लाल मातीच्या पहिलवानांना ऑलिम्पिकच्या मॅटवर पोहचवणारे कुस्तीचे भीष्म पितामह….

May 24, 2021 , 0 Comments

भारतात ज्या प्रमाणावर कुस्ती हा खेळ खेळला जातो तितका तो जगात कुठेही दिसत नाही. भारताला कृषी परंपरा ज्या प्रकारे लाभली आहे त्याचप्रमाणे कुस्तीचीही परंपरा आहे. ऑलम्पिक स्पर्धेतही भारताच्या कुस्तीगिरांची चांगली कामगिरी आहे. एक पहिलवान असा आहे ज्याने स्वतःच्या कारकिर्दीत कुस्तीचा फड गाजवलाच पण भारताची कुस्ती त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर नेली.

गुरु हनुमान. हे भारतीय कुस्तीगीरांचे प्रमुख कोच म्हणून कार्यरत होते. भारताची कुस्ती जगभरात पोहचवण्यात त्यांचं योगदान मोलाचं आहे. गुरु हनुमान यांचा जन्म राजस्थानमधील झुंझुणू जिल्ह्यातल्या चिडावा तहसील मध्ये १५ मार्च १९०१ साली झाला. त्यांचं मूळ नाव होतं विजय पाल यादव होतं.

लहानपणी बरोबरीची पोरं किडकिडीत शरीर असल्यामुळे त्यांना चिडवत असे त्यातून त्यांनी मेहनत घेऊन तब्येत बनवायला सुरवात केली. व्यायामाचा नाद लागल्याने कुस्तीशीही त्यांचा संबंध आला. कुस्तीवर त्यांचं विशेष प्रेम जडलं आणि त्यातून त्यांनी वयाच्या २० वर्षी घर सोडण्याचा निर्णय घेतला.

राजस्थान सोडून ते दिल्लीला गेले. मल्लविद्येतील सगळ्यात ताकदवर योद्धा म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं त्या प्रभू हनुमानावरून त्यांनी स्वतःच नाव बदललं आणि गुरु हनुमान हे नाव धारण केलं. इथे त्यांनी आजन्म ब्रह्मचारी राहण्याचा निर्णय घेतला. ते स्वतः असं म्हणायचे कि माझं लग्न हे कुस्तीशीचं झालं आहे.

त्यांच्यात कुस्तीविषयी बरंच काही दडलेलं होत, त्यांच्या सानिध्यात किंवा त्यांच्या संपर्कात आलेले कुस्तीपटू पुढे जाऊन मोठे कुस्तीगीर बनले. त्यांच्या तल्मितले सगळेच पहिलवान त्यांच्या हाताखाली तयार होत असे आणि ते जातीने प्रत्येकाकडे लक्ष देत असे.

गुरु हनुमान यांची कुस्तीवरील निष्ठा आणि प्रेम बघून भारताचे महान उदयॊगपती कृष्णकुमार बिर्ला यांनी दिल्लीतील भली मोठी जमीन त्यांच्या कुस्तीच्या आखाड्यासाठी दान दिली. स्वातंत्र्य लढ्यातसुद्धा त्यांनी सहभाग नोंदवला होता. भारत पाकिस्तान ज्यावेळी फाळणी झाली तेव्हा पाकिस्तानातून भारतात आलेल्या लोकांची त्यांनी राहण्याची आणि खाण्यापिण्याची व्यवस्था केली होती.

१९४७ सालानंतर गुरु हनुमान आखाडा हा दिल्लीतल्या पहिलवानांसाठी मंदिरासमान झाला. कुस्तीतील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले. १९२० सालानंतर बिर्ला व्यायामशाळा हि गुरु हनुमान आखाडा म्हणून ओळखली जाऊ लागली.

त्यांच्या तालमीत शिकणाऱ्या कुस्तीगिरांना ते अगदी वडिलांप्रमाणे माया द्यायचे, प्रत्येक पहिलवानाच्या जेवणापासून ते व्यायामपर्यंत ते विचारपूस करायचे. कुस्ती प्रकारातले जवळजवळ सगळे बारकावे त्यांना माहिती होते त्यानुसार ते खेळाडूंना प्रशिक्षण द्यायचे.

पहिलवान लोकांच्या उतरत्या काळात त्यांना कुणाकडूनही मदत मिळत नाही हे गुरु हनुमान याना माहिती होतं, तेव्हा त्यांनी याबाबतचा अर्ज सरकारला केला. गुरु हनुमान यांच्या निवेदनानंतर पहिलवान लोकांना रेल्वे विभागात नोकऱ्या मिळू लागल्या.

भारतीय कुस्ती आणि पाश्चिमात्य कुस्ती यांचा मिलाप घडवून त्यांनी पहिलवानांना कुस्ती शिकवली. जन्मभर ते शाकाहारी राहिले आणि धोतर बंडी हाच त्यांचा पोशाख होता. तालमीतल्या पहिलवानांना ते पहाटे ३ ला उठवत आणि व्यायाम करायला लावत. आपल्या विद्यार्थ्यांना त्यांनी शाकाहार, ब्रम्हचर्य, कुस्ती यांविषयी बरच मार्गदर्शन केलं.

घरी आलेल्या पाहुण्यांना ते चहा ऐवजी बदामाची लस्सी देत असे जेणेकरून जे कोणी येईल त्याला स्वतःच्या आरोग्याच्या काळजीचे महत्व पटेल. गुरु हनुमान यांचे शिष्य सतपाल सिंग हे तिथल्या पहिलवानांना आधुनिक कुस्तीचं प्रशिक्षण देत आहे. या पहिलवानांमध्ये सुशील कुमार, योगेश्वर दत्त आणि नरसिंह यादव अशी दिग्गज मंडळी आहेत.

 गुरु हनुमान यांचे तीन शिष्य सुदेश कुमार, प्रेम नाथ आणि वेद प्रकाश यांनी १९७२ सालच्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक पटकावले होते. सतपाल सिंग आणि करतार सिंग यांनी १९८२ आणि १९८६च्या एशियाई स्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळवलं होतं. आजवर त्यांच्या ८ शिष्यांनी अर्जुन पुरस्कार मिळवले आहेत.

१९८७ साली भारत सरकारने त्यांना द्रोणाचार्य पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला होता. ते ९८ वर्षाचे असताना २४ मे १९९९ रोजी एका कार अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या स्मरणार्थ दिल्लीमध्ये कल्याण विहार नावाचं स्टेडियम बांधण्यात आलं होतं.

हे हि वाच भिडू :

The post लाल मातीच्या पहिलवानांना ऑलिम्पिकच्या मॅटवर पोहचवणारे कुस्तीचे भीष्म पितामह…. appeared first on BolBhidu.com.



Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: