेळी सीईओंनी बांधकाम विभागाची टीम पाणी पुरवठ्यात उतरविली आहे. मात्र, बांधकाम आणि पाणीपुरवठा हे स्वतंत्र विभाग व त्यांची कामेही वेगवेगळी असल्याने निविदा प्रक्रियेदरम्यान गोंधळ उडतो. यात किचकट निविदा पात्र, अपात्र ठरविताना डोकेदुखी किंबहुना चुकाही होतात, असे तक्रारीतून दिसते.

काय आहे सध्याची परिस्थिती!
जिल्ह्यात 901 योजना आहेत, यापैकी 722 योजनांना तांत्रिक मान्यता, 671 योजनांना प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. 624 कामांची टेंडर प्रक्रिया झालेली आहे. 606 आर्थिक ओपन आहे, यापैकी 421 वर्क ऑर्डर दिल्या आहेत. यापैकी 350 कामे प्रगतिपथावर आहेत. 2 पूर्ण झाल्याचे ऑनलाईन आकडेवारीतून दिसत आहे. हे आकडे कामानुसार बदलते असणार आहेत.

मग वर्क ऑर्डर का नाही?
जिल्ह्यातील 606 कामांचे आर्थिक ओपन झाले आहे. मात्र, यापैकी 421 कामांचीच वर्कऑर्डर करण्यात आलेली आहे. मग, 185 कामांची वर्कऑर्डर का काढलेली नाही, त्यासाठी प्रशासन कशाची वाट पाहतेय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ठेकेदाराकडूनच दोन टक्के लोकवर्गणी, बॉण्ड जमा होत नसल्याने हा विलंब होत असल्याचे प्रशासन सांगत आहे. तर, ठेकेदार मात्र आम्हाला येथे कायम कामे करायची आहेत, त्यामुळे न बोललेलं बरं, असे बोलके उत्तर देत आहेत.

वॉर रुमलाही पोखरले!
सीईओंनी पारदर्शी निविदा प्रक्रियेसाठी वॉररुम तयार केले. मात्र आता काही माजी सदस्य आणि ठेकेदार देखील खुष्कीच्या मार्गाने वॉररुममध्ये प्रवेश करून फाईली पूर्ण करत असल्याचे दिसते.

The post जलजीवन ‘प्रशासकीय’ व्हेंटिलेटरवर ! वर्क ऑर्डर फक्त 421; प्रत्यक्षात कामे सुरू किती? appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/O3dM6GJ
via IFTTT

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: