नगर : ‘ओबीसी’ पुन्हा राजकीय आखाड्यात!

July 21, 2022 0 Comments

https://ift.tt/bNWS18F
nagar mnc

नगर : पुढारी वृत्तसेवा : नगरपालिकांबरोबरच आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका देखील ओबीसी आरक्षणाशिवाय घेतल्या जाणार, या चर्चेने इच्छुकांची धाकधूक वाढली होती. मात्र, बुधवारी (दि.20) सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाला हिरवा कंदिल दाखविल्याने पुन्हा एकदा इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

या निर्णयाने आता जिल्हा परिषदेत ओबीसींसाठी 23, तर पंचायत समित्यामध्ये 46 जागा राखीव असतील, असा अंदाज आहे. दरम्यान, आता गट-गणांच्या आरक्षण सोडतीनंतर खर्‍या अर्थाने झेडपीचा रणसंग्राम सुरू होणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या पुढील सूचनांकडे इच्छुकांच्या नजरा लागल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून ओबीसी आरक्षणावर गदा आली होती. त्यातून येणारी नगरपालिका आणि जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक ही ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्यासाठी आयोगाचीही तशी तयारी सुरू होती. मात्र, काल बुधवारी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत बांठिया आयोगाचा आधार घेऊन ओबीसींना 27 टक्के आरक्षण देण्याचा निकाल झाला आहे. या निर्णयाने ओबीसींना मोठा दिलासा मिळाला आहे.

न्यायालयाने ओबीसी आरक्षणाला हिरवा कंदिल दाखविल्याने आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या जागांचे गणितही बदलणार आहे. गतवेळी झेडपीच्या 73 जागा होत्या. त्यात ओबीसींना 20 जागा राखीव होत्या. आता 85 गट झाल्याने ओबीसींच्या जागांमध्येही किमान 3 जागांची वाढ होणार असल्याचे संकेत आहेत.

13 जुलै रोजी गट-गणांची आरक्षण सोडत काढली जाणार होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयातील कालच्या सुनावणीमुळे ती स्थगित करण्यात आली होती. आता लवकरच सोडतीचा नवीन कार्यक्रम जाहीर होणार आहे. ही आरक्षण सोडत अनुसूचित जाती व जमातीच्या उतरत्या लोकसंख्येनुसार व चक्रानुक्रमाचे पालन करत होणार आहे.

दरम्यान, जिल्हा परिषदेत 50 टक्के महिला आरक्षणानुसार 85 पैकी 43 गट हे महिलांसाठी असणार आहेत. 85 पैकी 19 गट हे जाती जमातीसाठी राखीव आहेत. यात 11 गट हे अनुसूचित जाती आणि त्यातील 6 गट हे महिलांसाठी असू शकतील. तसेच 8 गट हे अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत, यातील 4 गट हे महिलांसाठी दिले जाणार आहे.

ओबीसींसाठी गेल्या निवडणुकीत 20 जागा होत्या. आता पूर्वीच्या गटांत 12 ने भर पडली आहे. त्यामुळे 85 गटांपैकी 27 टक्के आरक्षणानुसार 23 गट हे ओबीसींना जाणार आहेत. यामध्ये 12 जागा या महिलांसाठी जाऊ शकतात. तर उर्वरित 43 जागा सर्वसाधारणसाठी असतील, यातील 22 जागा महिलांना सोडाव्या लागतील, अशीही चर्चा आहे. त्यामुळे सर्वसाधारण व्यक्तीसाठी 21 जागा शिल्लक राहतील, प्रत्यक्ष आरक्षण सोडतीत यामध्ये काही प्रमाणात बदल होऊ शकतो, असेही सांगितले जात आहे.

The post नगर : ‘ओबीसी’ पुन्हा राजकीय आखाड्यात! appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/5QJdITp
via IFTTT

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: