नगर : ‘समन्यायी’च्या तिढ्यातून यंदाही सुटका

July 20, 2022 0 Comments

https://ift.tt/kQ2wyBc
jayakwadi dam

महेश जोशी : 

कोपरगाव : अहमदनगर व नाशिक जिल्हावर दरवर्षी समन्यायी पाणीवाटप कायद्यामुळे नेहमीच टांगती तलवार असते. मात्र, वरुणराजाची चांगली कृपादृष्टी होत असल्याने, गेल्या दोन वर्षांपासून जायकवाडी (नाथसागर) धरण पूर्ण क्षमतेने भरत आहे. त्यामुळे यावर्षीही ‘समन्यायी’च्या तिढ्यातून दोन्ही जिल्ह्यांची सुटका होणार असल्याने, त्यांना दिलासा मिळाला आहे.

जायकवाडीसाठी पाणी सोडावे लागेल काय, या अनिश्चिततेमुळे दोन्ही जिल्ह्यात हंगामातील पिकांचे नियोजन करणे दुरापास्त होते. त्याचा परिणाम साहजिकच एकूण उत्पादन क्षमतेवर होतो. गेल्या दोन-तीन वर्षांपासून जायकवाडीला पाणी सोडण्याची वेळ आलेली नाही. यावर्षी 17 जुलैलाच जायकवाडीतील पाणीसाठा 65 टक्के झाल्याने, हा प्रश्न यावर्षी फार लवकर निकाली निघाला.

त्यामुळे अनिश्चितता दूर होऊन कालवे लाभक्षेत्रातील पीक नियोजन करणे सुलभ होईल. परंतु, दरवर्षी अशीच परिस्थिती राहील, असे नाही. मागील अनुभव पाहता बर्‍याचदा पावसाळा संपत आला, तरी याबाबत निर्णय घेता आलेला नाही, अशी वस्तुस्थिती आहे. यात मुख्य मुद्दा खरिपातील पिकांना पाणी देण्याचा असतो.

हा भाग पर्जन्य छायेतील असल्याने वेळेवर पुरेसा न पाऊस झाल्यास खरिपातील पिके धोक्यात येतात. जायकवाडी 37 टक्के भरूनसुद्धा मेंढेगिरी अहवालातील पर्याय क्रमांक 1 ची अंमलबजावणी करण्याचे टाळले जाते. याबाबत मेंढेगिरी अहवालानुसार पर्याय क्रमांक 3 ची म्हणजे जायकवाडी 65 टक्के भरण्याची वाट पाहिली जाते. अर्थातच ते होईपर्यंत ऑगस्ट महिना संपायला येतो. तोपर्यंत खरिपातील पिके पाण्याअभावी सुकून जातात. विशेष म्हणजे या महत्त्वाच्या विषयाकडे प्रशासन फारसे गांभीर्याने पाहत नाही.

सर्व लोकप्रतिनिधींनी याबाबत चर्चेच्या माध्यमातून वास्तव जाणून घेऊन धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी लाभधारकांतून सातत्याने मागणी होते. उर्ध्व गोदावरी खोरे हे अतितुटीचे आहे. त्यात पाण्याची समृद्धी व्हावी, यासाठी माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी पश्चिमेचे समुद्राला वाहून जाणारे पाणी पूर्वेला वळवावे, म्हणून विधिमंडळात सन 2000 मध्ये मंजुरी घेऊन ठेवली.

या प्रकल्पाला केंद्र व राज्य शासनाने चालना देऊन पाण्यांची तूट भरून काढून नगर-नाशिकसह मराठवाड्याचा प्रादेशिक पाण्याचा वाद संपुष्टात आणण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत, त्यादृष्टीने सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच कॅबिनेटमध्ये निर्णय देखील केला आहे.

निसर्गाने यंदा जायकवाडीत 65 टक्क्यांच्यापुढे पाणीसाठा निर्माण केला. मेंढेगिरी समिती आणि समन्यायी पाणी वाटपाचा कोलदांडा बारमाही सिंचन असलेल्या गोदावरी कालव्यांनाच बसतो. यंदा गोदावरी कालव्यांची 15 ऑक्टोबरच्या आत सुटका झाल्याने वरुणराजाचे आम्ही आभारी असल्याची प्रतिक्रिया संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी दिली.  वाढत्या शहरीकरणासह औद्योगिकीकरणाचा बिगर सिंचन पाण्याचा भार दारणा, गंगापूर धरणांवर टाकला जातो, तो टाकू नये. तुटीच्या पाण्याचे वाटप करण्याऐवजी सरप्लस पाण्यांचे वाटप व्हावे, असेही कोल्हे म्हणाले.

गेल्या पंधरा वर्षांनंतर पहिल्यांदाच इतक्या कमी वेळात म्हणजे 15 जुलैच्या आत दारणा, गंगापूर धरणातून नदीपात्रात पाणी सोडणे भाग पडले. त्यामुळे जायकवाडीचा जिवंत पाणीसाठा 17 जुलैला 65 टक्के म्हणजे 50 टीएमसी झाल्याने समन्यायी कायद्यान्वये, तसेच मेंढेगिरी अहवालातील पर्याय क्रमांक 3 नुसार यावर्षी जायकवाडीसाठी नगर-नाशिकमधून पाणी सोडण्याची आवश्यकता राहिलेली दिसत नाही.

निश्चित धोरण आवश्यक : निर्मळ
नगर-नाशिकच्या पर्जन्यछायेतील भागात अजूनही पुरेसा पाऊस नसल्याने खरिपासाठी पाणी सोडण्याची मागणी होत होती. मेंढेगिरी अहवालातील पर्याय क्रमांक 1 नुसार जायकवाडीतील जिवंत पाणीसाठा 37 टक्के म्हणजे 28 टीएमसी झाल्यानंतर खरिपासाठी पाणी सोडण्याची तरतूद आहे. परंतु, दुर्दैवाने मागणी करूनही त्याची अंमलबजावणी होत नाही. यासंदर्भात निश्चित धोरण घेणे आवश्यक आहे, असे मत जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता उत्तमराव निर्मळ यांनी व्यक्त केले आहे.
जायकवाडी पाणीसाठा 84.30 टीएमसी
गोदावरी नदीला नांदूर मध्यमेश्वर बंधार्‍यातून मंगळवारी सकाळी 8 वाजता 39 हजार 338 क्युसेकने पाणी सोडण्यात आले. जायकवाडी धरण 101 टीएमसी क्षमतेचे आहे. या धरणात सोमवारपर्यंत 84.30 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. नाशिकच्या इगतपुरी भागात चांगला पाऊस होत असल्याने, 15 ऑगस्टच्या आत धरण भरण्याची चिन्हे आहेत.
सोमवारचा पाऊस मि.मी.(कंसात एकूण पाऊस)
दारणा 20 (779), गंगापूर 33 (1275), मुकणे 22 (730), कडवा 18 (626), काश्यपी 62 (983). भावली 93 (2604), वालदेवी 2 (430), गौतमी 23(1102), वाकी 33 (1259), नांदूर मध्यमेश्वर 14 (269), नाशिक 15 (579), त्र्यंबकेश्वर 31 (1247), इगतपुरी 71 (2237), देवगाव 18(267), ब्राह्मणगाव 10 (211), कोपरगाव 9 (161), पढेगाव 4 (150), सोमठाणा 10 (363), कोळगाव 12 (337), शिर्डी 10 (159), सोनेवाडी 9 (185), रांजणगाव खुर्द 7 (178), चितळी 9 (192), राहाता 8 (258), पालखेड 24 (425).
धरणसाठे (दशलक्ष घनफुटांत)
दारणा 4756, गंगापूर 3639, मुकणे 5949, कडवा 1215, काश्यपी 1537, भावली 1434, वालदेवी 1133, मौसमी 1560, वाकी 1347 पालखेड 333.

The post नगर : ‘समन्यायी’च्या तिढ्यातून यंदाही सुटका appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/4k2uqQA
via IFTTT

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: