जगाला मासे पुरवणाऱ्या मराठी कंपनीने प्लॅस्टिकपासून २८ रुपये लिटर डिझेलची निर्मिती केलीय

June 01, 2021 , 0 Comments

भारतात नॉन-व्हेजला डिमांड किती जास्त आहे हे काय सांगायला नको. त्यातही आपले लोकं हे आवडीनिवडीत जास्त माहीर. नॉन- व्हेज मध्ये मासे हा पदार्थ खासचं. सुरमई, पापलेट, बोंबील, कोळंबी असे कितीतरी प्रकार सांगता येतील जे रोजच्या रोज हॉटेलमध्ये खाद्य शौकीन माणसं फस्त करत असतात.

आता हे भारतातलं सोडा जरा जगाचा विचार करू. परदेशात सुद्धा बक्कळ मासे खाल्ले जातात. पण काही निवडक देशांमध्ये जे मासे पुरवले जातात ते आपला मराठी माणूस पोहचवतो. आजची यशोगाथा सुद्धा खास आहे. भारतातल्या प्लास्टिक कचऱ्याचा सदुपयोग करून त्यातून नफा मिळवणं असो किंवा परदेशात मासे पाठवून परदेशात ऑफिस असो हे सगळे भीमपराक्रम एका मराठी माणसाने केले आहेत यावर तुमचा विश्वास बसणार नाही.

रत्नागिरीच्या दीपक गद्रेंनी आपला व्यवसाय परदेशात पोहचवला ते कौतुकास्पद आहे. एम कॉम पर्यंतच शिक्षण घेऊन त्यांनी व्यवसाय करण्याच्या उद्देशाने नवीन सुरवात करण्याचं ठरवलं. निरीक्षण आणि टाकाऊ पासून टिकाऊचा फॉर्म्युला लक्षात ठेवत त्यांनी जागतिक बाजारपेठेत आपलं मार्केट निर्माण केलं.

सुरवातीच्या काळात कोळी लोकं जाळ्यात अडकलेले छोटे मासे कुणी खात नाहीत म्हणून ते तिथेच टाकून जायचे. दीपक गद्रे यांनी मात्र त्या माशांवर प्रक्रिया करून ते फ्रोझन मासे म्हणून शीतगृहात ठेवून विकण्यास सुरवात केली. हळूहळू व्यवसाय वाढत गेला. ओळखी वाढत वाढत जाऊन त्या थेट परदेशापर्यंत गेल्या.

वाढता व्यवसाय बघून त्यांनी १९७८ साली रत्नागिरीमध्ये सी फूड फॅक्टरी सुरु केली. या फॅक्टरी मध्ये प्रक्रिया केलेले फ्रोझन मासे त्यात कोळंबी, स्क्विड मासा अशा अनेक प्रकारच्या माशांच्या प्रजाती ठेवल्या.

एकदा ते जपानच्या दौऱ्यावर असताना त्यांनी तिथे सुरमई प्लांट बघितला. त्याचा उपयोग आपल्याला व्यवसाय वाढवण्यासाठी होऊ शकतो असं लक्षात आल्यावर त्यांनी भारतात आल्यावर १९९४ साली भारतातला पहिला सुरमई प्लांट उभा केला.

जसा जसा कंपनीचा उत्कर्ष होऊ लागला तेव्हा दीपक गद्रेंनी अत्याधुनिक मॅन्युफॅक्चरिंग यंत्रे मागवून त्यातून प्रक्रिया सुरु केली. दूरच्या देशात त्यांना मासे निर्यात करता येऊ लागले. त्यामुळे त्यांनी आपला दर्जा कधी घसरू दिला नाही. १९९९च्या सुमारास गद्रे मराईन इंडस्ट्री हि चांगली गुणवत्ता आणि विश्वासाचा ब्रँड म्हणून उदयास आली.

साऊथ कोरिया पासून ते जपान, मलेशिया आणि तैवान ते ऑस्ट्रेलिया अशा मोठ्या देशांमध्ये गद्रे इंडस्ट्री आपला माल पोहचवू लागली. २००४ साली अर्जुन गद्रे हे गद्रे मराईनचे सीईओ झाले. अर्जुन गद्रे यांनी सुरमई प्रोडक्टची वेगळी उत्पादने आणि फ्रोजन प्रोडक्ट जी ग्राहकांना २-३ मिनिटात खाण्यासाठी तयार होऊ शकतात अशी विभागणी केली.

आज घडीला गद्रे मराईन हि जगातली ३ री सुरमई प्लांट असलेली कंपनी आहे. रत्नागिरी, महाराष्ट्र आणि अनुक्रमे चोरवाड , गुजरात न ब्रम्हावर, कर्नाटक अशा ठिकाणी गद्रे मराईनचे तीन प्लांट्स आहेत. आपल्या उत्कृष्ठतेच्या जोरावर आणि चांगल्या सर्व्हिसमुळे आज गद्रे इंडस्ट्री जगभरात प्रसिद्ध आहे.

फक्त २८ रुपये लिटर डिझेलची निर्मिती

गेल्या दोन वर्षांपूर्वी रत्नागिरी एमआयडीसी येथे प्लास्टिक पायरोलिसीस म्हणजे प्लास्टिकवर प्रक्रिया करून डिझेल बनवण्याचा प्रकल्प दीपक गद्रे यांनी यशस्वी केला आहे. एक हजार किलो प्लास्टिकपासून ८०० लिटर डिझेल बनवले जाते. त्यातून तयार होणाऱ्या १० टक्के कार्बन व १० टक्के वायूचा उपयोग पुन्हा डिझेलनिर्मितीसाठी वापरला जातो. डिझेलचा उपयोग कंपनीतील पॉवर जनरेटरसाठी केला जातो. त्यामुळे या प्रकल्पात कोणतीही गोष्ट वाया जात नाही. जागतिक दर्जाचे डिझेल बनवणारा हा कोकणातील पहिलाच प्रकल्प आहे.

सध्या उत्तम प्रतीचे डिझेल फक्त २८ रुपयांत मिळते. सध्या याचा वापर कंपनीतील पॉवर जनरेटर चालविण्यासाठी करतो. भविष्यात वाहनातही हे डिझेल वापरण्याचा मानस आहे अस दीपक गद्रे सांगतात.

आता गद्रे मराईनच लक्ष्य हे भारतीय मार्केट आहे. मॉडर्न भारतीयांच्या जिभेची चव ओळखून नवीन पाऊल गद्रे मराईन टाकत आहे. जागतिक पातळीवर सुरमई प्लांट हा आपलाच असावा असा होरा त्यांचा आहे. नवीन टेक्नोलॉजी आणि चांगल्या गुणवत्तेच्या जोरावर उरलेल्या सुरल्या सगळ्या देशांमध्ये आपलं प्रोडक्ट ते पोहचवत आहेत.

रत्नागिरी मध्ये स्थित असलेल्या फॅक्टरी मध्ये फिश ऑइल, सुरमई प्लांट, पॅकिंग ऑफ फ्रोजन फिश, क्रॅब स्टिक्स, कोल्ड स्टोरेज फॅसिलिटी असे अनेक उद्योग चालतात. ग्राहकांना ताजे आणि स्वच्छ मासे कसे पुरवता येतील याकडे हि मराईन इंडस्ट्री पूर्ण भर देते.

आता थोडंसं मागे जाऊया. १९७०च्या सुमारास दीपक गद्रे हे गोदीमध्ये डिझेल पुरवायचे. मासेमारी आणि त्या व्यवसायांमध्ये प्लास्टिकचा प्रचंड वापर व्हायचा. पर्यावरणाच्या दृष्टीने तो घातक होता. सुरवातीला या प्लॅस्टिकच्या पिशव्या आणि बाजारातल्या इतर पिशव्या ८ रुपय किलोने गोळा करून ते या वापरलेल्या पिशव्यांमधून डिझेल निर्मितीसाठी द्यायचे आणि यातून ते दिवसाला ८०० लिटर डिझेल मिळवायचे. जागतिक दर्जाचं हे डिझेल ते आपल्या शीतगृहांमध्ये वापरतात.

प्रोडक्टपासून ते मसाल्यापर्यंत सगळ्यात गद्रे मराईनने आपले हात पसरलेले आहेत. लोकांकडून वाढती मागणी हेच या कंपनीचं लोकप्रिय असण्याचं लक्षण आहे.

गद्रे मराईनचे सीईओ अर्जुन गद्रे हे आंत्रप्रेन्युअर म्हणूनही परिचित आहेत. रत्नागिरीमध्ये अनेक लोकांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे. गद्रे यांचं एक ऑफिस हे सिंगापूरला आहे आणि तिथे प्रमुख माणूस हा अमेरिकेचा आहे. न्यूयॉर्कच्या ऑफिसचा प्रमुख माणूस मेक्सिकन आहे. साधा व्यवसाय कसा विस्तारू शकतो याच उदाहरण म्हणजे गद्रे मराईनं.

रात्री अपरात्री जाणाऱ्या महिलांसाठी विश्रामगृहे, लहान बाळांसाठी पाळणाघरे असे अनेक स्तुत्य उपक्रम देखील गद्रे मराईन राबवते. जागतिक आणि देशांतर्गत पातळीवरसुद्धा गद्रे मराईनंला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.

इतक्या उच्च पातळीवर काम करत असताना व्यवसायाव्यतिरिक्त कुठेही आपल्या नावाचा ते प्रचार करत नाहीत. बऱ्याच लोकांना तर हेही माहिती नसतं कि फ्रोजन फिश हे गद्रे मराईन मधून आलेले असतात. प्रसिद्धीचा गाजावाजा न करता कामावर फोकस असणारे गद्रे मराईन्स हे आदर्श उदाहरण आहे.

हे हि वाच भिडू :

 

The post जगाला मासे पुरवणाऱ्या मराठी कंपनीने प्लॅस्टिकपासून २८ रुपये लिटर डिझेलची निर्मिती केलीय appeared first on BolBhidu.com.



Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: