नाथांच्या दर्शनास भक्तांची मांदियाळी ! मढीत पालखी सोहळ्याला हजारोंची गर्दी

August 14, 2022 0 Comments

https://ift.tt/QKyjpbO

मढी : पुढारी वृत्तसेवा :  श्री क्षेत्र मढी येथे तिसर्‍या श्रावणी शुक्रवारनिमित्त आयोजित कानिफनाथांच्या पालखी सोहळ्यासाठी राज्याच्या विविध भागातून आलेल्या हजारो भाविकांनी गर्दी केली होती. ढोल-ताशांचा निनाद, फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण व कानिफनाथांचा जयजयकाराने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. पालखी गडावरून ग्राम प्रदर्शनासाठी येत असताना पालखी मार्ग भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता. रंगपंचमी यात्रेनंतर एक प्रकारे श्रावण यात्राच भरल्याचे चित्र शुक्रवारी मढी नगरीत दिसून आले. प्रत्येक श्रावणी शुक्रवारी मढी गावातून नाथांची पालखी व पंचधातू घोड्याची वाजत गाजत मिरवणूक निघते. तिसर्‍या शुक्रवारी मात्र पालखी सोहळ्याला यात्रेचे स्वरूप येते. भांगरवाडी, लोणावळा, आळंदी, जळगाव, पुणे, नाशिक, मावळ, ठाणे, मोशी यांसह विविध गावातील पायी दिंडी व पालख्या वाजत गाजत मढी येथे कानिफनाथांच्या उत्सवासाठी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.

कानिफनाथांच्या संजीवन समाधी मंदिराचा गाभारा, सभामंडप, मुख्य मंदिर, तसेच सर्वच ठिकाणी विविध रंगांची आकर्षक फुले व फुग्यांनी वैशिष्ट्यपूर्ण केलेली सजावट भाविकांचे लक्ष वेधून घेत होती. देवस्थान समितीच्या वतीने पालखी मार्गावर सुशोभीकरण व आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. भाविकांनी गुरुवारपासूनच मढी येथे गर्दी केली होती. चिंचेचा बाग, यात्रा मैदान, गणेश चौक भक्तनिवास परिसर येथील वाहनतळ भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते. शुक्रवारी रात्री देवस्थान समितीचे अध्यक्ष व विश्वस्त यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.

यावेळी मढी देवस्थानचे अध्यक्ष तथा सरपंच संजय मरकड, सचिव विमलताई मरकड, कोषाध्यक्ष बबन मरकड, विश्वस्त भाऊसाहेब मरकड, रवींद्र आरोळे, शामराव मरकड, माजी सरपंच देविदास मरकड, बाबासाहेब मरकड, लक्ष्मण महाराज मरकड, भाग्येश मरकड, बबन ढवळे, अमोल मरकड, रवींद्र मरकड, बाळासाहेब मरकड आदी उपस्थित होते. रात्री नंतर नऊ वाजता कानिफनाथांच्या मुख्य पालखी सोहळ्यास प्रारंभ झाला. या मिरवणुकीत कानिफनाथांचा पंचधातूचा घोडा असतो. पालखी सोहळ्याच्या दर्शनासाठी राज्याच्या विविध भागातून आलेल्या हजारो भाविकांनी व मढी ग्रामस्थांनी शांततेत दर्शन घेतले.

मढी येथील युवकांनी लेझीम नृत्य सादर केले. त्यात लोणावळा बांगरवाडी येथील विविध ढोल पथके सहभागी झाली होते. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पालखी मिरवणुकीत तरुणाईचा उत्साह, जल्लोष पाहायला मिळाला. बँड आणि ढोल ताशांच्या तालावर तरुणाईने एकच ठेका धरला. औरंगाबाद येथील प्रा.राजेश सरकटे यांच्या भावभक्ती गीतांच्या कार्यक्रमाने भाविकांना मंत्रमुग्ध केले. पुणे येथील शंंकर महाराज अन्नछत्र मंंडळाच्या वतीने भाविकांना महाप्रसाद देण्यात आला.

देवस्थानकडून चोख व्यवस्था
श्रावणी शुक्रवारनिमित्त मढी देवस्थानने चोख व्यवस्था केल्याने भाविकांना दर्शन सुलभपणे घेता आले. पिण्याचे पाणी, पार्किंग व्यवस्था, इतर सुखसुविधा भाविकांना देण्यात आल्या. गर्दीचा फायदा घेत चोरटे दरवर्षी पालखी सोहळ्यात आपला हात साफ करत असतात. यावर्षी चोरट्यांना अटकाव करण्यासाठी देवस्थान समितीचे अध्यक्ष संजय मरकड विश्वस्त मंडळ, कर्मचारी, पोलीस मित्र यांनी खडा पहारा दिल्याने वृद्ध नागरिकांसह महिला व भाविकांनी समाधान व्यक्त केले.

The post नाथांच्या दर्शनास भक्तांची मांदियाळी ! मढीत पालखी सोहळ्याला हजारोंची गर्दी appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/NcZBRPW
via IFTTT

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: