लॉकडाउनची तयारी पूर्ण; घोषणा कधी करायची यावर खल
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई राज्यातील करोनारुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे गुढीपाडव्यानंतर महाराष्ट्रात करण्याबाबत राज्य सरकारने आवश्यक ती सर्व तयारी केली आहे. मात्र, नागरिकांना याची कल्पना देऊन दोन दिवसांचा अवधी देऊन मग लॉकडाउन करायचे, की लॉकडाउन थेट जाहीर करायचा याविषयी अद्यापही चर्चा सुरू असल्याचे कळते. मुख्यमंत्री यांनी रविवारी सर्वपक्षीय बैठक आयोजित केली होती, तर सोमवारी टास्क फोर्सची बैठक घेऊन राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. करोनाच्या वाढत्या परिस्थितीला लॉकडाउनशिवाय पर्याय नसल्याचे सर्वच अधिकाऱ्यांचे आणि डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे लॉकडाउन करण्याबाबत राज्य सरकारने निश्चित केले आहे. मात्र, हा लॉकडाउन आठ दिवसांचा हवा, की १५ दिवसांचा याविषयी अजूनही दुमत आहे. शिवाय लॉकडाउन जाहीर करण्याआधी सर्वसामान्यांना त्याची माहिती देऊन, तसेच दोन ते तीन दिवसांचा अवधी देऊन मग लॉकडाउन जाहीर करावा, अशी मागणी लोकप्रतिनिधींकडून होत आहे. गेल्या वेळेला एक रात्रीत लॉकडाउनचा निर्णय घेतल्याने अनेकांची गैरसोय झाली होती, असेही या लोकप्रतिनिधींचे म्हणणे आहे. तर गेले काही दिवस लॉकडाउनची चर्चा असल्याने तसेच सर्वसामान्यांना लॉकडाउनची कल्पना आली असल्याने आता जास्त काळ न थांबता लगेचच लॉकडाउन करावे, असे प्रशासनातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मंगळवारी गुढीपाडवा आणि बुधवारी डॉ. बाबासोहब आंबेडकर यांची जयंती आहे. त्यामुळे हे दोन्ही दिवस सोडून गुरुवारी १५ एप्रिल रोजी लॉकडाउन करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. गुरुवारी संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत पंढरपूर शहरातील पोटनिवडणुकीसाठीचा प्रचारही संपणार आहे. नंतर पंढरपूर विधानसभा मतदारसंघापुरते मतदानानिमित्त तेथील लॉकडाउन शिथिल करण्यात येणार आहे. यामुळे १५ एप्रिल ते ३० एप्रिल असा लॉकडाउनचा कालावधी असू शकतो. १ मे रोजी सरकारी सुट्टी असल्याने २ मे पासून पुन्हा राज्यातील परिस्थिती पूर्ववत करता येऊ शकते. मात्र, विरोधकांनी तयारी न दर्शविल्यास लॉकडाउनचा कालावधी कमी होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. करोनारुग्णांची संख्या अचानक वाढल्याने २२ ते २८ फेब्रुवारी या काळात अमरावतीमध्ये लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. त्यानंतर या लॉकडाउनचा कालावधी आणखी ८ दिवसांनी वाढवण्यात आला. या हिशेबाने अमरावतीत १५ दिवसांचा कडकडीत लॉकडाउन लावण्यात आला. या काळात अमरावती शहर आणि अचलपूर तालुका पूर्णपणे बंद होता. येथील प्रतिबंधित क्षेत्रांमधील लोकांना तर घराबाहेर पडण्यासही बंदी घालण्यात आली होती. मात्र, या १५ दिवसांच्या लॉकडाउनमुळे अमरावतीमधील करोनारुग्णांची संख्या निम्म्याने कमी झाली. लॉकडाऊपूर्वी दिवसाला ९०० रुग्ण पॉझिटिव्ह सापडत होते. मात्र, लॉकडाउननंतर हे प्रमाण ३०० ते ३५० पर्यंत खाली आले. करोना पॉझिटिव्हिटी दर देखील ४८ टक्क्यांवरून नऊ टक्क्यांपर्यंत खाली आला. लॉकडाउनचा अमरावतीमध्ये फेब्रुवारीत लॉकडाउन करण्यात आला होता. या लॉकडाउनंतर अमरावतीमध्ये करोनारुग्णांचा पॉझिटिव्हिटी दर आणि मृतांचा आकडा कमी झाला होता. त्यामुळे आता राज्याला करोनाच्या भीषण तडाख्यातून वाचवण्यासाठी अमरावती पॅटर्नच्या लॉकडाउनबाबतही राज्य सरकार गांभीर्याने विचार करीत असल्याचे कळते. अमरावती पॅटर्नप्रमाणे लॉकडाउन झाल्यास राज्यातील करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येईल, अशी आशा राज्य सरकारला आहे. त्यामुळे यामध्ये थोडेफार बदल करून हाच पॅटर्न सरसकट वापरण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे कळते.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: