नगर : गुंडेगावात सोलर संचाची चोरी

July 22, 2022 0 Comments

https://ift.tt/kuEosCq

वाळकी : पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील गुंडेगाव शिवारातील वनक्षेत्रात वनविभागाने वन्यप्राण्यांसाठी कृत्रिम पाणवठे तयार केलेले असून, त्यात पाणी सोडण्यासाठी बोअरवेल घेतले आहेत. पाणी उपशासाठी बसविलेला सोलर संच चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात गुरुवारी (दि.21) दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुंडेगाव परिसरासाठी नियुक्त असलेले वनरक्षक मानसिंग सोपान इंगळे यांनी याबाबत नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत त्यांनी म्हटले आहे की, वनक्षेत्रात वन्य प्राण्यांना पिण्याचे पाणी मिळावे, म्हणून ग्रामवन समिती मार्फत सन 2019 मध्ये वनक्षेत्रात गोसावी बाबा टेकडी परिसरात नव्याने कृत्रिम पाणवठे तयार केले गेले होते, तसेच या पाणवठ्यामध्ये पाणी सोडण्यासाठी बोअरवेल घेऊन त्यावर सोलर पंप बसविण्यात आले होते.

दि. 16 जुलै रोजी आपण व सोबत अन्य दोघेजण असे तिघे मोटारसायकलवर वनक्षेत्रात गस्त घालत असताना गोसावी बाबा टेकडी परिसरात सोलर संच सुस्थितीत असल्याचे दिसून आले होते. त्यानंतर दि.20 जुलै रोजी दुपारी 1.30 च्या सुमारास आपण सोबत असलेले वनमजूर रमेश पोपट शेळके, कचरू किसन भापकर असे वनक्षेत्रात गस्त घालत गोसावीबाबा टेकडी परिसरात आलो असता, त्या ठिकाणी असलेले सोलर संच आणि स्टार्टर मिळून आले नाही.

त्यामुळे आम्ही परिसरात शोध घेतला. परंतु ते न सापडल्याने कुणी तरी ते चोरून नेले असल्याची आमची खात्री झाली असल्याचे या फिर्यादीत म्हंटले आहे. दरम्यान, गुंडेगाव परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून चोर्‍यांचे प्रमाण वाढले असून, एकाही चोरीचा तपास पोलिसांना लागलेला नाही. त्यामुळे चोरट्यांचे चांगलेच फावत असून, वाढत्या चोर्‍यांमुळे ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. वाढत्या चोर्‍या रोखण्यासाठी ग्रामसुरक्षा दले स्थापन करतानाच पोलिसांनीही रात्रीची गस्त सुरू करण्याची गरज आहे.

चोरट्यांचा बंदोबस्त करा
भर पावसाळ्यातही नगर तालुक्यात चोर्‍यांचे सत्र सुरूच असून, चोरट्यांनी एक प्रकारे पोलिसांनाच आव्हान दिले आहे. वाढत्या चोर्‍यांंमुळे जनतेत घबराटीचे वातावरण आहे. गुंडेगाव येथील चोरीची घटना भरदिवसा घडली असावी, असा कयास असून, वन खात्याचे कर्मचारी कार्यरत असताना चोरी झालीच कशी? असा सवाल विचारला जात आहे. त्यामुळे पोलिसांनी या चोरीचा कसून तपास करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

The post नगर : गुंडेगावात सोलर संचाची चोरी appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/MwBcIZN
via IFTTT

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: