“मंत्र्यांची दादागिरी सहन करणार नाही”, शिवसेना आमदाराचा इशारा; निधीवाटपात भेदभावाचा आरोप!

May 20, 2022 0 Comments

राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारवर विरोधी पक्ष असलेल्या भाजपाकडून सातत्याने टीका केली जात आहे. तीन पक्षांच्या सरकारमध्ये मतभेद असल्याचे दावे केले जात आहेत. सरकारमधील काही घटकांची नाराजी वेळोवेळी समोर आलेली असताना आता तसाच एक प्रकार समोर आला असून चक्क मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याच पक्षाच्या अर्थात शिवसेनेच्या एका आमदाराने थेट मंत्र्यांनाच आव्हान दिलं आहे. मंत्र्यांकडून निधीवाटपामध्ये भेदभाव केला जात असून तो खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराच या आमदारांनी दिला आहे. शिवसेना आमदार आशिष जयस्वाल यांनी टीव्ही ९ ला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये त्यांनी आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

“ही सर्वपक्षीय आमदारांची तक्रार”

निधीवाटपात भेदभाव होत असल्याची तक्रार सर्वपक्षीय आमदारांकडून केली जात असल्याचा दावा आशिष जयस्वाल यांनी केला आहे. “माझी एकट्याची नाही, सर्वपक्षीय आमदारांची ही तक्रार आहे. काँग्रेसच्या आमदारांचीही नाराजी आहे. त्यांनी देखील तक्रारपत्रावर सही केली आहे. आदिवासी जनतेवर आम्ही अन्याय होऊ देणार नाही. त्या भागातल्या जनतेला न्याय देण्यासाठी आम्ही तक्रार केली आहे. सर्व मतदारसंघातल्या आमदारांना सारखा न्याय दिला पाहिजे. काही भागातल्या आमदारांना झुकतं माप दिलं जात असेल आणि काही आमदारांवर अन्याय होत असेल तर आम्ही तो सहन करणार नाही”, असं आशिष जयस्वाल म्हणाले आहेत.

“इतरांच्या म्हणण्यानुसार कामं कशी होतात?”

“जेव्हा विधिमंडळात सर्व आमदारांच्या पाठिंब्याने अर्थसंकल्प मंजूर होतो, तेव्हा त्या आमदारांना नियमानुसार निधी देणं आवश्यक आहे. अजित पवारांकडेही राष्ट्रवादीच्या आमदारांनी तक्रार केली आहे. ज्या आमदारांनी अर्थसंकल्प मंजूर केले, त्या आमदारांच्या मतदारसंघात इतरांच्या म्हणण्यानुसार कामं कशी दिली जातात?” असा सवाल जयस्वाल यांनी केला आहे.

“मंत्र्यांची दादागिरी सहन करणार नाही”

दरम्यान, यावेळी बोलताना जयस्वाल यांनी आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांच्यावर आरोप केला आहे. “के. सी. पाडवी यांच्यावर माझा थेट आरोप आहे की त्यांनी निधीवाटपात अन्याय केला आहे. हा अन्याय आम्ही अजिबात सहन करणार नाही. आम्ही सर्वपक्षीय आमदार लढा देऊ. कोणत्याही आर्थिक गैरव्यवहारातून जर निधी वितरीत करण्यात आला तर आम्हाला हे अजिबात मान्य नाही. मी त्या सर्व मंत्र्यांची पोलखोल करणार आहे. सर्व आमदार मिळून आम्ही लढा देऊ. कोणत्याही परिस्थितीत मंत्र्यांची दादागिरी आम्ही सहन करणार नाही”, असं जयस्वाल म्हणाले आहेत.

https://ift.tt/2nGB01f

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: