नगर: एकाच शववाहिकेत कोंबले सहा मृतदेह, स्मशानातही रांग
अहमदनगर: बाधितांचा आकडा वाढत असताना नगरमध्ये आता मृत्यूंचे तांडव सुरू झाले आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसोबतच अमरधाममधील अंत्यविधी करणारी यंत्रणाही कोलमडली आहे. महापालिकेकडे एकच शववाहिनी असल्याने एकाचवेळी अनेक मृतदेह कोंबून नेले जात आहेत. तर विद्युतदाहिनीची व्यवस्था आणि ओटेही अपुरे पडत असल्याने जमिनीवरच मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे. वर्षभरापूर्वी अशाच अडचणी आल्या होत्या. मात्र, त्यावर ना महापालिकेने उपाय केला, ना जिल्हा प्रशासनाने त्यात लक्ष घातले. त्यामुळे करोना बाधतांच्या मृत्यनंतरही नातेवाईकांच्या भावनेशी खेळ सुरूच आहे. वाचा: काल रात्री नगर शहरातील अंत्यसंस्काराचे विदारक चित्र समोर आले. एका शववाहिकेत सहा मृतदेह एकावर एक ठेवून नेण्यात आले. महापालिकेची यासंबंधीच यंत्रणा अपुरी असल्याने ही वेळ आल्याचे कर्मचारी सांगतात. नगरच्या रुग्णालयांत शहरासोबतच ग्रामीण भागातील रुग्णही दाखल होतात. त्यांचा मृत्यू झाल्यावर नियमाप्रमाणे मृतदेहांवर येथेच अंत्यसंस्कार करण्यात येतात. यासाठी नगरच्या अमरधाममधील विद्युत दाहिनीचा वापर केला जातो. मात्र, तेथे दिवसाला केवळ २० अंत्यसंस्कार होऊ शकत आहेत. त्यासाठी नातेवाकाईंना तासंतास प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे नेहमीच्या पद्धतीने अंत्यस्कार करण्यासही सुरुवात झाली आहे. त्यासाठी ओटे अपुरे पडत असल्याने जमिनीवरच सरण रचून अंत्यसंस्कार केले जात आहेत. महापालिकेत राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने भाजपची सत्ता आहे. गेल्या वर्षीही अशीच स्थिती निर्माण झाली होती. शववाहिकेतून एकाचवेळी १२ मृतदेह नेले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यावेळी आणखी एक शववाहिनी घेण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, आतापर्यंत अशी व्यवस्था झालेली नाही. पूर्वी एकच विदयुत दाहिनी सुरू होती, आता दुसरी कार्यान्वित केल्याने तेवढा फरक मात्र पडला आहे. करोना बाधित रुग्णवाढीच्या बाबतीत नगर जिल्हा देशातील टॉप टेन जिल्ह्यांमध्ये आहे. दिवसाला येथे दोन हजारांवर नवे रुग्ण आढळून येत असून उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या बारा हजारांच्या घरात गेली आहे. आतापर्यंत १२७० जणांचा मृत्यू झाला आहे. करोनामुळे दररोज सरासरी १५ ते २० जणांचा मृत्यू होत आहे. काल हा अकडा ४८ वर गेल्याने यंत्रणा कोलमडून पडली. अंत्यसंस्कारासाठी शववाहिकेतून मृतदेह नेले जातात. नंबर येऊपर्यंत मृतदेह तसेच शववाहिकेत तासंतास पडून असतात. बहुतांश रुग्ण ग्रामीण भागातील असल्याने त्यांच्या नातेवाईकांनीही नगर शहरात येऊन तासंतास ताटकळत बसावे लागते. सगळेच दु:खात असल्याने यंत्रणेला जाब विचारण्याचे भानही नसते. असे असले तरी माणुसकीला काळीमा फासणाऱ्या पद्धतीने अंत्यविधीचे काम सुरू आहे. वाचा: प्रशासानाकडून आढावा बैठका घेतल्या जातात. त्यामध्ये इतर गोष्टींवर चर्चा आणि नियोजन केले जात असले तरी करोना बाधिका रुग्णांच्या अंत्यसंस्काराच्या व्यवस्थेकडे फारसे लक्ष दिले जात नसल्याचे यातून दिसून येते. त्यामुळे तेथील कर्मचारी जमले तसे हे काम उरकताना दिसून येतात. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: