नगर : गट व गणांची फेरआरक्षण सोडत अटळ

August 03, 2022 0 Comments

https://ift.tt/RhIYQ4M

नगर : पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषद गट व गणांच्या आरक्षण सोडतीवर शेवटच्या दिवसापर्यंत एकूण 70 हरकती दाखल झाल्या. श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव गटाच्या आरक्षणाविरोधात सर्वाधिक हरकती आहेत. जिल्हा प्रशासनाने आरक्षण सोडतीसाठी 2007 साली काढलेल्या शुद्धीपत्रकाचा (सुधारित आरक्षण सोडत) वापर केला नाही. त्यामुळे काही गट व गणांचे आरक्षण चुकीचे झाल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे प्रशासनावर गट व गणांचे आरक्षण पुन्हा काढण्याची वेळ येणार आहे.

आरक्षणाविरोधात दाखल हरकतींची तपासणी करुन प्रस्ताव निवडणूक आयोगाला पाठविण्यात येणार आहे. आयोगाच्या मार्गदर्शनानुसार आरक्षणाबाबत कार्यवाही केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची पूर्वतयारी सुरू आहे. जिल्हा प्रशासनाने गट व गणांची आरक्षण सोडत गुरुवारी (दि.28) काढली. यासाठी जिल्हा प्रशासनाने 2002, 2007, 2012 व 2017 या चार पंचवार्षिक निवडणुकीच्या आरक्षण सोडतीचा आधार घेतला.

त्यानंतर या सोडतीवर हरकती मागविण्यात आल्या. पहिल्या दिवशी श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव गटबाबात हरकत दाखल झाली. त्यानंतर या गटावर सर्वाधिक हरकती दाखल होऊ लागल्या. 2007 मध्ये हा गट अनुसूचित जातीसाठी राखीव होता. मात्र, 2006 च्या गॅझेटमध्ये हा गट नागरिकांचा मागासवर्ग दाखविण्यात आला. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मागविले. जिल्हा प्रशासनाने आरक्षण सोडतीबाबतचे 2007 मधील शुध्दीपत्रकच वापरले नसल्याचे आयोगासमोर उघड झाले.

आढळगावसह इतर अनेक गटांच्या आरक्षणात घोळ झाल्याचे पुढे आले. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रातील वातावरण तापले आहे. आरक्षण सोडतीवर हरकती मागविण्यात आल्या. मात्र, उपलब्ध हरकतींवर सुनावणी घेण्याची पध्दत नाही. त्यामुळे उपलब्ध होणार्‍या हरकती तपासून आवश्यक वाटेल त्या ठिकाणी दुरुस्ती करण्यात येणार होते. मात्र, 2007 मध्ये प्रसिध्द झालेली सुधारित आरक्षण वा शुध्दीपत्राची दखल जिल्हा प्रशासनाने घेतली नाही. 2006 च्या गॅझेटचा आधार घेत आरक्षण सोडत काढली आहे. त्यामुळे आरक्षण सोडतीचा गोंधळ होऊन काही गट व गणांचे आरक्षण चुकीचे झाले असल्याचे नुकतेच निदर्शनास आले.

हरकतदारांची बैठक
जिल्हा प्रशासनाने मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयातील पंडित नेहरु सभागृहात बैठक घेतली. बैठकीत काही हरकतदारांचे म्हणणे एकूण घेण्यात आले. 2022 चे आरक्षण काढताना 2006 च्या गॅझेटचा वापर केला आहे. या गॅझेटचा 2012 व 2017 देखील वापर करुन आरक्षण सोडत काढण्यात आली. मात्र न्यायालयाच्या आदेशामुळे 2006 ची आरक्षण सोडत पुन्हा काढण्यात आली होती. त्याचे शुद्धीपत्रक उपलब्ध होते.

या शुद्धीपत्रकानुसार आरक्षण सोडत काढली जाणे गरजेचे होते. परंतु, तसे काही झाले नाही. सोमवारी आयोगाकडून शुध्दीपत्रक मिळाले आहे. उपलब्ध हरकती तपासून शुद्धीपत्रकाचा आधार घेऊन पुन्हा काही गट व गणांची सोडत काढली जाईल, अशी माहिती उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील यांनी दिली. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या काही गटांची तसेच काही गणांची पुन्हा आरक्षण सोडत काढली जाण्याची शक्यता आहे.मात्र, ही आरक्षण सोडत सर्व गट व गणांची होणार का याचा निर्णय राज्य निवडणूक आयोग घेणार आहे. आयोग कोणता निर्णय घेतो, याकडे आता सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

काष्टी गटाचे फेरआरक्षण करण्याची मागणी
श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी जिल्हा परिषद गटावर गेल्या चाळीस वर्षात कधीही अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गाचे आरक्षण पडलेले नाही. आमदार बबनराव पाचपुते हे राजकीय दबावाखाली हा गट अराखीव ठेवत असल्याचा आरोप अनिल ठवाळ यांनी केला. काष्टी गटाचे फेरआरक्षण करण्यात यावे अशी हरकत अनिल ठवाळ यांनी घेतली आहे.

शेवटच्या दिवशी 35 हरकती
आरक्षण सोडतीवर शेवटच्या दिवशी 35 हरकती दाखल झाल्या आहेत. आरक्षण सोडतीवर एकूण 70 हरकती दाखल झालेल्या आहेत. सोमवारी अरविंद साळवी यांची शिरसगाव, उंदीरगाव बेलापूर गणाविरोधात हरकत दाखल झाली. संजय घुगे (मानोरी गण), संदीप मगर (दत्तनगर गट व गण), संपत बावडकर (मिरजगाव गण), जितेंद्र तोरणे व अण्णासाहेब कांदळकर , (श्रीरामपूर तालुक्यातील चारही गट), संदीप मगर व इतर चौघे ( दत्तनगर), ज्ञानेश्वर पेचे (पाचेगाव गट-गण), रमेश घोरपडे (पाचेगाव गट), श्रीकांत ठवाळ (आढळगाव), ज्ञानदेव सालबंदे (सात्रळ गट), सचिन पवार (शिरसगाव गण), तात्याराम घोडके (आढळगाव गट), शांताराम संगारे (अकोले सर्व गण), रामदास बाचकर (बारागाव नांदूर गट), राजेंद्र ढोकचौवळे (श्रीरामपूर सर्व गट), किशोर रामू शिंदे (अकोले सर्व गण ), जालिंदर ठोकळ(उंदीरगाव, टाकळीभान, दत्तनगर व बेलापूर गट), शंकर नेहे(अकोले सर्व गण), सुखदेव येसेकर (श्रीरामपूरचे सर्व गट), नंदा पवार (बेलापूर गण), भाऊसाहेब शिंदे (बेलपिंपळगाव गट), सुरेश डिके (बेल पिंपळगाव गट),गहिनीनाथ आदिनाथ पालवे (कोरेगाव गट), सचिन सखाराम पोटरे (चापडगाव गट), निखिल धोंडीराम शेलार, विजय मच्छिंद्र रसाळ (पूर्ण 85 गट), सचिन कराळे (भेंडा बु. गट ), विजय पांढरे (सर्व गण-गट) विजयसिंह गोलेकर (जामखेड सर्व गट) मच्छिंद्र धुमाळ (अकोले सर्व गट), रवींद्र ढेपे (श्रीरामपूर सर्व गट) बाबासाहेब भागवत (बेलपिंपळगाव गट) तसेच अमोल खताळ यांनी जिल्ह्यातील सर्वच गटांचे आरक्षण चुकीचे झाले असल्याची हरकत दाखल केली आहे.

The post नगर : गट व गणांची फेरआरक्षण सोडत अटळ appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/sP5wRxB
via IFTTT

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: