नगर : राष्ट्रवादी आमदारांच्या साक्षीने भाजप मंत्र्याचे अभिनंदन! नगरमध्ये चर्चेला ऊत!!

August 17, 2022 0 Comments

https://ift.tt/Vm8BYzh

नगर, पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडी सरकार पायउतार होऊन, भाजप-शिंदे गटाचे सरकार सत्तेत आले. भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील हे एकमेव नेते नगरमधून मंत्री झाले. भाजपकडून त्यांना महसूलमंत्री पद देण्यात आले आहे. उत्साही विखे समर्थक व काँग्रेसचे माजी नगरसेवक निखील वारे यांनी नगर शहराच्या सावेडी उपनगरात ठिकठिकाणी विखेंच्या अभिनंदनाचे फलक लावले खरे, मात्र त्यावरील राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप यांची असलेली छबी अन् वारेंचा ‘तिहेरी डगरीवरील हात’ चर्चेचा विषय ठरला आहे.

निखील वारे हे काँग्रेसचे माजी पदाधिकारी, तर त्यांच्या पत्नी रूपाली वारे या काँग्रेसच्या विद्यमान नगरसेविका आहेत. भाजपचे खा. सुजय विखे व राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप हे लोकसभा निवडणुकीत एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते. दोघे एकमेकांचे प्रतिस्पर्धी झाल्याने दोघांचे निकटवर्तीय निखील वारेंची मात्र त्यावेळी कोंडी झाली होती. त्या लोकसभा निवडणुकीत वारे उघडपणे भाजपचे उमेदवार सुजय विखे यांच्या बाजूने उभे राहिले होते. या निवडणुकीत जगताप यांचा पराभव झाला, तर विखे पाटील खासदार झाले.

पुढे विधानसभा निवडणुकीत आ. संग्राम जगताप नगर शहरातून पुन्हा राष्ट्रवादीचे उमेदवार झाले. त्यावेळी वारे यांनी भाजप-सेना युतीचे उमेदवार दिवंगत सेना नेते अनिल राठोड यांच्या उमेदवारी विरोधात भूमिका घेत आ. जगताप यांची पाठराखण केली होती. या विधानसभा निवडणुकीत आ. जगताप यांचा विजय झाला.

शहर विकासाच्या मुद्द्यावर एकत्र!

आ. जगताप राष्ट्रवादीचे, तर खा. डॉ. सुजय विखे हे भाजपचे असले तरी, गतकाळात झाले गेले विसरून दोघेही नगर शहर विकासाच्या मुद्द्यावर एकत्र आले आहेत. या दोघांचं पुन्हा एकत्र येणं, हेच माजी नगरसेवक वारेंच्या पथ्थ्यावर पडले. पुढे वारे यांच्याकडे असलेले काँग्रेसचे पद गेले तरी, त्यांच्या पत्नी रुपाली या मात्र अजूनही काँग्रेसच्या नगरसेविका आहेत.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार व विखे कुटुंबातील राजकीय द्वंद नगरसह राज्यालाही सर्वश्रृत आहे. विखे कुटुंब भाजपात असले तरी खा. डॉ. सुजय विखे व राष्ट्रवादीचे नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांची विकासाच्या मुद्द्यांवर सहमती एक्सप्रेस सुसाट धावते आहे. पारनेर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आ. नीलेश लंके यांना राजकीय प्रतिस्पर्धी मानणार्‍या खा. विखेंच्या नगर शहरात बदलणार्‍या राजकीय भूमिकेची अनेकदा चर्चा होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत विखे-जगताप सहमती एक्सप्रेस सुरू आहे. अशातच आता काँग्रेसचे माजी नगरसेवक निखील वारे यांचे ‘ते’ होर्डिंग्ज चर्चेचा विषय ठरले आहेत. भाजपचे मंत्री विखे पाटील यांचे अभिनंदन करणारे काँग्रेसचे माजी नगरसेवक वारे यांनी होर्डिंग्जवर राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप यांची छबी झळकावत पुन्हा ‘तिहेरी डगरी’चे प्रदर्शन घडविल्याने चर्चेचा विषय झाला आहे.

पक्षीय राजकारणातही जपली मैत्री

भाजपच्या विखे कुटुंबियांशी सलगी, राष्ट्रावादीचे आमदार संग्राम जगताप यांच्याशी असलेली मैत्री व पत्नी काँग्रेसची नगरसेविका, अशा तिहेरी डगरीवर निखील वारेंचे ‘हात’ आहेत. भाजप-शिंदे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर विखे पाटील यांना महसूलमंत्री पद मिळाले आहे. उत्साही वारे यांनी सावेडी उपनगरात ठिकठिकाणी मंत्री विखे यांच्या अभिनंदनाचे फलक लावलेले आहेत. मात्र, त्या फलकावर राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचीही छबी झळकवित वारेंचे मैत्रीप्रेम उचंबळून आले आहे. विखेंशी सलगी, जगतापांशी मैत्री असणे वेगळे आणि पक्षीय राजकारण वेगळं, याचा विसर वारे यांना पडल्याची चर्चा नगरच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

The post नगर : राष्ट्रवादी आमदारांच्या साक्षीने भाजप मंत्र्याचे अभिनंदन! नगरमध्ये चर्चेला ऊत!! appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/CamQkso
via IFTTT

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: