जेऊर परिसरात पुन्हा बिबट्याचा धुमाकूळ, चाफेवाडी डोंगराजवळ शेळीवर हल्ला

August 04, 2022 0 Comments

https://ift.tt/iYBRd1Z

नगर तालुका : पुढारी वृत्तसेवा:  नगर तालुक्यातील जेऊर परिसरात पुन्हा बिबट्याने धुमाकूळ घातला असून, मंगळवारी (दि. 2) भरदुपारी बिबट्याने शेळीवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे जेऊरकरांत भीतीचे वातावरण आहे.
जेऊर येथील चाफेवाडी डोंगर परिसरातील राळरास येथे बिबट्याने चारच्या सुमारास शेळीवर हल्ला केला. भिवा घुले हे मेंढ्या व शेळ्या चारत असताना अचानक बिबट्याने शेळीवर हल्ला केला. त्यांनी दगड मारत बिबट्याला हुसकावून लावले. यापूर्वी घुले यांच्याच पालावर हल्ला करत तीन मेंढ्या व एका कुत्र्याची शिकार बिबट्याकडून करण्यात आली. होती.

याच परिसरात राहणार्‍या दादा काळे व नरेंद्र तोडमल यांच्या कुत्र्याची शिकार करण्यात आली होती, तसेच चांगदेव कोकाटे यांच्या गायीची, तर सूरज तोडमल, गणेश शेटे, जालिंदर पवार यांच्या शेळ्यांची शिकार बिबट्याकडून करण्यात आली. सूरज तोडमल यांच्या गोठ्यातील गायीला गंभीर जखमी केल्याची घटना मागील महिन्यात घडली होती. अनेक कुत्रे व शेतकर्‍यांच्या शेळ्या देखील गायब झाल्या आहेत. या घटनांवरुन चापेवाडी परिसरातील डोंगरात बिबट्याचे अनेक दिवसांपासून वास्तव्य असल्याचे स्पष्ट होते, तसेच वनविभागाच्या वतीने केलेल्या ठसे तपासणीवरून येथे बिबट्याच असल्याचे स्पष्ट करण्यात आलेले आहे.

जेऊर परिसरात गेल्या वर्षभरापासून बिबट्यांनी धुमाकूळ घातला असून अनेक पाळीव प्राण्यांची शिकार करण्यात आली आहे. भवानी माता डोंगर परिसरात राहणार्‍या काळे वस्तीवरील नागरिकही आठ दिवसांपासून दररोज बिबट्या पाहत असल्याचे सांगण्यात येते. येथे वनरक्षक श्रीराम जगताप, मनेष जाधव, माजी सरपंच मधुकर मगर, शरद तवले, हर्षल तोडमल, निखिल तोडमल यांनी पाहणी केली. गवारे वस्ती, काळे मळा, इमामपूर येथील तुकाई माता मंदिर डोंगर परिसर, खंडोबा माळ, चाफेवाडी परिसरात वारंवार बिबट्याचे दर्शन झाले आहे. जेऊर परिसरात बिबट्यांची संख्या जास्त असल्याचे दिसून येते. बिबट्यांचा वावर मानववस्तीकडे आढळून येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ग्रामसुरक्षा यंत्रणेमार्फत संपूर्ण गावाला संदेश देऊन सतर्क करण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल कराळे यांनी जखमी शेळीवर उपचार केले. यावेळी पोलिस व वनमित्र पथकाचे मार्गदर्शक पत्रकार शशिकांत पवार, हर्षल तोडमल, आकाश तोडमल, बंडू पवार तसेच नीलेश पवार, दीपक पवार उपस्थित होते. वनविभागाच्या वतीने उपवन संरक्षक सुवर्णा माने, तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक मनेष जाधव, श्रीराम जगताप, तसेच वन कर्मचारी जेऊर परिसरातील डोंगर रांगांमध्ये गस्त घालून पाहणी करत आहेत.

बिबट्या दिसल्यास संपर्क साधा
जेऊर परिसरातील गर्भगिरीच्या डोंगर रांगांमध्ये बिबट्यांचे वास्तव्य आढळून आलेले आहे. त्यांच्याकडून अनेक पाळीव प्राण्यांच्या शिकार करण्याच्या घटना देखील घडलेल्या आहेत. समस्त नागरिकांना आवाहन करण्यात येते की सर्वांनी आपली व आपल्या मुलांची काळजी घ्यावी, तसेच बिबट्या दिसल्यास त्याची छेड न काढता तत्काळ वन विभाग अथवा पोलिस व वनमित्र पथकाशी संपर्क साधावा, असे आवाहन माजी सरपंच बंडू पवार यांनी केले.

 

जेऊर परिसरात बिबट्याचे वास्तव्य आढळून आले आहे. वनविभागाच्या वतीने जनजागृती करण्यात येत आहे. बिबट्यापासून घ्यावयाच्या काळजीची माहिती नागरिकांना देण्यात येते. आजपर्यंत बिबट्याकडून पाळीव प्राण्यांच्या शिकारीच्या घटना घडल्या आहेत. परंतु मानवावर हल्ल्याची घटना घडली नसल्याने ही समाधानाची बाब आहे. बिबट्याची काळजी नागरिकांनी घ्यावी. जेऊर परिसरात वनविभागाच्या वतीने गस्त घातली जात आहे.
                                                          – श्रीराम जगताप, वनरक्षक, वनविभाग.

The post जेऊर परिसरात पुन्हा बिबट्याचा धुमाकूळ, चाफेवाडी डोंगराजवळ शेळीवर हल्ला appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/SkhnOB4
via IFTTT

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: