नगर : सात महिन्यांनंतर तरुणाच्या खुनाचा उलगडा

September 04, 2022 0 Comments

https://ift.tt/6O5Crjv
crime

वाळकी : पुढारी वृत्तसेवा : उसने पैसे देण्याच्या बहाण्याने 25 वर्षीय तरूणाला बोलावून घेत त्याला जास्त दारू पाजली. त्यानंतर त्याला मोटारसायकलवर बसवून श्रीगोंदा तालुक्यातील कुकडी कॅनॉलजवळ नेऊन पाण्यात फेकून देत त्याचा खून केला. अतिशय थंड डोक्याने कट रचत, फिल्मी स्टाईलने केलेल्या या खुनाला नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अखेर सात महिन्यांनंतर वाचा फोडली असून, दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. सागर कुमार झरेकर (वय 25 रा. घोसपुरी ता. नगर) असे मयत तरूणाचे नाव आहे. तो दि.14 जानेवारी 2022 पासून घरातून गायब झाला होता. त्याच्या घरच्यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती. त्याचा दोघांनी खून केला असल्याची माहिती तब्बल 7 महिन्यांनंतर समोर आली असून, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विश्वनाथ ऊर्फ सुशांत सोपान भापकर (वय 28, रा.भापकर वस्ती, कोळगाव ता. श्रीगोंदा) व त्याचा मित्र गौरव गोरक्ष साके (वय 20 रा. साकेवाडी, ता. श्रीगोंदा) या दोघांना जेरबंद केले.

या खून प्रकरणाची पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अतिशय धक्कादायक आहे. मयत सागर झरेकर व आरोपी विश्वनाथ ऊर्फ सुशांत भापकर यांची ओळख होती. काही वर्षांपूर्वी मयत सागरच्या नातेवाईक तरूणीचे श्रीगोंदा तालुक्यातील एका गावात लग्न झाले. मात्र, आरोपी भापकर तिला प्रेमसंबंध ठेवण्यासाठी त्रास देत होता. परंतु, तिने त्यास नकार दिला. तिला अद्दल घडविण्यासाठी आरोपी भापकर याने प्रयत्न केले. अनेकदा त्रास दिल्यानंतर तिचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचाही त्याने प्रयत्न केला.

पुढे त्याने तिचा नातेवाईक असलेल्या सागर याच्या खुनाचा कट रचला. त्यासाठी मित्र गौरव साके यास 50 हजारांची सुपारी दिली. एक दिवस सागरला पैशांची अडचण असल्याने त्याने आरोपी भापकरला सांगितले. त्याने नियोजित कटानुसार दि.14 जानेवारी 2022 रोजी रात्री त्याला चिखली घाटात बोलावले. तेथे घाटाच्या बाजूस असलेल्या फॉरेस्टमध्ये सागरला नेऊन त्यास जास्त प्रमाणात दारू पाजली. नंतर दोघे त्यास मोटारसायकलवर बसवून श्रीगोंदा तालुक्यातील मोहरवाडी गावाच्या शिवारात घेऊन गेले. रात्री 9.30 च्या सुमारास त्याला कुकडी कॅनॉलच्या पाण्यात फेकून दिले.

दारू जास्त पिलेला असल्याने सागर याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला व त्याचे प्रेत कॅनॉलच्या पाण्यात वाहून गेले. काही दिवसांपूर्वी बेलवंडी पोलिसांना कॅनॉलच्या पाण्यात एक पूर्णपणे कुजलेले प्रेत आढळून आले होते. मात्र, मयताची ओळख पटू शकलेली नव्हती. इकडे सागर झरेकरचा शोध त्याच्या घरच्यांना किंवा नगर तालुका पोलिसांना लागलेला नव्हता.

असा झाला खुनाचा उलगडा..
दरम्यानच्या काळात सागरच्या आई-वडिलांनी पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेऊन सागरचा तपास लावण्याची विनंती केली. पोलिस अधीक्षक पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना या प्रकरणाचा समांतर तपास करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तपास करत असताना पोलिस निरीक्षक कटके यांना एका खबर्‍याने आरोपी गौरव साके याने हा खून केला असल्याची माहिती दिली. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने साकेवाडी येथे जाऊन गौरव साके याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्याने कबुली देत, त्याचा मित्र विश्वनाथ भापकर अशा दोघांनी हा खून केल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी कोळगाव येथे जाऊन आरोपी भापकर याला ताब्यात घेतले.

त्यानंतर दोघांकडून या फिल्मी स्टाईलने केलेल्या खुनाचा उलगडा झाला. शुक्रवारी (दि.2) रात्री याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अंमलदार सुनील चव्हाण यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून विश्वनाथ ऊर्फ सुशांत सोपान भापकर व गौरव गोरक्ष साके यांच्या विरोधात भा.दं.वि. कलम 302, 201,120 (ब), 34 अन्वये कट रचून खून केल्याचा गुन्हा दाखल केला. गुन्हा उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके, सहायक पोलिस निरीक्षक दिनकर मुंढे, गणेश इंगळे यांच्यासह पथकाने प्रयत्न केले.

आरोपी भापकर सराईत गुन्हेगार
आरोपी विश्वनाथ भापकर हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध खून, दुखापत करणे, महिला अत्याचार असे गंभीर स्वरूपाचे 4 गुन्हे बेलवंडी, श्रीगोंदा व नगर तालुका पोलिस ठाण्यात दाखल आहेत.

The post नगर : सात महिन्यांनंतर तरुणाच्या खुनाचा उलगडा appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/4KwTMjE
via IFTTT

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: