नगरमध्ये लाचखोरीने डागाळली ‘खाकी’!

August 03, 2022 0 Comments

https://ift.tt/9XvQuWH
police

नगर, पुढारी वृत्तसेवा : अवैध व्यवसायाला पाठबळ देण्यासाठी पोलिस ठाण्यात चालणारी हप्तेखोरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईनंतर चव्हाट्यावर आली आहे. अवैध दारू विक्री करण्यासाठी तोफखाना पोलिस ठाण्याचा पोलिस नाईक शैलेश गोमसाळे याच्या वतीने पंटर वैभव साळुंके याला 30 हजारांची लाच घेताना नाशिक परिक्षेत्राच्या ‘एसीबी’ पथकाने मंगळवारी रंगेहाथ पकडले.

पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी हप्तेखोरी सुरू असल्याच्या चर्चेवर मंगळवारी झालेल्या कारवाईने शिक्कामोर्तब झाले. तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत विना परवाना दारूची विक्री करण्यासाठी दर महिन्याला 30 हजार रूपये हप्ता घेण्याचे पोलिस नाईक गोमसाळे याने मान्य केले होते. याबाबत 35 वर्षीय व्यक्तीने लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्यानुसार नाशिकच्या पथकाने वैभव साळुंके याला पोलिस नाईक शैलेश गोमसाळे याच्या मार्फत पाईपलाईन रोडवरील एकविरा चौकात सिटी स्टोअर येथे 30 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.

या लाचेची मागणी तक्रारदार यांच्याकडे दि. 21 जुलै रोजी करण्यात आली होती. दरम्यान, मंगळवार दि. 2 ऑगस्ट रोजी लाच स्वीकारताना एकाला रंगेहाथ पकडण्यात आले. या ‘ट्रॅप’मध्ये तोफखाना पोलिस ठाण्याच्या पोलिस नाईकाचे नाव आल्याने पोलिस दलात खळबळ उडाली होती. आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. ही सापळा कारवाई एसीबीच्या पोलिस निरीक्षक साधना इंगळे यांच्या मागदर्शनाखाली सचिन गोसावी, प्रफुल माळी, चंद्रशेखर मोरे, शरद हेंबाडे, संतोष गांगुर्डे या पथकाने केली.

आणखी नावे उघड होणार?

आरोपी वैभव साळुंके याला अटक करण्यात आल्यानंतर ‘एसीबी’च्या पथकाने कसून चौकशी सुरू केली आहे. हप्ता मागण्यासाठी कोणाचे पाठबळ होते का? तसेच, आणखी कोणाचा यात सहभाग आहे का? याची चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

बाकीच्यांचेही दणाणले धाबे

तोफखाना पोलिस ठाण्याचा पोलिस नाईक लाचेच्या जाळ्यात अडकल्यानंतर पोलिस दलात खळबळ उडाली. या कारवाईने अवैध धंद्यांना पाठबळ देणार्‍या इतर पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकार्‍यांचे धाबे दणाणले असल्याची चर्चा पोलिस वर्तुळात आहे.

The post नगरमध्ये लाचखोरीने डागाळली ‘खाकी’! appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/A9HVCLW
via IFTTT

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: