भाजपा शिवसेनेची विचारधारा एकच असल्याने हे सरकार येण्यातच महाराष्ट्राचं हित -उदयनराजे

June 23, 2022 0 Comments

वाई: राज्यात सुरू असलेल्या घडामोडींमुळे मला अजिबात धक्का बसला नाही व आश्चर्यही वाटलं नाही. भाजपा शिवसेनेची विचारधारा एकच आहे. त्यामुळे हे सरकार येण्यातच महाराष्ट्राचं हित आहे असं खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगितले. मात्र वेगवेगळ्या विचारधारेचे लोक केवळ सत्तेसाठी एकत्र आल्याने आजची परिस्थिती उद्भवली आहे. मागील  दोन वर्षांपासून सरकार मधील आमदारांमध्ये खदखद होती. त्यामुळे सरकार यापूर्वीच पडायला हवं होतं पण आमदारांतील खदखद आता बाहेर पडली असे मत खासदार उदयनराजे भोसले यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले आहे.

शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राजकीय वर्तुळात वेगवान घडामोडी सुरू आहेत. महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेना नेतृत्व संकटात सापडलं आहे. या राजकीय घडामोडींवर भाजपाचे खासदार उदयनराजे भोसलें यांनी प्रतिक्रिया दिली. वेगवेगळ्या विचारधारेचे लोक कधीच एकत्र येऊ आणि राहू शकत नाहीत. मात्र फक्त सत्तेच्या विचारानं प्रेरित होऊन जेव्हा लोक सरकार बनवण्यासाठी एकत्र येतात. तेव्हा त्यांना सोबत ठेवण्यासाठी कोणत्याही ताकदीची, आमिषाची गरज लागत नाही. पण केवळ सत्तेसाठी  विचारधारा सोडून लोक एकत्र येतात तेव्हा त्यांना सोबत ठेवण्यासाठी आमिषाची गरज लागते. त्यांना एकसंध ठेवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते असे भाष्यआत्ताच्या घडामोडींवर त्यांनी केले.

  वेगवेगळ्या विचारधारेचे लोक कधीही जास्त काळ एकत्र राहू शकत नाहीत.विचारधारा विसरून केवळ सत्तेसाठी एकत्र आल्यानं आताची परिस्थिती उद्भवली आहे. जेव्हा या प्रकारे सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी त्या पक्षातील नेत्यांनी  ही व्यवस्था किती काळ टिकणार याचा विचार त्यावेळीच संबंधितांनी करायला हवा होता, असंही उदयनराजे म्हणाले.

  हे करताना त्यांनी कार्यकर्ते आणि नेत्यांचा विचार केला नाही.अनेक महापालिका, पालिका, जिल्हा परिषदा यांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपला आहे. तिथे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांचं गणित जुळू शकत नव्हतं, याची कल्पना तिथल्या स्थानिक नेत्यांना कार्यकर्त्यांना होती.भाजपा शिवसेनेचे विरोधक हे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस असल्याने त्यांची समीकरणे जास्त वेळ जुळणार नव्हती. या सत्तेचा आमदारांना आणि कार्यकर्त्यांनाही काही उपयोग होत नव्हता. त्यामुळे हे सरकार गेले. आता भाजपा शिवसेनेचे सरकार येईल. या दोघांची विचारधारा एकच आहे. त्यामुळे हे सरकार येण्यातच महाराष्ट्राचं हित आहे.



https://ift.tt/KC5kbuS

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: