श्रीगोंदा : योजना झाली, पण मिळेना शुद्ध पाणी !

September 12, 2022 0 Comments

https://ift.tt/TYk5nMA

श्रीगोंदा : पुढारी वृत्तसेवा :  शहराची पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी युआयडीएसएसएमटी योजनेंंतर्गत 50 कोटी रूपये खर्च करून घोड धरणावरून पाणी योजना करण्यात आली. ही योजना कार्यान्वित होऊन चार वर्षे झाली. मात्र, अत्याधुनिक शुद्धीकरण यंत्रणा बसविण्याकडे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांना शुद्ध, नियमित व पूर्ण दाबाने पाणी मिळत नाही. या योजनेतील काही निधी शिल्लक राहिलेला असून, यातून पाणीयोजनेसाठी अत्याधुनिक शुद्धीकरण यंत्रणा बसवण्याची तरतूद करण्यात आलेली आहे.

एक वर्षांपूर्वी अत्याधुनिक पाणी शुद्धीकरण प्रकल्प बसविण्यासाठी प्रशासकीय मान्यता घेण्यात आली. परंतु, त्या नंतर आजतागायत त्याची ई-निविदा काढण्याची कुठलीही प्रक्रिया केली गेली नाही. ही निविदा का काढली गेली नाही? यामागे नेमके कुणाचे हितसंबंध आहेत, असा सवाल शहरवासीय करत आहेत. जलशुद्धीकरण यंत्रणा न बसविल्याने शहरवासीयांना आजही अशुद्ध पाणी मिळत आहे. नगरपालिकेकडून अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना पिण्यासाठी पाणी विकत घ्यावे लागत आहे.

पाणीपुरवठा व वितरण व्यवस्थेवर दर महिन्याला चार लाख रुपये खर्च होतात. तरीही पाण्याचा पीएच नियंत्रित होत नाही. व्हॉल्व्ह संचलन व्यवस्थित न केल्याने पाणीपुरवठा सुरळीत होत नाही व शहरवासीयांना पूर्ण दाबाने पाणी मिळत नाही. या पाणी योजनेमध्ये शासकीय धोरणाप्रमाणे प्रत्येक पाणी कनेक्शनला मीटर बसविण्यात आले होते. मात्र, श्रीगोंदा नगरपरिषद मीटरने पाणी न देता वार्षिक सरासरी बिले आकारते. यामुळे शासनाच्या धोरणाला हरताळ फासला जात आहे.

पालिकेचा भ्रष्ट कारभार जबाबदार
अनेक वर्षे होऊनही नगरपरिषदेकडून शुद्ध पाणीपुरवठा केला जात नाही. पाणी योजनेचा निधी शिल्लक असूनही, स्वयंचलित पाणी शुद्धीकरण योजना कार्यान्वित केली गेली नाही. यामुळे शहरातील नागरिकांच्या आर्थिक व अशुद्ध पाण्यामुळे शारीरिक नुकसानीस श्रीगोंदा नगरपरिषदेचा भ्रष्ट कारभार जबाबदार असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचे सतीश बोरूडे यांनी केला.

योजनेसाठी नव्याने ठराव
पाणी शुद्धीकरण प्रकल्पात नवीन प्रणाली बसविण्याचा ठराव मागील सभेत मंजूर करण्यात आला. त्याची अंदाजपत्रकीय रक्कम दोन कोटी सात लाख रुपये आहे. त्यामध्ये संपूर्णपणे कॉम्प्युटराईज्ड प्रणालीद्वारे संचलन होणार आहे. कोठे बिघाड झाल्यास ही प्रणाली ऑपरेटरला सतर्क करेल. व्हॉल्व्ह वितरण व्यवस्था पूर्णपणे स्वयंचलित करण्यात येईल. पाण्यामध्ये क्लोरिनचे प्रमाणही स्वयंचलित असल्याने पाण्याचा पीएच नियंत्रित होईल. या प्रकल्पाची क्षमता प्रतिदिन 8.3 एमएलटी आहे. प्रकल्पाची देखभाल दुरुस्ती सहा वर्षे ठेकेदाराकडे आहे.

लवकरच निविदा निघेल : मुख्याधिकारी
अत्याधुनिक पाणी शुद्धीकरण योजना त्यावेळीच होणे अपेक्षित होते. आपण त्यासाठी पाठपुरावा करत असून, लवकरच पाणी शुद्धीकरण योजनेची निविदा निघेल. काही ठिकाणी व्हॉल्व्हला गळती असल्यामुळे त्या भागात अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. या व्हॉल्व्ह दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे, असे नगरपालिका मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी दै.पुढारीशी बोलताना सांगितले.

The post श्रीगोंदा : योजना झाली, पण मिळेना शुद्ध पाणी ! appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/LsjnlFe
via IFTTT

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: