बापरे! अवघ्या ६ महिन्यांच्या चिमुकलीचा करोनामुळं मृत्यू

May 29, 2021 0 Comments

अकोलाः जिल्हातल्या बार्शीटाकली तालुक्यातील पिंजर प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येत असलेल्या महान येथील सहा महिन्यांच्या चिमुकलीचा करोनामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या सहा महिन्याच्या बालिकेला गुरुवारी रात्री उशिरा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे दाखल करण्यात आले होते. तिच्यावर उपचार सुरू असताना तिचा काही तासांतच मृत्यू झाला. करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या तिसर्‍या लाटेत लहान बालकांना करोना विषाणू संसर्गाचा धोका अधिक असल्याची भीती व्यक्त केली जात असताना अकोल्यात एका सहा महिन्याच्या करोना बाधित चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे . महान येथील रहिवासी असलेल्या या चिमुकलीवर रुग्णालयात उपचार सुरु होते. या चिमुकलीला जन्मापासूनच हृदयविकार होता. रुग्णालयात आल्यानंतर या चिमुकलीची रॅपिड टेस्ट केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला. अहवाल आल्यानंतर लगेचच तिच्यावर उपचार सुरु करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान काही तासातच तिचा मृत्यु झाला. या चिमुकलीला करोना असला तरी हृदयात छिद्र असल्याने तिचा मृत्यू झाल्याची माहिती महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांनी दिली आहे. सहा महिन्यांच्या बालिकेचा करोनामुळं मृत्यू झाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या बालिकेचा मृतदेह पालकांकडे सोपवण्यात आला असून आता या परिवाराची करोना चाचणी करण्यात येणार आहे. अकोला जिल्ह्यात करोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच बारा वर्षांखालील अनेक लहान मुलांचे अहवाल करोना पॉझिटिव्ह येत आहेत. त्यामुळे एक वर्षाखालील चिमुकल्यांसह बारा ते पंधरा वर्षाखालील मुलांची खबरदारी घ्यावी, असे आवाहन सुद्धा डॉक्टरांनी केले आहे.करोना रुग्णांची संख्या वाढत असताना तिसरी लाट आल्यास यात लहान मुलांना सर्वात जास्त धोका असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे याबाबत प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत असून यासाठी प्रशासन प्रत्येक जिल्ह्यात लहान मुलांसाठी करोना रुग्णालय उभारणार आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: